दिव्यांग आदिबा अलीने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
विजेती आदिबा अली
विजेती आदिबा अली

 

आदिबा अली ही दिल्लीतील हजरत निजामुद्दीन भागात राहणारी दिव्यांग तरुणी. आपल्या दिव्यांगतेला स्वतःची कमजोरी न बनू देता ती मध्यप्रदेश येथे आयोजित २६ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत ती फक्त सहभागी झाली नाही तर, सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकून तिने तिच्या पालकांचा अभिमान वाढवला. तिच्यासारख्याच दिव्यांग तरुणांसाठी ती आज प्रेरणा बनली आहे. अधिक जाणून घेऊयात पायांनी अपंग पण बुद्धीने वेगवान असलेल्या आदिबाविषयी. 

आदिबाची आई रेश्मा अली तिच्या यशानंतर सांगतात, "आदिबाच्या या यशामुळे घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. हे यश तिच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे." 
 

 
चौथ्या मजल्यावरून पडली होती आदिबा  
आदिबाचे वडील असगर अली जुने दिवस आठवत म्हणाले की, "काही वर्षांपूर्वी आदिबासोबत मोठा अपघात झाला होता. ती चौथ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून डोकावत असताना खाली पडली. पायाने ती अपंग झाली. मात्र, अपंग झाली म्हणून काय झाले तू आजही यश मिळवू शकते, असे सांगत आम्ही तिला नेहमी प्रोत्साहित केले. आमच्या या शब्दांनी तिच्यात एक वेगळाच उत्साह निर्माण व्हायचा." 

दिव्यांगांच्या जीवनाचा अभ्यास केल्याने वाढले मनोबल  
असगर अली पुढे सांगतात की, "पायाने अपंग असूनही आदिबाने कधी हिंमत हारली नाही. पुस्तकं आणि इंटरनेटच्या मदतीने अपंग लोकांच्या जीवनाचा अभ्यास करण्यास तिने सुरुवात केली. अपंग लोक त्यांचे जीवन कसे जगतात? आपला वेळ ते कुठे आणि कसा घालवतात? स्वतःला ते कसे यशस्वी करतात? यावर तिने अभ्यास केला आणि प्रेरणा घेतली."  
 

 
आतापर्यंत जिंकलीयेत अनेक पदके 
आदिबाने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून आतापर्यंत नऊ पदके जिंकली आहेत. भारतीय राष्ट्रीय पॅरा नेमबाजीचे प्रशिक्षक सुभाष राणा यांच्याकडून ती सध्या प्रशिक्षण घेत आहे. अलीकडेच तिने भोपाळ येथे आयोजित ६६व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) बीएच्या तिसऱ्या वर्षात ती सध्या शिकत आहे. खेळात भाग घेण्यासोबतच अभ्यासाकडेही आदिबा विशेष लक्ष देते. 

देशाला सुवर्ण मिळवून देण्याचे आहे स्वप्न
या यशानंतर आदिबाने आपल्या आई-वडिलांचे आणि प्रशिक्षक सुभाष राणा यांचे आभार मानले. ती म्हणाली, "माझे आई-वडील आणि प्रशिक्षक यांचे कठोर परिश्रम आणि प्रशिक्षण मला या स्थानापर्यंत घेऊन आले आहे." मुलींना संदेश देत ती पुढे म्हणते, "नेहमी कठोर परिश्रम करा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित रहा." भविष्यात तुला काय करायचे आहे? असे विचारल्यावर तिने सांगितले, "माझ्या देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकणे हे माझे ध्येय आहे.” 

- मोहम्मद अक्रम, नवी दिल्ली

(अनुवाद : छाया काविरे)