"पुढील जनगणना होईल तेव्हा इंडोनेशियाला मागे टाकून भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल, असे मला वाटते. भारताएवढी अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित जागा जगात दुसरी कुठेही नाही. त्यामुळे मुस्लिम किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय होतो, हा केवळ अपप्रचार आहे," असे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्यक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी केले. लखनौ येथील क्राइस्ट चर्च कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
रिजिजू यांनी सोशल मीडियावर या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत 'कृपया मुस्लिम समुदायाची दिशाभूल करू नका' असे आवाहनही केले आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर, केंद्र सरकारची धोरणे आणि पारशी समाजासाठी उचललेल्या पावलांवर सविस्तर भाष्य केले.
भारत हा जगातील सर्वात सुरक्षित देश
कार्यक्रमात बोलताना रिजिजू म्हणाले, "मुस्लिमांची संख्या भारतात खूप मोठी आहे आणि त्यांना येथे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी नुकतेच इंडोनेशियाच्या मंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले की, आगामी जनगणनेमध्ये भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश म्हणून समोर येईल. भारतात अल्पसंख्याक असो किंवा बहुसंख्याक असे सर्व समाज जेवढे सुरक्षित आहेत, तितके जगात कुठेही नाहीत."
अनेकदा मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन समाजावर अन्याय होत असल्याच्या बातम्या माध्यमांवर येत असतात, पण हा केवळ एक प्रपोगंडा असल्याचे रिजिजू यांनी स्पष्ट केले. "भारतातून कोणत्याही समुदायाला बळजबरीने देश सोडून जावे लागले आहे, अशी एकही घटना आजवर घडलेली नाही. सर्व भारतीय नागरिकांना येथे समान वागणूक मिळते," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पारशी समाजासाठी 'जिओ पारसी'
भारतातील पारशी समाजाच्या घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त करत रिजिजू यांनी टाटा समूहाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "देशात पारशी समाजाची लोकसंख्या केवळ ५२,००० इतकी आहे. टाटांसारख्या पारशी व्यक्तींचे देशासाठी मोठे योगदान आहे. या समाजाचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून आम्ही त्यांना वाचवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्यासाठी आम्ही खास 'जिओ पारसी' हा कार्यक्रम सुरू केला आहे."
अमेरिकेलाही भारताचे आश्चर्य वाटते
भारताच्या प्रचंड लोकसंख्येचे व्यवस्थापन पाहून अमेरिकेसारखे देशही थक्क होतात, असे मत त्यांनी मांडले. ते म्हणतात, "अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी आहे आणि त्यांना वाटते की तेच जगात सर्वकाही आहेत. पण भारताची लोकसंख्या १४० कोटींपेक्षा जास्त असून, एवढा मोठा देश चालतो कसा, याचा ते विचार करत राहतात. हजारो वर्षांपासून चालत आलेली आमची संस्कृती आणि सर्व धर्म-पंथांना समान मानण्याची वृत्ती हेच या देशाचे सौंदर्य आहे," असे रिजिजू यांनी नमूद केले.
धार्मिक भेदभावाला थारा नाही
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात चालवल्या जाणाऱ्या मोहिमेचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणतात, "मी ज्या भाजप पक्षातून येतो, त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. पण पंतप्रधान मोदींचा 'सबका साथ, सबका विकास' हा नारा दिला होता तेव्हा सर्वांना समाविष्ट करून घेतले होते. हा केवळ नारा नसून ती आमची कामाची पद्धत आहे आणि हा आमचा विचार आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून सरकारी योजनांचा लाभ देताना धर्माच्या नावावर कोणाशीही भेदभाव केलेला नाही. कोणत्याही धर्माला किंवा पंथाला दुखावणारे एकही काम आम्ही केलेले नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -