बांगलादेशने रविवारी देशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत भारताने व्यक्त केलेली चिंता फेटाळून लावली. हिंदू समुदायाच्या सदस्यांशी संबंधित अलीकडील घटना या तुरळक गुन्हेगारी कृत्य असून त्या पद्धतशीर छळाची उदाहरणे नाहीत, असे बांगलादेशने म्हटले आहे.
ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केलेली टिप्पणी जमिनीवरील वास्तवाचे प्रतिबिंब नाही, असे स्पष्ट केले. ही टिप्पणी चुकीच्या आणि अतिशयोक्तीपूर्ण माहितीवर आधारित असल्याचे बांगलादेशने म्हटले आहे. "बांगलादेशची जातीय सलोख्याची दीर्घकालीन परंपरा चुकीच्या पद्धतीने सादर करणाऱ्या अशा कोणत्याही चुकीच्या, अतिशयोक्तीपूर्ण किंवा हेतूने प्रेरित कथांना सरकार स्पष्टपणे नाकारते," असे निवेदनात नमूद आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील कट्टरपंथी घटकांकडून हिंदूंवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचे वर्णन केल्यानंतर दोनच दिवसांनी बांगलादेशचा हा प्रतिसाद आला आहे. नवी दिल्लीने दोषींना न्याय मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. भारत अल्पसंख्याक समुदायांवरील, विशेषतः हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्धांवरील, हिंसाचाराबद्दल गंभीरपणे चिंतित आहे. ढाकाने त्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे भारताने म्हटले होते.
भारताने १८ डिसेंबर रोजी मैमनसिंह येथे २७ वर्षीय हिंदू कामगार दीपू चंद्र दास याच्या जमावाकडून झालेल्या हत्येचा निषेध केला होता. यास जबाबदार असणाऱ्यांना उत्तरदायी धरले जाईल अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली होती. या महिन्यांत राजबारी जिल्ह्यात एका हिंदू व्यक्तीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा संदर्भही परराष्ट्र मंत्रालयाने दिला होता. स्वतंत्र स्त्रोतांनी अलिकडच्या काही महिन्यांत अल्पसंख्याकांविरुद्ध हत्या, जाळपोळ आणि जमीन बळकावणे यांसारख्या हजारो हिंसक घटनांची नोंद केल्याचे भारताने नमूद केले होते.
या संदर्भांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशने म्हटले की, गुन्ह्यांच्या तुरळक घटनांना हिंदूंचा व्यापक छळ असल्याचे भासवण्याचे "पद्धतशीर प्रयत्न" सुरू आहेत. अशा कथा जाणीवपूर्वक वाढवून सांगितल्या जात आहेत. भारत आणि तेथील लोकांमध्ये बांगलादेशविरोधात शत्रुत्व निर्माण करण्यासाठी याचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने राजबारी येथील हल्ल्याच्या प्रकरणावरही भाष्य केले. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची होती. एका मुस्लिम साथीदारासह खंडणी वसूल करताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या साथीदाराला नंतर अटक करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेला अल्पसंख्याकांच्या छळाच्या चष्म्यातून पाहणे "दिशाभूल करणारे आणि तथ्यांशी विसंगत" असल्याचे त्यांनी म्हटले.
भारतातील संबंधित घटकांनी दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवण्यापासून दूर राहावे. अशा कृत्यांमुळे दोन देशांमधील चांगल्या शेजारील संबंधांना आणि परस्पर विश्वासाला तडा जाऊ शकतो, असा इशारा ढाकाने दिला आहे.