२६/११ चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 4 Months ago
अब्दुल सलाम भुट्टावी
अब्दुल सलाम भुट्टावी

 

मुंबईमधील २६/११ ला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला आहे. अब्दुल सलाम भुट्टावी हा पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये होता. लष्कर-ए-तोएबा दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.

कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावी हा ७८ वर्षांचा होता. अब्दुल सलाम भुट्टावी २०२० पासून टेरर फंडीग प्रकरणी म्हणजेच दहशवतवादाला आर्थिक खतपाणी घातल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता.

संयुक्त राष्ट्र संघाकडून २०१२ मध्ये, अब्दुल सलाम भुट्टावीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणात पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०२० मध्ये अब्दुल सलाम भुट्टावीला १६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता.

२००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या अटकेनंतर अब्दुल सलाम भुट्टावीने २००२ आणि २००८ मध्ये लष्कर-ए-तोएबाचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम पाहिलं होतं. लष्करशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुट्टावीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. भुट्टावीचं सोमवारी दुपारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.