पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये १४ वर्षांनंतर थेट विमानसेवा सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

बांगलादेशची राजधानी ढाका येथून निघालेले एक विमान गुरुवारी (२९ जानेवारी २०२६) पाकिस्तानच्या कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. या घटनेमुळे १४ वर्षांनंतर दोन्ही देशांमधील थेट हवाई संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला आहे. पाकिस्तान एअरपोर्ट अथॉरिटीच्या माहितीनुसार, ढाका ते कराची हे विमान बांगलादेश एअरलाइन्सचे विमान (बीजी-३४१) गुरुवारी संध्याकाळी कराचीमध्ये दाखल झाले.

"जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर १४ वर्षांनंतर ढाका येथून उतरलेले हे पहिलेच विमान आहे," असे प्राधिकरणाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. कराची विमानतळावर लँडिंगनंतर बिमान एअरलाइन्सच्या या विमानाचे पारंपरिक वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत करण्यात आले. "हा पाकिस्तान-बांगलादेश मैत्रीतील एक नवा अध्याय आहे. कराची विमानतळावर एका उच्चस्तरीय स्वागत समारंभाने १४ (चौदा) वर्षांनंतर हवाई संपर्क पुन्हा सुरू करण्यात आला," असे पीएएने पुढे नमूद केले आहे.

बांगलादेशात ५ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या प्रचंड आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात वाढत्या जवळीकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड समोर आली आहे. ही एअरलाईन्स आठवड्यातून दोनदा ढाका आणि कराची दरम्यान विमाने चालवणार आहे. दीर्घकालीन परवानगी देण्यापूर्वी प्राथमिक चाचपणी करण्यासाठी एअरलाईन्सला ३० मार्चपर्यंतचा परवाना देण्यात आला असल्याचे सांगितले.

बिमान बांगलादेश एअरलाइन्स ढाका-कराची मार्गावर गुरुवार आणि शनिवारी विमानसेवा देईल, असे एअरलाईन्सने या आठवड्याच्या सुरुवातीला ढाका येथे एका निवेदनात स्पष्ट केले होते. हे विमान स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता ढाका येथून उड्डाण करेल आणि रात्री ११ वाजता कराचीला पोहोचेल. परतीचे विमान कराचीहून मध्यरात्री १२ वाजता निघेल आणि पहाटे ४:२० ढाका येथे पोहोचेल.

अनेक वर्षांच्या तणावपूर्ण संबंधांनंतर व्यापार आणि इतर संबंध वाढवण्यासाठी पाकिस्तान आणि बांगलादेश सरकार गेल्या वर्षापासून थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करत होते.

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ढाका दौरा केला होता. त्यावेळी बांगलादेश आणि पाकिस्तान दरम्यान थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची योजना सर्वप्रथम जाहीर करण्यात आली होती. दार यांचा ढाका दौरा हा एका दशकाहून अधिक काळातील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिलाच उच्चस्तरीय संवाद होता.

पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. प्राधिकरणाने बिमान एअरलाइन्सला या मार्गावर विमान चालवण्यास आणि पाकिस्तानी हवाई हद्दीतील निर्धारित कॉरिडॉर वापरण्यास परवानगी दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.