रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? युक्रेनने शांतता कराराला दिली मंजुरी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. युक्रेन सरकारने डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मध्यस्थी केलेल्या शांतता कराराला सहमती दर्शवली आहे, असे वृत्त आहे. अमेरिकेचे एक अधिकारी आणि युक्रेनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रुस्तम उमेरोव्ह यांनी 'सीबीएस न्यूज'ला सांगितले की, प्रस्तावावर एक सामायिक समज निर्माण झाली असून, आता फक्त तपशील ठरवणे बाकी आहे.

"युक्रेनने शांतता करार मान्य केला आहे," असे अमेरिकन अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजला सांगितले. "काही किरकोळ तपशील सोडवणे बाकी आहे, पण त्यांनी शांतता कराराला होकार दिला आहे."

अमेरिका आणि युक्रेनचे अधिकारी शांतता योजनेवरून त्यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही काही मुख्य मुद्दे अजूनही अनिर्णित आहेत. हा करार मुख्यत्वे रशियाच्या बाजूने झुकलेला असल्याने, आपल्याला बळजबरीने तो स्वीकारायला लावला जाईल का, याची धास्ती युक्रेनला वाटत आहे.

यूएईमध्ये अमेरिकन-रशियन चर्चा

दुसरीकडे, शांतता योजनेवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे एक शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये दाखल झाले आहे. हे शिष्टमंडळ रशियन अधिकाऱ्यांची भेट घेत आहे.

'एक्सिओस'च्या वृत्तानुसार, अमेरिकन लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अबू धाबीमध्ये रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.

ड्रिस्कॉल यांचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जेफ टॉल्बर्ट म्हणाले, "सोमवारी रात्री उशिरा आणि मंगळवारी दिवसभर, सचिव ड्रिस्कॉल आणि त्यांची टीम युक्रेनमध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशियन शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत. चर्चा चांगली सुरू असून आम्ही आशावादी आहोत. या चर्चेदरम्यान सचिव ड्रिस्कॉल व्हाईट हाऊसच्या सतत संपर्कात आहेत."

ट्रम्प यांची २८ कलमी योजना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी २८ कलमी शांतता योजनेचा प्रस्ताव दिला होता.

या योजनेनुसार, युक्रेनला आपला आणखी भूभाग रशियाला द्यावा लागेल. तसेच आपल्या लष्करावर निर्बंध स्वीकारावे लागतील आणि नाटोमध्ये सामील होण्यावर कायमची बंदी असेल. या अटींना युक्रेनने आतापर्यंत 'शरणागती' मानून नाकारले होते.

ट्रम्प यांनी युक्रेनला हा शांतता करार स्वीकारण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ट्रम्प प्रशासन युक्रेनला असा करार स्वीकारण्यासाठी दबाव टाकू शकते, जो रशियाच्या फायद्याचा असेल, अशी भीती युरोपमध्ये व्यक्त केली जात आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेंस्की, जे येत्या काही दिवसांत अमेरिकेला भेट देण्याची शक्यता आहे, त्यांनी सांगितले की, अंतिम दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया कठीण असेल.

शांतता करारावर चर्चा करण्यासाठी भेटलेल्या युक्रेनियन आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी मान्य केले की, प्रादेशिक सवलतींचा सर्वात संवेदनशील मुद्दा थेट दोन्ही नेत्यांमध्ये, म्हणजेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि झेलेंस्की यांच्यातच चर्चिला जाईल.

दरम्यान, रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे की, सुधारित शांतता योजनेमध्ये ऑगस्टमध्ये अलास्का शिखर परिषदेत पुतिन आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या समजुती प्रतिबिंबित झाला पाहिजे.