इजिप्तही आता पाकिस्तानच्या वाटेवर; खाद्यान्नाचे भाव वाढले

Story by  test | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
खाद्यान्नाचे भाव वाढल्याने त्रस्त झालेले इजिप्तचे नागरिक
खाद्यान्नाचे भाव वाढल्याने त्रस्त झालेले इजिप्तचे नागरिक

 

पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असताना आता आणखी एका देशाची स्थिती बिघडली आहे. इजिप्तमध्ये वाढत्या महागाईमुळे नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. खाद्य आयातीवर अवलंबून असलेल्या देशात खाद्यान्नांचे भाव भडकल्याने देशातील सुमारे दहा कोटी लोकांना आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. सुपरमार्केटमध्ये ग्राहकांना केवळ तीन बॅग तांदूळ, दोन बाटली दूध आणि एक बाटली तेल खरेदी करण्याचे बंधन घातले आहे.


न्यूज संकेतस्थळ बिझनेस रिकॉर्डरने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. इजिप्तची राजधानी कैरोतील एक बेकरीत काम करणारी ३४ वर्षीय रिहैब म्हणते, की पूर्वी कैरोत एक फ्लॅटब्रेड (मोठ्या गोल आकाराची पोळी) एका पौंडात मिळत होती. आता त्यासाठी तीन पौंड मोजावे लागत आहेत. माझा नवरा एका महिन्यांत ६ हजार पौंड कमावतो आणि त्यावर संपूर्ण महिना भागायचा. मात्र हेच पैसे आता दहा दिवसांतच संपत आहेत. एका रुग्णालयात चौकीदाराचे काम करणाऱ्या ५५ वर्षीय रेडा नावाच्या व्यक्तीचे तेरा जणांचे कुटुंब आहे. त्याची आर्थिक पत ढासळली आहे. तो म्हणतो, की मांसाहारी भोजनाची किंमत दुप्पट झाली आहे. आता कोणताही पर्याय दिसत नाही. दोन वेतन असतानाही ते पुरेसे ठरत नाही. आता माझ्याकडून आणखी खरेदी शक्य नाही, अशी खंत त्याने बोलून दाखविली.


पारंपरिक फ्लॅटब्रेड महागले

इजिप्तमध्ये पारंपरिक गोल फ्लॅटब्रेडसाठी मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात केली जाते. त्याला इश बल्दादी असेही म्हणतात. इजिप्तमधील आणि अनेक देशातील कष्टकरी कामगारांच्या प्रत्येक जेवणात गोल फ्लॅटब्रेड असतेच. इजिप्तमध्ये १५० ते १८० किलो दरडोई ब्रेड लागते. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे. जागतिक सरासरीनुसार दरडोई ७० ते ८० किलो असे ब्रेडचे प्रमाण आहे.


रशिया युद्धाचा फटका

गेल्यावर्षी फेब्रुवारीत युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर इजिप्तच्या अर्थव्यवस्थेला झटका बसला.जागतिक गुंतवणूकदारांत खळबळ उडाली आणि त्यांनी मोठी गुंतवणूक काढून घेतली. याचा परिणाम इजिप्तवरही झाला. तसेच युद्धामुळे गव्हाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आणि इजिप्तमधील खाद्यान्नाचे भाव वाढले. जगात सर्वाधिक धान्य आयात करणाऱ्या देशांत इजिप्तचा समावेश होतो. त्यामुळे परकी भांडवलावर ताण वाढला. जागतिक इंधन दरात सतत वाढ होत असल्याने इजिप्तला अधिक पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर १८ टक्क्यांवर पोचला.


सरकारचे गैरव्यवस्थापन जबाबदार

अमेरिका स्थित तहरिर इन्स्टिट्​यूट फॉर मिडल इस्ट पॉलिसीचे अभ्यासक टिमोथी काल्दस म्हणाले, की इजिप्तचे अध्यक्ष अबदेल फतेह अल सिसी यांना स्वत:कडे सत्ता ठेवायची आहे, परंतु देशातील आर्थिक दुरवस्थेची जबाबदारी स्वीकारायची नाही. इजिप्तच्या अर्थव्यवस्थेचा पाया गेल्या काही काळापासून डळमळीत झाला आहे. यामागे सरकारचे गैरव्यवस्थापन जबाबदार आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणे साहजिकच होते, परंतु या स्थितीने इजिप्तच्या अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा उघड झाला. इजिप्तच्या अर्थव्यवस्थेत निर्णायक आणि महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. यात राजकीय हस्तक्षेप कमी करणे गरजेचे आहे.