गाझामध्ये गेल्या २२ महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॅलेस्टिनी गट हमासने कतार आणि इजिप्त या अरब देशांनी मध्यस्थी केलेला युद्धविराम प्रस्ताव स्वीकारल्याची घोषणा केली आहे. मात्र, इस्रायलने अद्याप या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नसल्याने आणि हल्ले सुरूच ठेवण्याचे संकेत दिल्याने, शांततेचा मार्ग अजूनही खडतर दिसत आहे.
सोमवारी हमासने एका निवेदनात म्हटले की, "हमास आणि इतर पॅलेस्टिनी गटांनी कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारला आहे." या युद्धात आतापर्यंत ६२,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दीड लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
या प्रस्तावात इस्रायली सैन्याची माघार आणि कायमस्वरूपी युद्धविरामासाठीच्या चर्चेची हमी यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. इजिप्त आणि कतारने हा प्रस्ताव इस्रायलकडे पाठवला आहे.
तथापि, या घोषणेमुळे युद्ध तात्काळ थांबेल याची शाश्वती नाही. यापूर्वीही अनेकदा हमासने युद्धविराम प्रस्ताव स्वीकारले होते, परंतु इस्रायलने ते फेटाळून लावत युद्ध सुरूच ठेवले होते. "जोपर्यंत आमचे सर्व ओलिस सुटत नाहीत आणि हमास पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही," अशी भूमिका इस्रायलने सातत्याने घेतली आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दावा केला आहे की, "गाझा शहरावर कब्जा करण्याच्या इस्रायली लष्कराच्या योजनेमुळे घाबरूनच हमास चर्चेसाठी तयार झाला आहे."
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, गाझामधील मानवतावादी संकट अधिकच गडद झाले आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून, त्यात महिला आणि मुलांची संख्या मोठी आहे. आता इस्रायल या प्रस्तावावर काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.