इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके इन्साफ’ या पक्षावर बंदीची शक्यता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 6 d ago
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

 

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके इन्साफ’ (पीटीआय) या पक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारकडून सुरू आहे. खुद्द संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीच तसा अधिकृत खुलासा केला. इम्रान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी लष्करी तळे आणि बड्या अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले केल्याने तणाव निर्माण झाला होता. याची लष्कराने गंभीर दखल घेतली आहे.

पाकिस्तानी रेंजर्संनी नऊ मे रोजी इमरान यांना अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. इम्रान समर्थकांनी लष्करी कार्यालये आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर हल्ले केले होते. लाहोरच्या कोअर कमांडरचे घर, मियाँवाली हवाई तळ आणि फैसलाबादमधील आयएसआयच्या इमारतीवर देखील हल्ले करण्यात आले होते.

रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावर प्रथमच जमावाकडून हल्ला झाला होता. या हिंसाचारामध्ये दहाजणांचा मृत्यू झाला होता. इम्रान यांनी अद्याप त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केलेला नाही त्यामुळे त्यांच्या पक्षावर बंदी घालण्याचा विचार सरकार दरबारी गांभीर्याने सुरू आहे, असे ख्वाजा यांनी स्पष्ट केले.

‘पीटीआय’चे नेते बॅ. अली जाफर म्हणाले, "आमच्या पक्षावर बंदी घातली तर, आम्ही याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ. अगदी १९६० मध्ये जमात-ए- इस्लामी या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णयसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता."