चीनचा पुन्हा हास्यास्पद दावा! अरुणाचलच्या महिलेला शांघायमध्ये रोखले

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 9 h ago
चीनमध्ये अडकलेली अरुणाचली महिला
चीनमध्ये अडकलेली अरुणाचली महिला

 

अरुणाचल प्रदेशातील एका भारतीय महिलेला चीनमधील शांघाय विमानतळावर १८ तासांहून अधिक काळ ताब्यात घेऊन मानसिक त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे भारत आणि चीनमध्ये पुन्हा एकदा मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. भारताने या प्रकाराची गंभीर दखल घेत बीजिंग आणि नवी दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी चीनकडे कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. भारताने चीनच्या या कृतीला 'हास्यास्पद' आणि 'अस्वीकार्य' म्हटले आहे.

नेमके काय घडले?
पेंबा वांग थोंगडोक या भारतीय महिला प्रवासी २१ नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानला जात होत्या. त्यांच्या विमानाचा शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन तासांचा थांबा होता. मात्र, तिथे पोहोचल्यावर चीनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट स्वीकारण्यास नकार दिला.

अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, त्यांचे जन्मस्थान 'अरुणाचल प्रदेश' हे 'चीनचे क्षेत्र' आहे, त्यामुळे त्यांचा भारतीय पासपोर्ट 'अवैध' आहे. या विचित्र कारणास्तव त्यांना १८ तासांहून अधिक काळ विमानतळावरच रोखून ठेवण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली.

सोशल मीडियावर संताप
या त्रासाला कंटाळून थोंगडोक यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर आपली आपबिती मांडली. त्यांनी लिहिले, "मला शांघाय विमानतळावर २१ नोव्हेंबर २०२५ रोजी १८ तासांहून अधिक काळ रोखून ठेवण्यात आले. चीन इमिग्रेशन आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सने दावा केला की, माझे जन्मस्थान अरुणाचल प्रदेश असल्याने माझा भारतीय पासपोर्ट अवैध आहे. त्यांच्या मते अरुणाचल हे चीनचे क्षेत्र आहे."
त्यांची ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आणि भारतीयांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी भारतीय अधिकारी आणि माध्यमांचे लक्ष वेधले.

भारताचे चोख प्रत्युत्तर
ही घटना समजताच नवी दिल्लीने तातडीने हालचाली केल्या. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने एकाच दिवशी बीजिंग आणि नवी दिल्लीत चीन सरकारकडे कडक निषेध नोंदवला. शांघायमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने तात्काळ हस्तक्षेप करून स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि अडकलेल्या भारतीय प्रवाशाला पूर्ण मदत पुरवली.

भारताने चीनला स्पष्ट शब्दांत सुनावले की, अशा कारणास्तव प्रवाशाला रोखून ठेवणे हे पूर्णपणे 'हास्यास्पद' आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तेथील सर्व रहिवाशांना भारतीय पासपोर्ट बाळगण्याचा आणि प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. चीनचा हा नकार 'आधारहीन आणि प्रक्षोभक' असल्याचे भारताने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन
भारताने हे देखील निदर्शनास आणून दिले की, चीनची ही कृती 'शिकागो आणि मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन्स'चे थेट उल्लंघन आहे. हे करार जागतिक नागरी विमान वाहतुकीचे नियम ठरवतात, ज्यात ट्रान्झिट प्रवाशांशी कसे वागावे, याचे स्पष्ट निर्देश आहेत. फक्त थांब्यादरम्यान वैध भारतीय पासपोर्ट नाकारणे हे आंतरराष्ट्रीय निकषांचा भंग आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सध्या दोन्ही देश द्विपक्षीय संबंध पूर्ववत करण्यासाठी नाजूक चर्चा करत आहेत. अशा वेळी, अशा घटना 'अनावश्यक अडथळे' निर्माण करतात, अशी चिंता भारताने व्यक्त केली आहे. बीजिंगच्या अशा वागणुकीमुळे विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसू शकते, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे.