गाझा शांतता प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी इस्रायल आणि हमासचे शिष्टमंडळ आज (सोमवार) इजिप्तमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही बाजूंना 'वेगाने पावले उचलण्याचा' आणि दिरंगाई केल्यास 'भयंकर रक्तपात' होण्याचा गंभीर इशारा दिला आहे. या घडामोडींमुळे शांतता करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत.
अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या 'Truth Social' प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, "वेळ अत्यंत महत्त्वाची आहे, नाहीतर मोठा रक्तपात होईल - जे कोणालाही पाहायचे नाही! मी सर्वांना वेगाने पावले उचलण्यास सांगत आहे." त्यांनी सांगितले की, आठवड्याच्या शेवटी हमास आणि इतर देशांसोबत बंधकांच्या सुटकेवर आणि युद्ध संपवण्यावर "अत्यंत सकारात्मक चर्चा" झाली आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही काहीसा नरमाईचा सूर लावला आहे. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी आशा व्यक्त केली की, "येत्या काही दिवसांतच" सर्व बंधकांच्या सुटकेची घोषणा होऊ शकेल.
मात्र, नेतन्याहू यांनी आपली कठोर भूमिकाही कायम ठेवली आहे. ते म्हणाले, "या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात हमासला नि:शस्त्र केले जाईल, मग ते ट्रम्प यांच्या योजनेनुसार मुत्सद्देगिरीने असो किंवा आमच्या लष्करी मार्गाने. हे सोप्या किंवा अवघड मार्गाने, पण होणारच." त्यांनी स्पष्ट केले की, इस्रायली सैन्य गाझामधून पूर्णपणे माघार घेणार नाही.
यामुळे, इजिप्तमध्ये होणाऱ्या बैठकीत पहिल्या टप्प्यात बंधकांच्या सुटकेवर सहमती होण्याची शक्यता वाढली आहे, पण हमासला नि:शस्त्र करण्याच्या मुद्द्यावरून दुसऱ्या टप्प्यात मोठे अडथळे येऊ शकतात.