'हिज्बुल्लाने शस्त्रत्याग केल्यास माघार'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू
इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

 

लेबनॉनमधील हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेने शस्त्रत्याग केल्यास त्या देशातून सैन्य माघारी घेऊ, असे आश्वासन इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिले आहे, तसेच, हिज्बुल्लाच्या निःशस्त्रीकरणासाठी प्रयत्न करण्याच्या लेबनॉन मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांना यात सहकार्य करण्याचे आवाहनही नेतान्याहू यांनी केले आहे.

इस्त्राईल आणि हिज्बुल्ला यांच्यात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. तत्पूर्वी इस्त्राईलने लेबनॉनमध्ये अनेक हल्ले करत हिज्बुल्लाच्या बहुतांश म्होरक्यांना ठार मारले. इस्त्राईलच्या काही तुकड्या लेबनॉनमध्येही तैनात आहेत. हे सैनिक माघारी घेतल्याशिवाय आम्ही शस्त्रे खाली ठेवणार नाही, असे हिज्बुल्लाने स्पष्ट केले आहे. तसेच, लेबनॉनमधील पाच टेकड्यांवर हिज्बुल्लाचा ताबा असून या भागात इस्राईलकडून अजूनही हल्ले होत आहेत. हे हल्लेही तातडीने थांबविण्याची मागणी हिज्बुल्लाने केली आहे. या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांनी हिज्बुल्लाला शस्त्रत्याग करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये लेबनॉनने सहकार्य केल्यास आम्हीही टप्प्याटप्प्यात सैन्य माघारी घेऊ, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

चार पत्रकारांचा मृत्यू
देर अल बाला : इस्राईलकडून गाझा पट्टीत हल्ले सुरूच असून, आज खान युनिस शहरातील नासिर रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला. यापैकी चार जण पत्रकार असून त्यात 'असोसिएटेड प्रेस'च्या एकाचा समावेश आहे. गाझा पट्टीत उपासमारीचे संकट असून अनेक लहान मुलांना कुपोषणाचा सामना करावा लागत आहे. अशा बालकांवर उपचार सुरू असून त्यासंदर्भात वार्तांकन करण्यासाठी हे पत्रकार संबंधित रुग्णालयात गेले होते. याचवेळी इस्त्राईलने रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला. पहिल्या हल्ल्यानंतर बचावपथक रुग्णालयात गेले असता दुसऱ्यांदा क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देण्यास इस्त्राईलने नकार दिला आहे.