गाझाच्या रुग्णालयावर इस्रायलचा हवाई हल्ला, ५ पत्रकारांसह २० ठार; नेतन्याहूंनी व्यक्त केली दिलगिरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गाझा पट्टीतील नासेर रुग्णालयावर सोमवारी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात पाच पत्रकारांसह किमान २० जण ठार झाले. या घटनेनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'तीव्र दिलगिरी' व्यक्त केली असून, या घटनेला एक 'दुःखद चूक' म्हटले आहे.

या हल्ल्यानंतर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नेतन्याहू यांनी 'X' वर एक पोस्ट करून म्हटले, "गाझाच्या नासेर रुग्णालयात आज झालेल्या दुःखद चुकीबद्दल इस्रायल तीव्र दिलगिरी व्यक्त करतो." त्यांनी यावर भर दिला की, इस्रायल नागरिकांना लक्ष्य करत नाही आणि पत्रकार, वैद्यकीय कर्मचारी आणि या संघर्षात अडकलेल्या सर्व व्यक्तींच्या कामाचा आदर करतो.

"आमचे युद्ध हमासच्या दहशतवाद्यांशी आहे. हमासला हरवणे आणि आमच्या ओलिसांना घरी परत आणणे हे आमचे न्याय्य ध्येय आहे," असेही ते म्हणाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

इस्रायली लष्कराची भूमिका
इस्रायली संरक्षण दलाने (IDF) या भागात हल्ला केल्याचे मान्य केले आहे आणि लष्करप्रमुखांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन म्हणाले की, "आम्ही नेहमीप्रमाणे, आमचे निष्कर्ष शक्य तितक्या पारदर्शकपणे सादर करू." "सक्रिय युद्ध क्षेत्रातून वार्तांकन करणे अत्यंत धोकादायक असते, विशेषतः हमाससारख्या दहशतवादी संघटनेसोबतच्या युद्धात, जी नागरिकांच्या मागे लपते," असेही ते म्हणाले.

जागतिक स्तरावरून निषेध
'कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स' (CPJ) या संघटनेने या हल्ल्याचा निषेध करत म्हटले, "आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलला पत्रकारांवर होत असलेल्या बेकायदेशीर हल्ल्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे."

पॅलेस्टिनी पत्रकार संघाने म्हटले की, "हा घृणास्पद गुन्हा म्हणजे माध्यमांचा आवाज दाबण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे." फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले, "हे असह्य आहे. नागरिक आणि पत्रकारांचे सर्व परिस्थितीत संरक्षण झाले पाहिजे. माध्यमांना संघर्षाचे वास्तव कव्हर करण्यासाठी मुक्तपणे आणि स्वतंत्रपणे काम करता आले पाहिजे."

ट्रम्प यांचा युद्धावर मोठा दावा
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, गाझामधील युद्ध पुढील दोन ते तीन आठवड्यांत "निर्णायक अंतापर्यंत" पोहोचेल. "मला वाटते की पुढील दोन ते तीन आठवड्यांत, तुम्हाला एक चांगला, निर्णायक... एक निर्णायक शेवट दिसेल," असे ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांना सांगितले.