पाकिस्तानातील ऐतिहासिक करतारपूर साहिब गुरुद्वारा परिसर जलमय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यात रावी नदीकाठी वसलेले शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचे अंतिम विश्रामस्थळ असलेले ऐतिहासिक दर्बार साहिब करतारपूर बुधवारी सकाळी पुराच्या पाण्यात बुडाले. परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पठाणकोट जिल्ह्यातील रणजित सागर धरणातून जादा पाण्याचा विसर्ग करावा लागला.

सीमेपलीकडील दृश्यांमध्ये करतारपूर साहिब गुरुद्वारा ७ फूट पाण्याखाली बुडालेला दिसला. रावी नदीच्या पुरामुळे हा परिसर पाण्याखाली गेला आहे. गुरुद्वारा आणि आजूबाजूची शेतेही ७ फूट पाण्याखाली आहेत. गुरुद्वारा गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक या पवित्र गावाशी ४.५ किलोमीटर लांबीच्या करतारपूर साहिब कॉरिडॉरने जोडला गेला आहे.

रावी नदीत पाण्याची पातळी अभूतपूर्व वाढल्याने लंगर हॉल, परिक्रमा, सरोवर आणि सराय ५ ते ७ फूट पाण्याखाली गेले. पण गुरुद्वाराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेले गुरु ग्रंथ साहिबांचे पवित्र स्वरूप सुरक्षित आहे, असे गुरुद्वारा सूत्रांनी सांगितले. इतर धार्मिक ग्रंथ, जसे गटका (गुरबाणीचे छोटे पुस्तक), हेही सुरक्षित आहेत आणि सेवादारांच्या देखरेखीखाली आहेत.

करतारपूर साहिब कॉरिडॉर २०१९ मध्ये गुरु नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले होते. हा गुरुद्वारा भारत-पाकिस्तान सीमेपासून ४ किलोमीटर अंतरावर आहे. पण मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर सुरू झाले तेव्हा हा कॉरिडॉर भारताकडून बंद करण्यात आला. २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ही मोहीम सुरू झाली होती.

या कॉरिडॉरमुळे भारतीय शीख भाविकांना व्हिसाशिवाय गुरुद्वारात जाण्याची सुविधा मिळाली होती. द्विपक्षीय करारानुसार शेवटचा भाविकांचा जथ्था ७ मे रोजी गुरुद्वाराला भेट देऊन गेला.दरम्यान, झिरो लाइनजवळची शेते रावी नदीने धुशी बंधाऱ्यावरून वाहताना पाण्याखाली गेली आहेत. यामुळे डेरा बाबा नानक गावावर पुराचा धोका निर्माण झाला आहे.