असह्य उन्हाळा : मानवजातीच्या हाती फक्त दोन वर्षे

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 17 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

वैश्विक तापमानवाढीमुळे पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळू लागला असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मानवजातीच्या हातामध्ये आता फक्त दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पृथ्वीचे वाढते तापमान रोखण्यासाठी आपल्याला तशी वित्तीय व्यवस्था उभारावी लागणार असून हा मोठा बदल घडवून आणण्यासाठी आणखी कमी वेळ हातामध्ये असल्याचे ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज’चे कार्यकारी सचिव सायमन स्टेईल यांनी म्हटले आहे. ‘चांथम हाउस’ या विचारगटाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कर्बन वायू उत्सर्जनाला पायबंद घालण्यासाठी जगातील प्रमुख देशांसमोर २०२५ ची डेडलाईन असेल. विशेष म्हणजे यंदाच जगातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या ही मतदानाच्या प्रक्रियेला सामोरे जाते आहे. वॉशिंग्टनमध्ये पुढील महिन्यात जागतिक वित्तीय संस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची आखणी करणे गरजेचे असल्याचे स्टेईल यांनी सांगितले.

‘माझा इशारा अतिशोयक्तीपूर्ण वाटू शकतो, पण आपल्या हाती फार कमी वेळ राहिला आहे एवढे मात्र नक्की! हरितगृह वायूंचे उत्सर्जन रोखण्यासाठी आपल्याला नव्या पिढीचा मजबूत आराखडा तयार करावा लागेल. हा विषय काही प्रभावशाली व्यक्तींच्या भाषणापुरता मर्यादित नाही. पर्यावरणबदलाचा परिणाम हा प्रत्येक घटकावर होत असून आता प्रत्येक व्यक्ती त्याचा गांभीर्याने विचार करू लागली आहे,’ असे स्टेईल यांनी सांगितले.

तर दुष्काळही संपेल
वैश्विक तापमानवाढीमुळे पिके उद्‍ध्वस्त करणाऱ्या दुष्काळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कर्ब उत्सर्जनाला तातडीने रोखावे लागेल. तशा रणनीतीचा अंगीकार केल्याने अन्न सुरक्षा वाढू शकते तसेच भुकेचे प्रमाणही कमी होऊ शकते. पारंपरिक इंधनाचा वापर कमी केल्याने पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच लोकांच्या पैशांची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल असे स्टेईल म्हणाले.