मुंबईच्या प्रदूषणामुळे हिना खानची प्रकृती बिघडली, 'त्या' पोस्टने वेधले लक्ष

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
अभिनेत्री हिना खान
अभिनेत्री हिना खान

 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या स्तनाच्या कर्करोगाशी लढा देत आहे. केमोथेरपी आणि कठीण उपचारांना सामोरे जात असतानाच तिला आता मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने आपल्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत असल्याचे हिना खानने सांगितले आहे. सततचा खोकला आणि श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे.

हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबद्दल (AQI) संताप व्यक्त केला आहे. तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये मुंबईचा 'एअर क्वालिटी इंडेक्स' २०९ इतका दिसत आहे. हा स्तर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. या प्रदूषित हवेमुळे हिनाच्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला आहे.

आपली व्यथा मांडताना हिना खानने लिहिले आहे की, "हे नक्की काय चालले आहे? मला श्वासही घेता येत नाहीये. या प्रदूषणामुळे मला माझे घराबाहेरचे काम आणि फिरायला जाणे कमी करावे लागले आहे. सतत खोकला येत आहे. सकाळच्या वेळी तर परिस्थिती खूपच वाईट असते." तिच्या या पोस्टवरून तिला होणारा त्रास स्पष्टपणे जाणवतो.

हिना खान सध्या तिसऱ्या स्टेजच्या कर्करोगावर उपचार घेत आहे. अशा परिस्थितीत रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमी झालेली असते. त्यामुळे प्रदूषण आणि धुळीचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. हिना खानला नेमका हाच त्रास जाणवत आहे. सकाळी उठल्यावर धुक्यासारखे वाटणारे वातावरण प्रत्यक्षात प्रदूषण असल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे.