धर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम कर्मचाऱ्याने उभारले हनुमानाचे मंदिर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
लालसाब रसलसाब बुदिहाळ
लालसाब रसलसाब बुदिहाळ

 

उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या सुरक्षा विभागातील एका मुस्लिम कर्मचाऱ्याने समाजापुढे अनोखा आदर्श घालून दिला आहे. धारवाड बस डेपोच्या आवारात या कर्मचाऱ्याने हनुमानाचे मंदिर उभारले आहे. मंदिराचे बांधकाम गेल्या वर्षीच पूर्ण झाले होते. मात्र आत्ता या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

६० वर्षीय लालसाब रसलसाब बुदिहाळ असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. स्वसमाजातील नेते आणि महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध झुगारून त्यांनी हे काम हाती घेतले. स्वतःचे पैसे खर्च करून आणि विभागातील सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला.

मंदिराच्या बांधकामावरून सुरक्षा आणि दक्षता विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. ही माहिती स्वतः बुदिहाळ यांनी स्थानिक मीडियाला दिली. मंदिरात प्रतिष्ठापना करण्यासाठी आणलेली मूर्ती नवीन डेपोच्या आवारात ठेवली होती.

याविषयी बुदिहाळ सांगतात, "नवीन डेपोत कामावर असताना मला ती मूर्ती पार्किंगच्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेली दिसली. देवतेची अशी अवहेलना पाहून खूप दुःख झाले. त्याच वेळी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी माझ्या प्रयत्नांना विरोध केला. पण कामाचे महत्त्व आणि समर्पण यामुळे मी पुढे जात राहिलो. हे केवळ मंदिर नाही. बंधुभाव आणि इतर धर्मांप्रती असलेल्या आदराचे ते प्रतीक आहे."

डेपोतील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या सुरुवातीला काही कर्मचाऱ्यांनी साथ दिली होती. मात्र दक्षता पथकाने निलंबनाची भीती दाखवताच त्यांनी माघार घेतली. लालसाब मात्र कधीच मागे हटले नाहीत. 

उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “लालसाब अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यामुळे मंदिराचे बांधकाम थांबवण्यासाठी विरोधकांना कोणतेही ठोस कारण सापडले नाही. एका टप्प्यानंतर तर मुस्लिम समाजातील बहुतांश कर्मचाऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिला.”

लालसाब यांच्या या कृतीमुळे धारवाड डेपोमध्ये केवळ मंदिरच उभे राहिले नाही, तर दोन धर्मांमधील अंतर कमी करणारा एक पूलही तयार झाला आहे. धर्माच्या भिंती ओलांडून माणुसकीचा हा विजय नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter