नेपाळमधील भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेपाळच्या पर्सा जिल्ह्यातील बीरगंज शहरात निदर्शने आणि हिंसाचार सुरू झाला. या घटनेनंतर नेपाळमधील पर्सा आणि धनुषा या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
धनुषा जिल्ह्यातील कमला नगरपालिकेत राहणाऱ्या हैदर अन्सारी आणि अमानत अन्सारी या दोन व्यक्तींनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये काही धार्मिक समुदायांबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या होत्या, असा आरोप आहे. स्थानिक लोकांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले; व्हिडिओमुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, त्यानंतर कमला येथील सखुवा मारन भागात एका मशिदीची तोडफोड करण्यात आली. यामुळे धार्मिक तणाव आणखी वाढला आणि लोक रस्त्यावर उतरले.
या निदर्शनांदरम्यान हिंदू संघटनांनी आरोप केला की, त्यांच्या देवतांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले गेले आहेत. यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. लवकरच या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि स्थानिक पोलीस ठाण्याची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अर्धा डझनहून अधिक अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे प्रशासनाने बीरगंजमध्ये कर्फ्यू (संचारबंदी) लागू केला आहे. सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. बीरगंज आणि आसपासच्या भागातील तणाव पाहता भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) सीमा पूर्णपणे सील केली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी सीमेवरील सामान्य नागरिकांची ये-जा थांबवली असून केवळ आपत्कालीन सेवांनाच परवानगी दिली जात आहे.