मानवतेचा, प्रेमाचा आणि सलोख्याचा संदेश देणाऱ्या सुफी परंपरेचे प्रतीक असलेल्या हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दीन रफाई (रहमतुल्ला आलय) यांच्या ७११ व्या उरुसाला कंधारमध्ये भक्तिभावात मंगळवारी सुरवात झाली. उरुसानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे व राष्ट्रीय एकतेचे प्रभावी दर्शन घडले.
सुफी संतांनी दिलेला 'धमपिक्षा माणूस मोठा', हा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. हजरत हाजी सय्याह यांनी आपल्या आयुष्यातून प्रेम, करुणा, समता आणि बंधुभावाचा प्रसार केला. त्या सुफी विचारधारेचा प्रत्यय उरुसादरम्यान कंधारमध्ये पाहायला मिळाला. नगराध्यक्ष शहाजी नळगे, उरुस कमिटीचे अध्यक्ष जफरोद्दीन बाहोदिन, नगरसेवक मन्नान चौधरी, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, माजी सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, स्वप्निल पाटील लुंगारे, नगरसेवक भास्कर नळगे, जीवन पाटील लुंगारे, हमीद सुलेमान, नगरसेवक सुधाकर कांबळे, राम बनसोडे, सहास कांबळे, समीर चाऊस, सतीश देवकते, सय्यद अमजद, केशव जाधव, मधुकर पाटील डांगे आदींनी दर्शन घेतले.
संदल मिरवणुकीने प्रारंभ
मंगळवारी फातेहाखानीनंतर दर्याचे सज्जादा सय्यद शाह मुर्तुजा मोहीयोद्दीन रफाई कादरी व मुतवल्ली सय्यद शाह मुजतवा मोहीयोद्दीन रफाई कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पाचला दर्यातून संदल मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत सर्व जाती व धर्मातील नागरिक, भाविक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होत भाविकांना दर्शन देत मिरवणूक रात्री उशिरा दर्यात पोहोचली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हजारो भाविक दाखल
मिरवणुकीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध आदी विविध समाजातील लोक खांद्याला खांदा लावून सहभागी झाले. त्यामुळे सुफी परंपरेतून सामाजिक एकात्मतेचा संदेश अधिक ठळकपणे समोर आला. हजरत हाजी सय्याह यांचा दर्गा महाराष्ट्रासह कर्नाटक व तेलंगणा राज्यांत प्रसिद्ध असून, उरुसाच्या निमित्ताने हजारो भाविक कंधारमध्ये दाखल झाले.