व्हेनेझुएलातील अस्थिरतेबाबत संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांकडून चिंता व्यक्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस

 

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्हेनेझुएलामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आणि तिथे अस्थिरता वाढण्याच्या शक्यतेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. व्हेनेझुएलाचे नजीकचे भविष्य अनिश्चित असल्याचे सांगत त्यांनी वाढती अस्थिरता, त्याचे प्रादेशिक परिणाम आणि देशांमधील संबंधांसाठी निर्माण होणारा धोकादायक पायंडा यांबद्दल गंभीर इशारा दिला आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर हेच मुख्य मार्गदर्शक तत्त्व राहिले पाहिजे, यावर सरचिटणीसांनी भर दिला. ३ जानेवारी रोजी झालेल्या लष्करी कारवाईदरम्यान बळाचा वापर करण्यासंबंधीच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही, याबद्दल त्यांनी चिंता बोलून दाखवली. संयुक्त राष्ट्रांची सनद कोणत्याही देशाच्या प्रादेशिक अखंडतेविरुद्ध किंवा राजकीय स्वातंत्र्याविरुद्ध बळाचा वापर करण्यास किंवा तशी धमकी देण्यास स्पष्टपणे मनाई करते, याची आठवण त्यांनी करून दिली. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा टिकवून ठेवणे हे सर्व सदस्य देशांनी सनदेच्या सर्व तरतुदींचे अखंडपणे पालन करण्यावर अवलंबून आहे, असे त्यांनी निक्षून सांगितले.

व्हेनेझुएलाने गेल्या काही दशकांपासून अंतर्गत अस्थिरता तसेच सामाजिक आणि आर्थिक उलथापालथ सहन केली आहे. यामुळे लोकशाही कमकुवत झाली असून लाखो नागरिकांना देश सोडून जावे लागले आहे, असे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी नोंदवले. सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे वर्णन करतानाच, अजूनही 'मोठा आणि अधिक विनाशकारी भडका' रोखणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मानवाधिकार, कायद्याचे राज्य आणि जनतेच्या सार्वभौम इच्छेचा आदर यावर आधारित भविष्‍याची दिशा ठरवण्यासाठी व्हेनेझुएलातील सर्व संबंधित घटकांनी सर्वसमावेशक संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन गुटेरेस यांनी केले आहे. अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपानंतर आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी सोमवारी सुरक्षा परिषदेला संबोधित करताना हे विचार मांडले.