पाकिस्तानात कारखान्यांपेक्षा मशिदी आणि मदरसेच जास्त

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

पाकिस्तानच्या पहिल्या आर्थिक जनगणना अहवालानुसार पाकिस्तानात ६,००,००० हून अधिक मशिदी आणि ३६,००० मदरसे आहेत, तर कारखान्यांची संख्या फक्त २३,००० आहे. आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तानने ७ अब्ज डॉलर्सच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपुढे हात पसरले असून, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

'एक्सप्रेस ट्रिब्यून'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आर्थिक क्षेत्राशी संबंधित आकडेवारी लोकसंख्या आणि गृहनिर्माण जनगणना २०२३ चा एक भाग म्हणून गोळा करण्यात आली होती. त्याचे तपशील नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेची रचना आणि वैशिष्ट्ये यांचे संपूर्ण आणि सविस्तर चित्र उपलब्ध करून देणे; तसेच उद्योगांची प्रकृती, आकारमान, रोजगार आणि मालकी याबाबत माहिती गोळा करणे आदी गोष्टी आर्थिक जनगणना अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. नियोजनमंत्री अहसान इक्बाल यांनी प्रसिद्ध केलेल्या सविस्तर अहवालानुसार, देशात २३,००० कारखाने आणि किमान ६,४३,००० लघुउत्पादन केंद्रे आहेत. पाकिस्तानातील एकूण ४ कोटी कायमस्वरूपी युनिट असून, सन २०२३ मध्ये विविध कंपन्यांमध्ये २ कोटी ५४ लाख लोक कार्यरत होते. एकूण २ कोटी ५४ लाख मजुरांपैकी सर्वाधिक लोक सेवा क्षेत्रात गुंतलेले असून, ते एकूण कार्यबलाच्या ४५ टक्के म्हणजेच १ कोटी १३ लाख इतके आहेत, असे अहवालात नमूद केले आहे.

सामाजिक क्षेत्रात ३० टक्के म्हणजेच ७६ लाख मजूर कार्यरत आहेत, तर उत्पादन क्षेत्रात एकूण क्रयशक्तीपैकी फक्त २२ टक्के लोक कार्यरत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सेवा क्षेत्रात उत्पादन क्षेत्राच्या दुप्पट मजूर कार्यरत असून, उद्योग हा देशातील रोजगारनिर्मितीचा प्रमुख क्षेत्र आहे हा समज चुकीचा ठरतो. नोंदवण्यात आलेल्या ७२ लाख आस्थापनांपैकी प्रमुख वर्गवारीत २७ लाख किरकोळ दुकाने, १,८८,००० घाऊक दुकाने, २,५६,००० हॉटेल आणि १,१९,००० रुग्णालये यांचा समावेश होतो. शैक्षणिक संस्थांमध्ये २,४२,००० हुन अधिक शाळा, ११.५६८ महाविद्यालये, २१४ विद्यापीठे आहेत. याशिवाय ६,०४,००० मशिदी आणि ३६,३३१ मदरसे आहेत. एकूण २,४२,६१६ शाळांपैकी बहुतांश शाळा सरकारी असून, ११,५६८ महाविद्यालयपिकी खासगी क्षेत्राचा हिस्सा किंचित जास्त आहे.

लघु उद्योजक जास्त
अहवालानुसार, पंजाब आणि सिंध, विशेषतः कराची विभागात, आर्थिक आस्थापने आणि कामगारांचे सर्वाधिक प्रमाण आहे, तर खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान शेवटी येतात. अहवालात असेही नमूद केले आहे की, पाकिस्तानमधील बहुतांश व्यवसाय लघु स्तरावरील असून ते मोजक्या लोकांना रोजगार देतात. सुमारे ७१ लाख आर्थिक रचनांमध्ये १ ते ५० लोक कार्यरत आहेत, तर ५१ ते २५० लोकांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांची संख्या फक्त ३५, ३५१ आहे. २५० हून अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांची संख्या फक्त ७,०८६ इतकी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पंजाब प्रांतात अधिक आस्थापना
पाकिस्तानमधील बहुतांश आस्थापना पंजाब प्रांतामध्ये असून, त्या एकूण आस्थापनांच्या ५८ टक्के आहेत. त्यानंतर सिंधमध्ये २० टक्के, खैबर पख्तुनख्वामध्ये १५ टक्के आणि बलुचिस्तानमध्ये केवळ सहा टक्के आस्थापना आहेत.