पाकिस्तानची गरीबी ! चक्क फळे झाली इंधनापेक्षा महाग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 8 Months ago
पाकिस्तानातील अर्थव्यवस्था बिकट स्थितीत
पाकिस्तानातील अर्थव्यवस्था बिकट स्थितीत

 

पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. दैनंदिन जीवनातील वस्तू महाग होत असून कांद्याच्या किमतीत तब्बल २२८.२८ टक्के वाढ नोंदली गेली आहे. गव्हाच्या पिठाचे भाव देखील १२०.६६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. धान्याप्रमाणेच फळेही महागली असून केळी आणि द्राक्षांचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत.

 

सध्याच्या सणासुदीच्या काळातही पाकिस्तानातील अर्थव्यवस्था बिकट स्थितीत सापडली आहे. गरजेच्या वस्तूंची टंचाई असून त्यांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पाकिस्तानात एक डझन केळीसाठी ५०० रुपये (पाकिस्तानी) मोजावे लागत आहेत. तसेच द्राक्षाचा एका किलोचा भाव १६०० रुपयांवर पोचला आहे. हा भाव इंधनापेक्षा अधिक आहे. इंधनाचे दर १०२.८४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर येथील सभेत पाकिस्तानला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम सादर केला.

 

पाकिस्तानात गुंतवणूक वाढविण्यासाठी परदेशस्थ पाकिस्तानी नागरिकांना प्रोत्साहित करण्याची भूमिका इम्रान खान यांनी मांडली. या नागरिकांनी पाकिस्तानला मदत केली तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. देशात डॉलर आणणारे आणि निर्यात करणाऱ्या लोकांना पाकिस्तान सरकार मदत करेल, असे इम्रान खान म्हणाले. दुसरीकडे आयएमएफने पाकिस्तानसमोर अटी ठेवल्या असून त्याचे पालन केल्यास अर्थव्यवस्था सांभाळली जाऊ शकते. पाकिस्तान आणि नाणेनिधी यांच्यात १.१ अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यावरून चर्चा सुरू आहे.

 

मोफत पीठ घेण्यासाठी धावपळ

पाकिस्तानात गरीब कुटुंबांना मोफत पीठाचे वाटप केले जात असून खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीठ वाटप करताना नागरिकांत चेंगराचेंगरी, गोंधळ झाल्याचा प्रकार घडला. पिठासाठी नागरिक तासनतास रांगेत उभे राहत आहेत. मर्दन येथील स्पोर्ट्स क्लब येथे पीठ वाटप केंद्रात गोंधळ उडाला. जे नागरिक पात्र होते, त्यांना देखील वाट पाहावी लागत आहे, असे आरोप होत आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यांनी नौशेरा रस्ता बंद केला. या वेळी लाभार्थ्यांनी पोलिसांवर आणि केंद्रावर दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. हवेत गोळीबारही केला. यात अनेक नागरिक जखमी झाले.