पुतीन यांनी केले पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 13 d ago
पुतीन यांनी केले पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत
पुतीन यांनी केले पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत

 

रशियाच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सोमवारी रात्री मॉस्कोजवळील रशियन राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी अनौपचारिक बैठक झाली.रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने Xवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये पीएम मोदी यांचे व्लादिमीर पुतिन स्वागत करत असल्याचे दिसत आहे.


सोमवारी रात्री पोस्ट करण्यात आलेल्या या क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी पुतिन यांच्या निवासस्थानी आल्यावर दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे.पुढे, पुतिन यांनी पीएम मोदी रशिया दौऱ्यावर आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाले, "प्रिय मित्र, तुमचे स्वागत आहे. तुम्हाला पाहून मला खरोखर आनंद झाला आहे."

"मॉस्कोजवळील रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या नोवो-ओगार्योवो निवासस्थानी, व्लादिमीर पुतिन आणि रशियाच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असलेले भारतीय पंतप्रधान यांची अनौपचारिक बैठक झाली," असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने Xवर म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी रात्रीच्या जेवणासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचल्यावर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. रात्रीच्या जेवणानंतर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना गोल्फ कार्टमध्ये बसवले आणि सरकारी निवासस्थानात फेरफटका मारला. यादरम्यान पुतिन यांनी स्वत: गोल्फ कार्ट चालवली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच रशिया दौरा आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी शिखर चर्चेसाठी पंतप्रधान मोदी सोमवारी रशियाला पोहोचले. पीएम मोदींच्या या दौऱ्याकडे व्यापक भू-राजकीय संदर्भ आणि संकेत म्हणून पाहिले जात आहे.

दौऱ्यापूर्वी काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदी रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या प्रमुखांशी द्वीपक्षीय सहकार्याबद्दल चर्चा करणार आहेत. मोदींनी या निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी गेल्या दहा वर्षांत लक्षणीयरित्या वाढली आहे.
त्यात ऊर्जा, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि जनतेचा थेट संपर्क या क्षेत्रांचा समावेश आहे. "या दौऱ्यात माझे मित्र व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्वीपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यासाठी आणि विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार व्यक्त करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. शांतता आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी साहाय्य करण्याची भूमिका दोन्ही देशांना बजावायची आहे. या भेटीमुळे मला रशियातील भारतीय समुदायाला भेटण्याचीही संधी मिळेल", असेही या निवेदनात म्हटले आहे.