बांगलादेशात कट्टरपंथीयांचे सरकार असणे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक - शेख हसीना

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 19 h ago
मोहम्मद युनुस आणि शेख हसीना
मोहम्मद युनुस आणि शेख हसीना

 

नवी दिल्ली:

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एका विशेष मुलाखतीत अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि बीएनपी (BNP) नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. "बांगलादेश अशा नेतृत्वासाठी पात्र नाही जे कट्टरपंथी आणि अतिरेकी विचारसरणीच्या लोकांसोबत हातमिळवणी करते," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होणे अशक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुलाखतीदरम्यान शेख हसीना यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) नवे अध्यक्ष तारिक रहमान यांच्यावरही टीका केली. "रहमान गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये आरामात राहत आहेत, त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. जनतेचा पैसा लुटल्यामुळेच ते देश सोडून पळाले होते," असा आरोप हसीना यांनी केला. सध्याच्या अंतरिम सरकारने अवामी लीगवर घातलेली बंदी ही केवळ भीतीपोटी आहे, कारण आजही ५० टक्क्यांहून अधिक मतदार अवामी लीगला मतदान करण्यास तयार आहेत, असा दावा त्यांनी केला.

बांगलादेशात अल्पसंख्याकांवर (हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन) होणाऱ्या हल्ल्यांबाबत बोलताना हसीना यांनी युनूस सरकारला जबाबदार धरले. "ज्या अतिरेकी गटांना माझ्या सरकारने रोखून धरले होते, त्यांना आता सत्तेत महत्त्वाच्या जागा दिल्या जात आहेत. यामुळे देशातील विविधता नष्ट होत असून अराजकता माजली आहे," असे त्या म्हणाल्या.

भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवर भाष्य करताना शेख हसीना यांनी भारताला सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हटले. मात्र, युनूस सरकारने कट्टरपंथीयांना दिलेल्या बळामुळे आणि भारतीय दूतावासांवरील हल्ल्यांमुळे हे संबंध धोक्यात आले आहेत. "भारत एका जबाबदार आणि स्थिर शेजाऱ्यासाठी पात्र आहे. बांगलादेशला पुन्हा एकदा अशा मार्गावर यावे लागेल जिथे शेजारी देश आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील," असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा लोकशाही पुनर्रचनेचा विश्वास व्यक्त केला.