वॉशिंग्टन डीसी [अमेरिका]: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) पुन्हा एकदा दावा केला की, भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय त्यांचेच आहे. त्यांच्या प्रशासनाने केलेल्या व्यापार करारांमुळे दोन्ही देशांमधील संभाव्य अणुयुद्ध टळले, असेही ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवण्यात आम्हाला यश आले, याचा मला अभिमान आहे. सामान्यतः लोक गोळ्यांच्या माध्यमातून (bullets) युद्ध थांबवतात, पण आम्ही व्यापाराच्या माध्यमातून ते केले. मला याचा खूप अभिमान आहे. याबद्दल कोणी बोलत नाही, पण पाकिस्तान आणि भारत यांच्यात खूप वाईट युद्ध होण्याची शक्यता होती, जे आम्ही थांबवले.”
ट्रम्प यांनी असा दावा केला की, अमेरिकेचा भारतासोबतचा करार अंतिम टप्प्यात आहे आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देणार आहेत. “पाकिस्तानचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात येत आहेत. भारतासोबत करार करण्याच्या खूप जवळ आहोत आणि जर त्यांचे एकमेकांशी युद्ध होणार असेल, तर मला दोघांशीही कोणताही करार करण्यात रस नाही,” असे ट्रम्प म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल) भारताने पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर, १० मे रोजी युद्धविराम झाला, ज्यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता.
भारताचे खंडन परंतु, भारताने ट्रम्प यांचे दावे स्पष्टपणे नाकारले आहेत. भारत सरकारने वारंवार सांगितले आहे की, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही मुद्दे भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय पातळीवर सोडवावेत, हे भारताचे धोरण आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) स्पष्टपणे सांगितले की, युद्धविराम हा दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या थेट चर्चेतून झाला होता आणि त्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती. व्यापार हा मुद्दा चर्चेत आला नव्हता, असेही MEA ने स्पष्ट केले.