अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. इराण सध्या वाटाघाटीसाठी आणि चर्चेसाठी उत्सुक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या विरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनांमुळे तिथली राजवट हादरली आहे. त्यामुळेच इराण आता अमेरिकेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
मात्र, ट्रम्प यांनी केवळ चर्चेबद्दल भाष्य केले नाही, तर इराणला गंभीर इशाराही दिला आहे. इराणला अमेरिकेशी चर्चा करायची असली, तरी ही भेट होण्यापूर्वीच अमेरिका त्यांच्यावर कारवाई करू शकते, असे ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सुचवले आहे. त्यांच्या या विधानामुळे आखाती देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणमधील अंतर्गत परिस्थितीचा फायदा उचलत ट्रम्प यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
सध्या इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत. आर्थिक निर्बंध आणि वाढत्या महागाईमुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणची अर्थव्यवस्था कोलमडली असून त्यांना मदतीची गरज आहे. 'त्यांना सौदा करायचा आहे, कारण त्यांची अवस्था मरणप्राय झाली आहे,' असे ट्रम्प यांनी नमूद केले. खमेनी यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे इराणचे नेतृत्व बॅकफूटवर आले आहे आणि म्हणूनच त्यांनी चर्चेचा प्रस्ताव ठेवल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, अमेरिकेने इराणमधील या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर परिस्थिती अशीच राहिली, तर वाटाघाटींच्या टेबलावर येण्याआधीच अमेरिकेला लष्करी किंवा सामरिक पाऊल उचलावे लागेल. इराणने आपली आण्विक महत्त्वाकांक्षा आणि दहशतवादाला देणे थांबवावे, यावर अमेरिका ठाम आहे. या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंधांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.