अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला नवे धक्के देण्यासाठी औषधांवर १०० टक्के आयात कर लादण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने औषध उत्पादक कंपन्यांना झटका बसला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व कंपन्यांच्या औषधांवर १०० टक्के कर लावण्यात येईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. १ ऑक्टोबरपासून हा निर्णय अंमलात येईल.
ट्रम्प यांनी गुरुवारी अनेक वस्तूंवर कर जाहीर केले. १ ऑक्टोबरपासून औषधांवर १००% आयात कर, स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि बाथरूम व्हॅनिटीजवर ५०%, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर ३०% आणि जड ट्रकवर २५% आयात कर लादला जाईल, असे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी ही माहिती ट्रुथ सोशलवर शेअर केली.
ट्रम्प यांनी नमूद केले की, अमेरिकेत उत्पादन कारखाने बांधणाऱ्या कंपन्यांना औषध शुल्क लागू होणार नाही. ट्रम्प यांच्या मागील आयात करांमुळे नियोक्त्यांना अनिश्चिततेच्या नव्या पातळीचा सामना करावा लागत आहे. अतिरिक्त शुल्कांमुळे आधीच वाढलेली महागाई आणि मंदावलेली आर्थिक वाढ पूर्णपणे कोसळण्याची भीती आहे.
या करवाढीमुळे वैद्यकीय खर्च वाढेल. जनगणना ब्युरोच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये अमेरिकेने सुमारे २३३ अब्ज डॉलर किमतीची औषधे आणि औषधी उत्पादने आयात केली. काही औषधांच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकन लोकांना आश्चर्य वाटेल. मेडिकेअर आणि मेडिकेडच्या खर्चासह आरोग्यसेवेचा खर्च वाढेल.
ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, महागाई आता अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी आव्हान राहिलेली नाही. पण पुरावे उलट आहेत. गेल्या १२ महिन्यांत ग्राहक किंमत निर्देशांक २.९% ने वाढला आहे. हा आकडा एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी पहिल्यांदा आयात करांची मोठी मालिका लादली तेव्हाच्या २.३% पेक्षा जास्त आहे.