यूके कोर्टाने केली मुस्लिम तरुणाच्या शौर्याची प्रशंसा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
हमजा अलबर
हमजा अलबर

 

ब्रिटनच्या एका न्यायालयाने हमजा अलबर या एका धाडसी मुस्लिम तरुणाच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. त्याने एका महिलेवर होत असलेला जीवघेणा हल्ला आणि बलात्कार थांबवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. इतकेच नाही, तर त्याने नराधम आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देईपर्यंत पकडून ठेवले. न्यायालयाने म्हटले की, हमजाने असाधारण साहस आणि सार्वजनिक भावना दाखवली आहे.

नेमके काय घडले?

ही घटना गेल्या वर्षी डिसेंबरमधील आहे. इंग्लंडच्या संडरलैंड शहरातील 'मोनकवियरमाउथ' भागातून हमजा अलबर जात होता. अचानक त्याने पाहिले की, एका महिलेवर शारीरिक आणि लैंगिक हल्ला केला जात आहे. हल्लेखोर त्या महिलेचे तोंड दाबून तिला ओरडण्यापासून रोखत होता.

क्षणाचाही विलंब न लावता, हमजाने धाव घेतली आणि ४२ वर्षीय हल्लेखोर इयान हडसनचा सामना केला. हडसनने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण हमजाने त्याला जमिनीवर पाडले आणि पूर्ण ताकदीने पकडून ठेवले. सुटण्यासाठी हल्लेखोराने हमजाला अनेकदा बुक्क्या मारल्या, त्याला जखमी केले, पण हमजाने त्याचे हात-पाय दाबून त्याला पळू दिले नाही.

त्यानंतर हमजाने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन वाहनचालकांना थांबवले आणि पोलिसांना बोलावण्यास सांगितले. अटकेच्या वेळी हडसनने पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि कोठडीत अभद्र वर्तन केले.

आरोपीला ९ वर्षांची शिक्षा

न्यूकॅसल क्राउन कोर्टाने १३ नोव्हेंबर रोजी हडसनला दोषी ठरवले. त्याच्यावर बलात्काराचा प्रयत्न, गळा दाबणे, लैंगिक छळ, गंभीर दुखापत करणे आणि हमजावर हल्ला करणे असे गंभीर आरोप सिद्ध झाले. न्यायालयाने त्याला ९ वर्षांचा तुरुंगवास आणि सुटकेनंतर ५ वर्षांच्या देखरेखीची शिक्षा सुनावली. त्याला "धोकादायक गुन्हेगार" म्हणून घोषित करण्यात आले.

न्यायाधीशांकडून कौतुक

सौदी वंशाच्या हमजाची प्रशंसा करताना न्यायाधीशांनी म्हटले, "श्री. अलबर यांनी उशीर न करता हस्तक्षेप केला आणि पीडित महिलेला बलात्काराच्या धोक्यातून वाचवले. त्यांनी स्वतः जोखीम पत्करली आणि दुखापत सहन केली, तरीही पोलीस येईपर्यंत आरोपीला सोडले नाही. त्यांच्या हस्तक्षेपामुळे एक गंभीर गुन्हा टळला आणि गुन्हेगाराला त्वरित शिक्षा होऊ शकली."

हमजा अलबरच्या या धाडसी कृतीचे संपूर्ण ब्रिटनमध्ये कौतुक होत असून, त्याला एक खरा 'पब्लिक हिरो' मानले जात आहे.