आम्ही गाझा ताब्यात घेणार - डोनाल्ड ट्रम्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किंग अब्दुल्ला यांची व्हाईट हाऊस येथे भेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किंग अब्दुल्ला यांची व्हाईट हाऊस येथे भेट

 

किंग अब्दुल्ला दुसरे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. व्हाईट हाऊस मध्ये ट्रम्प यांना भेटलेले पहिले अरब नेते ठरले आहेत. या बैठकीत त्यांनी गाझाच्या भवितव्यावर चर्चा करण्यात केली. 

अमेरिका आणि जोर्डन या दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी जोर्डनवर गाझामधून विस्थापित पॅलेस्टिनी लोकांना आश्रय देण्याबाबत विनंती केली होती. गाझामध्ये २०२३ पासून इस्राईलबरोबर सुरू असलेल्या लढाईनंतर, ट्रम्प यांनी गाझा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची आणि पॅलेस्टिनी लोकांना इतर देशांमध्ये पुनर्वसन करण्याची योजना मांडली आहे. या प्रस्तावाला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे.

बैठकीदरम्यान, ट्रम्प यांनी या प्रस्तावावर पुन्हा त्यांचे मत मांडले आहे. ते म्हणाले, "आम्ही गाझाला ताब्यात घेणार आहोत. आम्ही गाझाचे रक्षण करू. यामुळे मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यात मदत होईल.”
  
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसमध्ये किंग अब्दुल्ला आणि त्यांच्या मुलाची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही गाझा ताब्यात घेणार आहोत. पॅलेस्टिनींना गाझा सोडून इतर सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन केले जाईल. 

जोर्डनने आणि इजिप्तने पॅलेस्टिनी लोकांना आश्रय देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. जोर्डनमध्ये आधीच लाखो पॅलेस्टिनी नागरिक राहतात. किंग अब्दुल्ला यांनी या बैठकीत जोर्डनची भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेच्या धोरणामुळे पॅलेस्टिनी नागरिकांचे विस्थापन होईल असे त्यांनी सांगितले. 

अब्दुल्ला यांनी गाझातील पॅलेस्टिनी मुलांना जोर्डनमध्ये आणण्यासाठी अट ठेवली. यावर ट्रम्प यांनी सांगितले, जोर्डन आणि इजिप्तला मोठी आर्थिक मदत देत असताना आम्हाला तुम्ही अटींमध्ये अडकवू नका. किंग अब्दुल्ला यांनी सांगितले की, गाझाच्या भवितव्यावर इजिप्तने एक पर्यायी प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे. या प्रस्तावावर पुढील चर्चेसाठी ते साऊदी अरेबियात भेटणार आहेत.

या भेटीत ट्रम्प यांनी गाझाला अमेरिकेच्या ताब्यात घेण्याच्या प्रस्तावावर ठाम राहणार असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आम्ही आमच्या प्रस्तावावर ठाम आहोत. गाझा एक सुंदर ठिकाण आहे. याठिकाणी अनेक रोजगार निर्माण होती. आम्ही त्यांचे रक्षण करू.”

अब्दुल्ला यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीबाबत सांगितले की, दोन राज्यांमध्ये समतोल साधण्यासाठी प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करण्याचा एक मार्ग आहे. त्यासाठी अमेरिकेचे नेतृत्व आवश्यक आहे. 

त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले, गाझातील परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी अमेरिका महत्वाची भूमिका बजावत आहे. 

जोर्डन आणि इजिप्तने पॅलेस्टिनी विस्थापनाच्या प्रश्नावर ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला असला तरी इजिप्तने गाझाच्या पुनर्निर्माणासाठी स्वतंत्र योजना आखली आहे. पॅलेस्टिनी लोकांचे हक्क आणि अधिकार कायम ठेवण्याच्या दृष्टीने या योजना आहेत.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter