कहा था ना... सरफराज धोका नहीं देगा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 1 Years ago
सरफराज आणि जमीर पटेल यांचा सत्कार करताना खंडाळा पोलीस
सरफराज आणि जमीर पटेल यांचा सत्कार करताना खंडाळा पोलीस

 

- अशपाक पटेल, खंडाळा
 
प्रामाणिकपणा हा विषय बोलायला जितका सोपा, आचरणात आणायला तितकाच अवघड. त्यामुळे आजच्या युगात प्रामाणिक आणि 'इमानदार' व्यक्तींचे प्रमाण विरळच. त्यातही विषय पैशाचा असेल, आणि आपसूकच तुमच्या खात्यावर हजारोंची रक्कम जमा झाली असेल तर? त्यावेळी प्रामाणिकपणे वागणे आणि इतके मोठे घबाड परत करणे तर केवळ अशक्यच. मात्र समाजात अजूनही असे लोक शिल्लक आहेत ज्यांच्याकडे पाहिलं की माणुसकी, प्रामाणिकपणा, सचोटी आणि धर्मपरायणता या गुणांवर असणारा आपला विश्वास आणखी दृढ होतो. अशीच एक व्यक्ती आपल्या प्रामाणिकतेमुळे सध्या चर्चेत आली. त्याचीच ही कहाणी...
 
रवी बायकर श्रीगोंद्यातील उद्योजक. आजकाल सर्वसामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच जण पैशांचा व्यवहार बहुदा युपीआयनेच करतात. रवी बायकरही एकाला पन्नास हजारांची मोठी रक्कम ‘फोन पे’द्वारे पाठवत होते. मात्र गडबडीत त्यांच्याकडून एक छोटीच, मात्र मोठा आर्थिक फटका बसवणारी चूक झाली. ते ज्याला पैसे पाठवणार होते, त्याचा मोबाईल नंबर टाईप करताना त्यांच्याकडून एक अंक चुकीचा दाबला गेला. आणि क्षणार्धात त्यांच्या खात्यावरील ५० हजारांची रक्कम तत्काळ अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली.हा अनोळखी व्यक्ती भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असेल, त्याच्या खात्यावर थेट ५० हजार आल्यानंतर तो आपल्याला पैसे कशाला परत करेल, असे एक ना अनेक प्रश्न बायकरांच्या मनात येऊ लागले. स्वतःचे कष्टायचे पैसे परत मिळवण्याची शक्यता त्यांना अगदी धूसर वाटत होती. मात्र घडले वेगळेच.

त्यांनी पैसे पाठवले तो फोन नंबर आणि बँक डीटेल्स यांच्या आधारे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येतय का याची चाचपणी करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना त्या व्यक्तीची माहिती मिळाली.  खंडाळा तालुक्यातील कन्हेरी या गावचा व अकरावीत शिकणारा सरफराज जमीर पटेल या तरुणाचा हा मोबाईल नंबर होता. सरफराज हा खंडाळा तालुक्यातील कन्हेरी गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगा. आई-वडील, मोठा भाऊ आणि चुलते असे त्याचे संयुक्त कुटुंब. 
 
रवी बायकर यांनी सरफराजला संपर्क केला. चुकून रक्कम तुमच्या खात्यावर आल्याचे त्यांनी सांगितले. सरफराजने दोन दिवसांपूर्वीच बँकेत खाते उघडले होते. त्यामुळे बँकेकडून आलेले अलर्ट आणि मेसेज पाहण्यात तो तितकासा सरावलेला नव्हता. त्यात वयाची १८ वर्षे पूर्ण न झाल्यामुळे त्याने वडलांसोबत जॉईंट खाते काढले होते. बायकरांचा फोन आल्यावर ५० हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाल्याचे सरफराजच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्याने बायकरांना सांगितले, ‘होय माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले दिसताहेत चुकून ते तुमचेच असावेत.’
 
सरफराज बायकरांना म्हणाला, ‘नवीनच खाते असल्यामुळे माझ्याकडे एटीएम कार्डही नाही. आणि जॉईंट खाते वडलांसोबत असल्यामुळे युपीआयद्वारे पाठवण्यात तांत्रिक अडचणी येतील.पण तुम्ही व्यक्तिश: आलात तर मी लागलीच बँकेतून पैसे काढून देऊ शकेन’

आपल्या खात्यात इतकी मोठी रक्कम अनवधानाने जमा झाल्याची बाब सरफराजने आपले वडील जमीर पटेल यांना सांगितली. यावर जमीरभाईंनी क्षणाचाही विलंब न करता ‘आपण ती रक्कम परत करूया’असे सांगितले. इतकी मोठी रक्कम खात्यात जमा होऊनही शेतकरी असलेल्या जमीरभाईंच्या मनात चुकीचा विचार आला नाही. ते ताबतोड उठले आणि बँकेत जाण्यास निघाले.

ते बँकेत जाणार तोच सरफराज त्यांना म्हणाला, ‘मी बायकर यांना पैसे घेण्यासाठी आपल्या गावीच बोलवले आहे.’ त्यावर वडील म्हणाले,‘इतकी मोठी रक्कम चुकून दुसऱ्याच्या खात्यात गेल्यामुळे ते आधीच चिंतेत असतील. त्यांना इथे बोलावण्याऐवजी आपणच बँकेत जाऊया आणि एनईएफटीद्वारे ही रक्कम त्यांच्या खात्यावर पाठवू. यामुळे त्यांचे पैसे त्यांना तात्काळ मिळतील आणि त्यांची चिंता मिटेल.’  
 
आपण काही खुप मोठे काम केले असल्याचे जमीरभाईंना मान्य नाही. ते याला त्यांचा ‘फर्ज’च समजतात. ‘हराम की हलवा पुरीसे, हलालकी चटणी रोटी बेहतर’ ही त्यांची फिलोसॉफी. त्यामुळे प्रामाणिकपणा त्यांच्या ठायी आपसूकच होता. ‘वाडवडिलांनी केलेले संस्कार आणि धार्मिकवृत्ती’ यातूनच या गोष्टी आपल्यात आल्याचे ते सांगतात. आपल्या मुलांनीही प्रामाणिक राहावे यासाठी ते कायम आग्रही असतात.
 
त्यामुळे सरफराजही वडलांसारखाच प्रामाणिक. त्याच्या प्रामाणिक वृत्तीची झलक लहानपणीच दिसली होती. एकदा सरफराजने मोबाईलवर २०० रुपयांचे रिचार्ज केले होते.पण चुकून दुकानदारानेच त्याला ५०० रुपये परत केले. दुकानदाराकडून गफलत झाल्याचे सरफराजच्या लक्षात आले. त्याने लागलीच ही बाब दुकानदाराच्या लक्षात आणून दिली. दुकानदारही काही क्षण गडबडला. अवाक होत त्याने पैसे परत घेतले.
 
इतकी मोठी रक्कम अनोळखी व्यक्तीच्या खात्यात चुकून ट्रान्स्फर झाल्यामुळे रवी बायकर प्रचंड तणावात होते. पैसे परत मिळवण्याची शक्यताही कमी होती. मात्र सरफराज आणि त्याचे वडील जमीरभाई यांच्या प्रामाणिकपणामुळे बायकरांना त्यांचे पैसे त्यांना परत मिळाले. आजच्या युगात इतकी प्रामाणिक माणसे असतील यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते म्हणतात,‘मी पैसे पाठवणार होतो त्या व्यक्तीच्या आणि सरफराजच्यामोबाईल नंबरमध्ये फक्त एका अंकाचा फरक आहे.त्यामुळे रक्कम ट्रान्सफर करताना ही चूक झाली. मात्रलक्षात आल्यानंतर लगेचच मी सरफराजला फोन केला.कसलीही आढेवेढे न घेता‘पैसे जमा झाल्याचे वडील आल्याबरोबर ते लगेच परत करणार असल्याचे सांगितले. काही वेळातच जमीरभाईंचा मला फोन आला. एनईएफटीद्वारे ताबडतोब पैसे पाठवत असल्याचे त्यांनी कळवले आणि माझा जीव भांड्यात पडला.’
 
बायकर शेवटी म्हणाले, ‘सरफराज आणि जमीरभाई यांच्या प्रामाणिकपणाचे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यचे करावे तितके कौतुक कमी आहे. हिंदु मुस्लीम भाई-भाई आहेत, एक दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारे आहेत हे मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. लवकरच व्यक्तिश: भेटून मी या बापलेकाचा सत्कार करणार आहे.’
 
सरफराज आणि जमीरभाई यांनी ‘फर्ज’समजत दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळेस खंडाळा पोलीस विभागातील  विजय पिसाळ, पोलीस पाटील इम्रान मुल्ला यांनी त्याचा सत्कार केला. आणि असे आणखी सत्कार येत्या काही दिवसांत होणार आहेत.