संभाजीनगरचे सलमान शेख ठरले 'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'चे मानकरी!

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 3 Months ago
'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'ने सन्मानित पोलिस उपनिरीक्षक सलमान शेख
'रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर'ने सन्मानित पोलिस उपनिरीक्षक सलमान शेख

 

त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये गुलाबी थंडीच्या आल्हाददायक वातावरणामध्ये १२३व्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचे छत्रपती संभाजीनगरचे सलमान जहिर शेख मानकरी ठरले. सेवानिवृत्ती अपर पोलीस महासंचालक व राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य संजय कुमार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

स्वप्न वास्तवात उतरल्याचा आनंद - सलमान शेख 
आपल्या यशाविषयी सलमान म्हणाले, "छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयात २०१३ मध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो, त्याचवेळी मनाशी गाठ निश्चय केला होता तो पोलिस अधिकारी होण्याचा. आज ते स्वप्न साकार झाल्याचा मनस्वी आनंद होतो आहे. समाजातील गोरगरिबांना, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर सेवा करण्याचा माझा संकल्प आहे."
 
सलमान शेख हे मूळचे पैठण तालुक्यातील आडूळ गावातील कुटुंबीय शेतकरी. ते कला शाखेतील पदवीधर आहेत. त्याचवेळी त्यांनी अध्यापक शिक्षणक्रमही (डी.एड) पूर्ण केले. परंतु जागा नसल्याने त्याचवेळी २०१३ मध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होती. पहिल्याच प्रयत्नामध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयामध्ये कॉन्स्टेबल म्हणून ते यशस्वी झाले आणि भरती झाले. आपणही पोलिस अधिकारी व्हावे, असे तेव्हापासून त्यांना वाटत होते. 

त्यानुसार प्राथमिक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पदासाठी २०२२ मध्ये खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळाले. गेल्या नऊ महिन्यांतील खडतर परिश्रम व मेहनतीचे फळ म्हणजे, १२३ व्या तुकडीचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलो, याचा आनंद आहे,' असे त्यांनी सांगितले. तसेच, यशवंतराव चव्हाण गोल्ड कप ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅचचा चषकही सलमान यांनीच पटकावला आहे.

असाही योगायोग
सलमान शेख हे २०१३ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस आयुक्तालयात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले त्यावेळी संभाजीनगरचे पोलिस आयुक्त संजय कुमार होते. आज, दीक्षांत सोहळ्यात मानाची रिव्हॉल्व्हरही पोलिस सेवेतून अपर पोलिस महासंचालक म्हणून निवृत्त झालेले संजय कुमार यांच्याच हस्ते स्वीकारली. पोलिस सेवेत रिक्रुटमेंटही संजय कुमार यांच्या कार्यकाळात तर, मानाची रिव्हॉल्व्हरही त्याच संजय कुमार यांच्या हस्ते सलमान यांनी स्वीकारल्याचा योगायोग सलमान यांनी अनुभवला.

असा पार पडला दीक्षांत सोहळा 
यावेळी अकादमीचे संचालक राजेश मोर उपस्थित होते. प्रारंभी सलमान शेख हे दीक्षांत परेड संचलनाचे मुख्य कमांडर होते. त्यांच्यासमवेत पथकांचे निरीक्षण करून मुख्य अतिथी संजय कुमार मंचावर गेले. निशाण टोळीने राष्ट्रध्वज आणि अकादमीच्या ध्वजाचे शानदार संचलन केले. त्यानंतर संचालक राजेशकुमार यांनी उपनिरीक्षकांना कर्तव्याची शपथ दिली.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या १२३व्या तुकडीच्या प्रशिक्षण सत्राला एप्रिल २०२३ मध्ये प्रारंभ झाला. या प्रशिक्षणात खात्यांतर्गत विविध जिल्ह्यातील २४६ पुरुष व ५ महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश होता. २५१ पोलीस उपनिरीक्षकांपैकी ७५ टक्के प्रशिक्षणार्थी शेतकरी कुटूंबियांतील असल्याचे अकादमीचे संचालक राजेश मोर यांनी अहवाल वाचनात सांगितले. दीक्षांत सोहळ्यासाठी प्रशिक्षणार्थींचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वाधिक प्रशिक्षणार्थी शेतकरी कुटूंबियातील
१२३ व्या प्रशिक्षार्थी तुकडीत मराठवाडा - ४५, पश्चिम महाराष्ट्र - ७४, कोकण - ५१, विदर्भ - ४९ आणि उत्तर महाराष्ट्र - ३२ यांचा समावेश आहे. तुकडीतील पोलिसांचे २५ ते ४७ वर्षे वयोगट असून, त्यापैकी २०८ पदवीधर आहेत. तर, ७० टक्के पेक्षा अधिक हे शेतकरी कुटूंबियांतील आहेत.
 
यांना मिळाले पारितोषिक 
- सलमान जहिर शेख (रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर व यशवंतराव चव्हाण गोल्ड कप ऑलराऊंड कॅडेट)
- मीना केशवराव झाडे (अहिल्याबाई होळकर कप - ऑल राऊंड वूमन कॅडेट ऑफ द बॅच)
- संतोष नारायण काळोगे (बेस्ट कॅडेट इन ड्रील)
- रामचंद्र किसन बहुरे (बेस्ट कॅडेट इन शुटिंग)
- निलेश विठ्ठल तळेकर (बेस्ट कॅडेट इन आऊटडोअर)
- दीपक सयाजी रहाणे (द्वितीय, बेस्ट कॅडेट इन बॅच)
- अंकुश विठ्ठल दुधाळ (बेस्ट कॅडेट इन स्टडिज्‌ व बेस्ट कॅडेट इन लॉ)
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter