फरहान इस्रायली
आज जयपूरच्या न्यायालयांमध्ये महिला वकिलांचा वावर पूर्वीपेक्षा खूपच अधिक प्रमाणात दिसतो. पण सुमारे दोन दशकांपूर्वीची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्यावेळी या क्षेत्रात हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच महिला होत्या. त्यात मुस्लिम महिला वकिलांची संख्या खूपच नगण्य होती. अशा काळात निगार सुलताना यांनी आपल्या वकिलीच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
निगार यांच्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस अजिबात सोपे नव्हते. लोकांच्या उपहासात्मक नजरा आणि अधूनमधून येणारे टोमणे यांचा सामना त्यांना करावा लागला. परंतु, त्यांनी या गोष्टींना आपल्या कामाच्या आड कधीही येऊ दिले नाही. हळूहळू त्यांनी या क्षेत्रात स्वतःचा जम बसवला. आज संपूर्ण जयपूरमध्ये, विशेषतः महिलांशी संबंधित खटल्यांमध्ये एक विश्वासार्ह नाव म्हणून त्या नावारूपाला आल्या आहेत.
वडिलांचा वारसा आणि शिक्षणाने घडवलेली वाट
निगार यांच्यासाठी न्यायालयाची पायरी नवीन नव्हती. त्यांचे वडील सुलतान मोहम्मद नासीर हे जयपूरमधील एक प्रसिद्ध आणि नावाजलेले वकील होते. बालपणापासूनच त्या वडिलांसोबत न्यायालयात जायच्या. त्यामुळे या क्षेत्राचे अत्यंत जवळून निरीक्षण करण्याची संधी त्यांना मिळाली. निगार सांगतात, "आम्ही लहानपणापासूनच न्यायालये पाहत आलो आहोत. माझे वडील केवळ खटले लढत नव्हते, तर अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतही करत असत. लोकांचा त्यांच्यावर गाढ विश्वास होता. त्याच विश्वासाने मला या क्षेत्रात येण्याची मोठी प्रेरणा दिली."
कुटुंबात धार्मिक शिक्षणालाही विशेष महत्त्व दिले जात असे. त्यामुळे त्यांना काही काळासाठी आझमगडला पाठवण्यात आले. तेथे त्यांनी 'आलिमा' हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्या जयपूरला परतल्या आणि त्यांनी आपलेपुढील शिक्षण सुरू ठेवले. जयपूरच्या राणी महारानी कॉलेजमधील प्रवेश त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. निगार म्हणतात, "तेथे मला बाहेरचे जग कसे चालते हे खऱ्या अर्थाने समजले. त्याच काळात मी ठरवले की वडिलांप्रमाणेच कायद्याचा अभ्यास करून जनतेची सेवा करायची."
राजस्थान विद्यापीठातून २००५ मध्ये कायद्याची पदवी घेतल्यानंतर आणि २००६ मध्ये बार कौन्सिल ऑफ राजस्थानमध्ये नोंदणी केल्यानंतर त्यांनी जयपूरच्या न्यायालयांमध्ये प्रत्यक्ष वकिलीला सुरुवात केली. त्या काळात जयपूरच्या न्यायालयांमध्ये महिला वकिलांचे प्रमाण फारच कमी होते.
निगार जुन्या आठवणींना उजाळा देत सांगतात, "त्या वेळी सांगनेर कोर्टात मी एकमेव मुलगी होते. पण मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नाही. न्यायालयात माझ्या वडिलांना मोठा आदर होता, त्यामुळे लोक उघडपणे काही बोलत नसत. पण लोकांच्या बारीक नजरा असायच्या आणि कधीकधी मागून हसण्याचे आवाजही कानावर पडायचे." हे संपूर्ण वातावरण त्यांच्यासाठी नवीन होते. तरीही त्या हळूहळू परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या ध्येयावर ठाम राहिल्या.
विविध न्यायालयांमधील अनुभवाची शिदोरी
काळानुसार निगार यांनी स्वतःला एकाच ठिकाणी मर्यादित ठेवले नाही. त्यांना जयपूरचे सांगनेर कोर्ट, सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात काम करण्याच्या बहुमोल संधी मिळाल्या. या अनुभवांमुळे त्यांच्या ज्ञानात सातत्याने भर पडत गेली. त्यांनी सुरुवातीलाच आपल्या कामाची कक्षा निश्चित केली होती. निगार सांगतात, "माझ्या वडिलांनी मला फौजदारी खटल्यांची सराव न करण्याचा सल्ला दिला होता. म्हणूनच मी दिवाणी आणि महसूलविषयक प्रकरणांवरच माझे लक्ष केंद्रित केले." आज या क्षेत्रात त्यांचा तब्बल २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.
महिलांच्या न्यायासाठी मोलाचे कार्य
वकिली करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. न्यायालयाच्या वातावरणात अनेक महिला मोकळेपणाने आपले म्हणणे मांडू शकत नव्हत्या. निगार म्हणतात, "महिला पुरुषांशी बोलताना अनेकदा संकोचायच्या. म्हणूनच मी त्यांच्या बाजूने खटले लढण्याचे ठरवले." हळूहळू त्यांच्या कामाचा विस्तार वैवाहिक वादांशी संबंधित प्रकरणांपर्यंत झाला. आज त्यांनी संपूर्ण जयपूरमध्ये स्वतःची एक भक्कम ओळख निर्माण केली आहे.
मुस्लिम वकिलांच्या सद्यस्थितीबद्दल बोलताना निगार मानतात की, जयपूरमधील परिस्थिती आता खूप सुधारली आहे. "आज मुस्लिम मुले आणि मुली मोठ्या संख्येने या क्षेत्रात येत आहेत आणि उत्कृष्ट काम करत आहेत," असे त्या आत्मविश्वासाने सांगतात.
न्यायालयाबाहेरील सामाजिक जबाबदारी
निगार यांचे कार्य केवळ न्यायालयाच्या भिंतींपुरतेच मर्यादित राहिले नाही. कॉलेजच्या दिवसांपासूनच त्या विविध सामाजिक कार्यांशी जोडलेल्या आहेत. त्यांनी बालमजुरीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले. या प्रकल्पांच्या माध्यमातून लहान मुलांना शिक्षण दिले गेले आणि त्यांच्या मातांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
२००१ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत 'पहल एज्युकेशन अँड सोशल डेव्हलपमेंट सोसायटी'ची स्थापना केली. या उपक्रमांतर्गत जयपूरच्या सांगनेर भागात 'लिटल फ्लॉवर अकॅडमी' या शाळेची पायाभरणी झाली. आज या शाळेत ५०० हून अधिक मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेने परिसरात मोठी प्रतिष्ठा मिळवली आहे. वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना अत्यंत अल्प शुल्कात शिक्षण दिले जाते. तर अत्यंत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च 'झकात' आणि दानशूर व्यक्तींच्या देणग्यांतून भागवला जातो.
शिक्षण, कुटुंब आणि वकिलीचा मिलाफ
निगार यांनी पदव्युत्तर पदवी, बी.एड., एलएल.बी. आणि लेबर लॉमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. लग्नानंतरही त्यांनी आपले काम अविरत सुरू ठेवले. त्या सांगतात, "माझे पती वसीम अख्तर यांनी मला नेहमीच भक्कम पाठिंबा दिला. त्यांनी मला वकिली, शिक्षण किंवा समाजकारणापासून कधीही रोखले नाही."
सध्या त्या त्यांचे मोठे भाऊ ॲडव्होकेट जावेद अख्तर यांच्यासोबत न्यायालयात वकिली करतात. हे दोन्ही बहीण-भाऊ मिळून आपल्या वडिलांचा वैचारिक वारसा पुढे नेत आहेत. निगार सुलताना यांच्याकडे 'स्टेट नोटरी'चा परवानाही आहे. त्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम करतात आणि सामान्य नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेत मदत करतात. त्यांनी 'सांगनेर बार असोसिएशन'च्या उपाध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.
नव्या पिढीला मोलाचा सल्ला
कायद्याच्या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीसाठी निगार यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. जर जास्तीत जास्त महिला या क्षेत्रात आल्या, तर त्याचा थेट सकारात्मक परिणाम समाजावर होईल, असे त्या मानतात. "जर एखाद्या मुलीने कायद्याचा अभ्यास केला, तर ती स्वतःच्या आणि इतरांच्या हक्कासाठी सक्षमपणे उभी राहू शकते."
निगार यांच्या मते, वकिली म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर समोरच्याचे ऐकून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. "एक चांगला श्रोता असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही एखाद्या खटल्याची बाजू योग्य प्रकारे समजून घेऊ शकता."
आपल्या प्रवासाचा शेवटा करताना त्या म्हणतात, "एक वेळ अशी होती जेव्हा मी पूर्णपणे एकटी होते. आज त्याच न्यायालयात अनेक मुली आत्मविश्वासाने वकिली करत आहेत. हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल आहे."