मलिक असगर हाश्मी, फरिदाबाद
आज जेव्हा भारतीय नेमबाजीचा डंका जगभर वाजत आहे आणि मनू भाकरपासून अभिनव बिंद्रापर्यंतची नावे प्रत्येकाच्या ओठावर आहेत, तेव्हा खेळाच्या दुनियेतील एक नाव कुठेतरी शांत झाले आहे. ते नाव म्हणजे अनीसा सय्यद.
आपल्या बंदुकीच्या नळीतून निघणाऱ्या गोळ्यांनी एकेकाळी देशासाठी पदकांचा पाऊस पाडणारी ही खेळाडू आज हरियाणातील फरिदाबादमध्ये आपल्या संसारात आणि नऊ वर्षांच्या चिमुकल्या मुलीच्या संगोपनात मग्न आहे. पण इतिहासाची पाने उलटली तर समजते की, ही तीच खेळाडू आहे जिने प्रतिकूल परिस्थितीलाच आपले 'टार्गेट' बनवले आणि सातासमुद्रापार भारताचा झेंडा डौलाने फडकवला.

दोन खोल्यांमधील सरावापासून 'राष्ट्रकुल'पर्यंतचा प्रवास
अनीसा सय्यद हिचा आंतरराष्ट्रीय नेमबाज बनण्याचा किस्सा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी रोमांचक नाही. आजच्या काळात खेळाडूंकडे अत्याधुनिक शूटिंग रेंज आणि प्रशिक्षकांची फौज असते, पण अनीसाने अभाव असतानाही स्वतःचा मार्ग शोधला. तिने या लेखाच्या लेखकाशी संवाद साधताना एक अतिशय मनोरंजक आठवण सांगितली होती.
अनीसा म्हणाली, सुरुवातीच्या काळात तिला सरावासाठी बाहेर जाण्याची संधी खूप कमी मिळायची. अशा वेळी तिने आपल्या घरालाच शूटिंग रेंजमध्ये बदलले होते. ती घराच्या दोन खोल्यांच्या मध्यभागी एक टार्गेट फिक्स करायची आणि तिथून तासनतास नेमबाजीचा सराव करायची. तिच्या याच जिद्दीचा आणि आवडीचा हा परिणाम होता की, ती साध्या एअरगनच्या जोरावर थेट आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत पोहोचली.
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील खडकी येथे २२ सप्टेंबर १९८० रोजी जन्मलेल्या अनीसाच्या रक्तातच खेळाची आवड होती. तिचे वडील अब्दुल हमीद सय्यद हे क्लब स्तरावरील फुटबॉल खेळाडू होते. अनीसाचा नेमबाजीचा प्रवास कॉलेजच्या दिवसात एनसीसी प्रशिक्षणातून सुरू झाला, जिथे तिला शाळेतील सर्वोत्तम एनसीसी शूटरचा किताब मिळाला.
यशाचा सुवर्णकाळ
अनीसा सय्यदच्या कारकिर्दीतील सर्वात सुवर्ण काळ म्हणजे २०१० चे दिल्ली राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games). त्यावर्षी तिने केवळ राही सरनोबतसोबत २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकले नाही, तर ७७६.५ च्या विक्रमी स्कोअरसह वैयक्तिक सुवर्णपदकही आपल्या नावावर केले. तिचा हा विजय त्यावेळी भारतीय क्रीडा विश्वासाठी एक नवी उमेद घेऊन आला होता.

अनीसाच्या यशाची न संपणारी यादी…
२००६: दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (SAF) सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली.
२०१४: ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर कब्जा केला.
२०१४: इंचेऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाच्या झोळीत कांस्यपदक टाकले.
२०१७: नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये २५ मीटर एअर पिस्तूलमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत पुन्हा सुवर्णपदक जिंकले.
सातारा ते मेवात: दोन संस्कृतींचे झाले मिलन
अनीसा सय्यदचे वैयक्तिक आयुष्यही तिच्या खेळाप्रमाणेच धाडसी राहिले आहे. महाराष्ट्रातील एका मोकळ्या आणि आधुनिक वातावरणात वाढलेल्या अनीसाने हरियाणातील मेवात (नुह) येथील मुबारक हुसेन खान यांच्याशी प्रेमविवाह केला.
मेवात आपल्या जुन्या आणि कडक सांस्कृतिक ओळखीसाठी ओळखले जाते, तिथे खेळाडू सून म्हणून स्वतःला जुळवून घेणे अनीसासाठी कोणत्याही सुवर्णपदकापेक्षा कमी आव्हानात्मक नव्हते. अनिसा सांगते, सुरुवातीला एका मेवाती कुटुंबातील नियम आणि तिथल्या जीवनशैलीशी जुळवून घेताना तिला खूप अडचणी आल्या. पण ज्याप्रमाणे एक नेमबाज आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करतो, त्याचप्रमाणे अनीसानेही आपल्या नात्यांमधील ताळमेळ बसवण्यावर लक्ष दिले. हळूहळू सर्व काही सामान्य झाले.
आज अनीसा फरिदाबादमध्ये पती मुबारक हुसेन आणि २०१७ मध्ये जन्मलेल्या मुलीसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. खेळाच्या मैदानातील ती आक्रमक नेमबाज आज एक समर्पित आई आणि पत्नीची भूमिका चोख बजावत आहे.
संघर्ष आणि उपेक्षेची कडू चव
अनीसा सय्यदची कथा केवळ विजयाचीच नाही, तर व्यवस्थेशी केलेल्या संघर्षाचीही आहे. एका काळात ती भारतीय रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून कार्यरत होती, परंतु बदलीची विनंती वारंवार फेटाळल्या गेल्यामुळे तिला आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला.
विरोधाभास पहा, ज्या खेळाडूने देशाला इतके अभिमानाचे क्षण दिले, तिला कारकिर्दीनंतर नोकरी आणि सुविधांसाठी दारोदार भटकावे लागले. २०१७ मध्ये तिने क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध छळवणूक आणि दोन वर्षे पगार न मिळाल्याची तक्रारही दाखल केली होती. भारतात अनेकदा चॅम्पियन खेळाडूंना पदक जिंकल्यानंतर व्यवस्थेची उदासीनता सहन करावी लागते, ही एक खेदाची बाब आहे.
नेमबाजीपासून दुरावा आणि नवीन लक्ष्य
सध्या अनीसाने शूटिंग रेंजपासून अंतर ठेवले आहे. तिची प्राथमिकता आता तिची नऊ वर्षांची मुलगी आहे. मात्र, क्रीडा प्रेमी आजही तिला मिस करतात. जेव्हा जेव्हा भारताच्या महिला पिस्तूल नेमबाजांबद्दल बोलले जाते, तेव्हा अनीसाचे नाव एक प्रेरणा म्हणून समोर येते. तिने हे सिद्ध केले की, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी जर आपली इच्छाशक्ती मजबूत ठेवत असेल, तर ती घरातील खोल्यांमधून बाहेर पडून जगातील सर्वोच्च मंचावर तिरंगा फडकवू शकते.
अनीसा सय्यद आज प्रकाशझोतापासून दूर फरिदाबादच्या गल्ल्यांमध्ये आपले खाजगी आयुष्य जगत असली, तरी क्रीडा इतिहास तिला नेहमीच एक 'अचूक नेमबाज' म्हणून स्मरणात ठेवेल, जिने भारतीय महिला नेमबाजीला एक नवी ओळख दिली. तिच्या यशोगाथेतून भावी नेमबाज मुलींना हाच धडा मिळतो की टार्गेट खेळातील असो वा आयुष्यातील, एकाग्रता हीच यशाची एकमेव गुरुकिल्ली आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter