परवाझ : ओळख कर्नाटकातील १० कर्तृत्ववान मुस्लीम महिलांची…

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
कर्नाटकातील १० कर्तृत्ववान मुस्लीम महिला
कर्नाटकातील १० कर्तृत्ववान मुस्लीम महिला

 

'परवाझ कर्नाटक'मध्ये विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा एकत्र गुंफल्या आहेत. त्यांच्या आयुष्यातून जिद्द, ध्येय आणि परिवर्तनाचे दर्शन घडते. प्रसारमाध्यमे, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण, साहित्य, पोलीस दल आणि समाजसेवा अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी आपली मोहोर उमटवली आहे.

त्यांनी अनेक जुन्या रूढी मोडल्या आणि प्रगतीच्या वाटा चोखाळल्या. संवेदनशीलता, सचोटी आणि आपल्या कामातून निर्माण केलेला प्रभाव, यातून त्यांनी यशाची नवी व्याख्या जगाला दाखवून दिली.

या यशाच्या कथा वैयक्तिक पातळीपुरत्या मर्यादित नाहीत. समाजातील बदलाचे सामूहिक चित्र त्या प्रभावीपणे मांडतात. माणसाचे ध्येय निश्चित असेल, तर त्याच्या जिद्दीच्या जोरावर संपूर्ण समाजाचा उद्धार होऊ शकतो, याचीच प्रचिती या प्रास्ताविक कथांमधून येते.

आयशा तबस्सुम यांचा टेलिव्हिजन पत्रकारितेपासून कॉर्पोरेट कम्युनिकेशनपर्यंतचा प्रवास रंजक आहे. लोकांच्या हिताला प्राधान्य देत कथा मांडण्यावर त्यांचा भर राहिला. वेगवान न्यूजरूममधून त्यांनी करिअरला सुरुवात केली. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासारख्या महत्त्वाच्या घटनांचे कव्हरेज केले. यातूनच त्यांना बातम्यांमागची जबाबदारी समजली.

त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवले. पुढे बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये कंटेंट लीड म्हणून जबाबदारी सांभाळली. कल्पकता आणि रणनीती यांची योग्य सांगड घालण्याचे त्यांचे कसब यातून दिसून येते. आज त्या विविध प्लॅटफॉर्मवर प्रभावी संवाद कौशल्य वापरतात. संवेदनशीलता आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती त्यांच्यात आहे. कोणत्याही कथेचा थेट लोकांशी संबंध जोडला गेला, तरच तिला अर्थ प्राप्त होतो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. असिमा बानू यांचा प्रवास वेगळ्या वाटेवरून चालण्याच्या धाडसासाठी ओळखला जातो. एका काळात मायक्रोबायोलॉजी या विषयाकडे फारसे कोणी वळत नव्हते. पण त्यांनी ध्येयवादी वृत्तीने हा विषय निवडला. त्यात दोन दशकांहून अधिक काळ उज्ज्वल कारकीर्द घडवली.

संसर्ग नियंत्रण, आणीबाणीच्या काळातील उपचार आणि वैद्यकीय शिक्षण या क्षेत्रांतील त्यांचे योगदान दूरदृष्टीचे आहे. त्यांनी चोवीस तास चालणारी इमर्जन्सी लॅबोरेटरी उभारली. तसेच सिम्युलेशन-बेस्ड ट्रेनिंगसारख्या आधुनिक प्रशिक्षण पद्धतींना प्रोत्साहन दिले. त्यांची नेतृत्वशैली नम्रता, सांघिक भावना आणि जबाबदारीच्या जाणिवेवर उभी आहे. कोविड-१९ महामारीच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी दाखवलेले नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी आहे.

डॉ. फरीदा रहमतुल्ला यांनी शिक्षणाकडे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र म्हणून पाहिले. चिकमंगळूरमधील एका छोट्या गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला. पुढे त्यांनी बेंगळुरूमधील वंचित घटकांसाठी महत्त्वाचे काम उभे केले. शिक्षणातील दरी सांधण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.

सर्वांना सामावून घेणाऱ्या संस्थांची त्यांनी स्थापना केली. गरजू मुलांना मोफत शिक्षण देऊन त्यांनी अनेकांचे जीवन बदलून टाकले. यासोबतच साहित्य आणि महिला कल्याणाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे काम केले. इतरांसाठी संधी निर्माण करणे आणि शिक्षणातून त्यांना सन्मान मिळवून देणे, हेच खरे यश असल्याचे त्यांनी कार्यातून सिद्ध केले आहे.

डॉ. इफत फरिदी यांचा प्रवास म्हणजे बौद्धिक प्रगल्भता आणि सामाजिक करुणेचा सुरेख संगम आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी भक्कम आहे आणि त्यांना साहित्याची भारी आवड आहे. गरीब मुलांना शिक्षण देण्यातच त्यांनी आयुष्याचे सार्थक मानले.

स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिकवण्याच्या छोट्याशा प्रयत्नातून या कामाची सुरुवात झाली. पुढे याच कामाचे रूपांतर 'कोशिश फाउंडेशन'मध्ये झाले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आधार दिला. एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करत असतानाच त्यांचे लेखन आणि कवितांमधून सांस्कृतिक भान दिसून येते. इतरांना प्रगतीच्या वाटेवर नेणे आणि स्वतःच्या मुळांशी जोडलेले राहणे, हेच यशाचे गमक असल्याचा त्यांचा विश्वास आहे.

डॉ. सर्वथ आदिल खान यांनी 'लर्निंग पॉइंट फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. एका काळात या मुलांना शिक्षण घेणे आवाक्याबाहेरचे वाटत होते. स्वतःच्या शिक्षणात खंड पडल्याचा कटू अनुभव डॉ. सर्वथ यांच्या गाठीशी होता.

याच अनुभवातून त्यांच्या मनात विद्यार्थ्यांप्रती संवेदनशीलता निर्माण झाली. त्यांनी शाळा सोडलेल्या तब्बल पंधराशेहून अधिक मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडले. त्यांचे काम केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित नाही. त्यात समुपदेशन, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचाही सहभाग आहे. सन्मान, आत्मविश्वास आणि नव्या संधी मिळवून देण्यावर त्यांचा भर असतो. यातूनच त्यांनी अनेक व्यक्ती आणि कुटुंबांना भविष्य नव्याने उभारण्याची ताकद दिली आहे.

डॉ. शाइस्ता युसूफ यांचा प्रवास साहित्य, उद्योग आणि सांस्कृतिक वारशाचा रंजक मिलाफ आहे. सुरुवातीला एक तरुण कवयित्री म्हणून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. 'गुल-ए-खुद्रो' आणि 'सूनी परछाईया' यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींना दाद मिळाली. पुढे त्या उर्दू साहित्यातील लोकप्रिय चेहरा बनल्या.

त्यांचा हा सर्जनशील प्रवास नाटक, रेडिओ आणि व्यवसाय क्षेत्रापर्यंत पोहोचला. त्यांनी कलेची आवड आणि व्यावसायिक दृष्टिकोन यात सुरेख समतोल साधला. 'महफिल-ए-निसा'सारख्या उपक्रमांमधून त्या उर्दू भाषेचा प्रसार करतात. महिला सक्षमीकरणासाठीही त्या हिरिरीने काम करतात. परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टी हातात हात घालून एकत्र चालू शकतात, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले आहे.

डॉ. जाहिदा खान यांची जीवनकथा म्हणजे जिद्द आणि स्वतःला नव्याने सिद्ध करण्याचा आदर्श आहे. त्यांचे लग्न कमी वयात झाले आणि त्यांच्यावर मातृत्वाची जबाबदारीही लवकर पडली. पण या परिस्थितीचा त्यांनी स्वप्नांवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

अत्यंत जिद्दीने शिक्षण पूर्ण करत त्यांनी पीएचडी मिळवली. त्यानंतर प्रसारमाध्यमे, प्रशासन आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत त्यांनी अष्टपैलू कारकीर्द घडवली. समाजसेवेच्या माध्यमातून त्या शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करतात. शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आहे. याच शिक्षणाच्या ताकदीवर अनेक पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

लोकांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी कथा सांगण्याचे माध्यम किती प्रभावी ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे फौजिया वाजिद. साहित्यिक वातावरणात लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांना लेखनाची खूप आधीपासूनच आवड निर्माण झाली.

समाजातील शंका-कुशंका झुगारून त्यांनी मास कम्युनिकेशन या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एक चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शक आणि 'झूक फिल्म्स'च्या संस्थापक-सीईओ म्हणून त्यांनी टेलिव्हिजन, सिनेमा आणि माहितीपटांवर उत्कृष्ट काम केले आहे. उपेक्षित घटकांचा आवाज समाजापर्यंत सहसा पोहोचत नाही. याच घटकांना त्यांनी ताकदीने सर्वांसमोर आणले. त्यांच्या कामातून ओळख, लिंगभेद आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातात. समाज घडवायचा असेल, तर स्वतःची कथा स्वतःच मांडणे आवश्यक असल्याचे त्या मानतात.

पोलीस दलातील नजमा फारुकी यांचा प्रवास म्हणजे सहानुभूती आणि विश्वासातून अधिकाराची नवी व्याख्या मांडणारा आहे. स्वतःच्या भक्कम मूल्यांतून प्रेरणा घेत त्या व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

संवेदनशील प्रकरणे हाताळताना त्यांनी दाखवलेली करुणा त्यांच्या अनुभवांची प्रगल्भता सांगून जाते. यातूनच त्यांची नैतिक आणि लोकांभिमुख पोलिसिंगबद्दलची बांधिलकी घट्ट झाली आहे. योग्य संवाद, सांघिक भावना आणि समाजाचा सहभाग या गोष्टींना त्या नेहमीच प्राधान्य देतात. वर्दीतील नेतृत्व हे एकाच वेळी खंबीर आणि संवेदनशील असू शकते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.

प्राध्यापिका सलमा बेगम यांचे जीवन म्हणजे शिक्षणाच्या प्रभावाचा शांत पण तितकाच भक्कम पुरावा आहे. करिअरच्या सुरुवातीलाच त्यांनी शिकवण्याची आवड ओळखली. शिक्षण सर्वांसाठी सहज आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.

विद्यार्थ्यांशी नाळ जोडली जावी, यासाठी त्यांनी कन्नड भाषेवर प्रभुत्व मिळवले. यातूनच त्यांच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या वृत्तीचे दर्शन घडते. शैक्षणिक यशासोबतच त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी 'सबला' (SABALA) सारख्या उपक्रमांची सुरुवात केली. शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, धाडस आणि नेतृत्वगुण निर्माण झाले पाहिजेत, हा त्यांचा ठाम विश्वास आहे.

या सर्व कर्तृत्ववान महिला खऱ्या अर्थाने 'परवाझ'च्या मूळ आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. सर्व मर्यादा ओलांडून झेप घेणे, नव्या शक्यतांना जन्म देणे आणि बदलासाठी प्रेरणा देणे, हेच त्यांचे ध्येय आहे.

या सर्वांचा जीवनप्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो. यश हे पदव्या किंवा हुद्द्यांवरून मोजले जात नाही. तुम्ही किती लोकांच्या आयुष्यात आनंद पेरला, किती जुन्या रूढी मोडल्या आणि इतरांसाठी कोणते नवे मार्ग तयार केले, यावरच खऱ्या यशाची उंची ठरते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter