सायरा शाह हलीम : सुखासीन आयुष्याला नकार देऊन, वंचितांचे आधार बनलेलं व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
सायरा शाह हलीम
सायरा शाह हलीम

 

शम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ

धर्म, भाषा आणि संस्कृतीच्या विविधतेवर बंगालचा समाज उभा आहे. आज हा समाज दुही आणि ध्रुवीकरणाच्या दबावाखाली भरडला जात आहे. अशा कठीण काळात काही लोकांचे अथक सामाजिक कार्य ही बहुविधतेची ज्योत तेवत ठेवत आहे. सायरा शाह हलीम हे त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव आहे. समाजकल्याण, शिक्षण, संस्कृती आणि लोकशाही मूल्यांसाठी त्या सातत्याने आपला आवाज उठवत आहेत.

सायरा शाह हलीम यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९७८ रोजी कोलकाता येथे झाला. त्या प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या पुतणी आहेत. केवळ कौटुंबिक पार्श्वभूमीवर त्या थांबल्या नाहीत. स्वतःचे सामाजिक विचार आणि कार्यातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह हे भारतीय लष्करात उच्च पदावर होते. पुढे त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले. वडिलांच्या बदल्यांमुळे सायरा यांचे बालपण देशाच्या विविध भागांत आणि परदेशात गेले. या अनुभवांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू दिले.

नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेशपासून ते अगदी सौदी अरेबिया, कुवेत आणि येमेनपर्यंत त्यांचा मुक्काम राहिला. तिथे त्यांना विविध संस्कृती, समाजव्यवस्था आणि माणसांचा संघर्ष अगदी जवळून पाहता आला. याच अनुभवांतून त्यांची विचारसरणी अधिक प्रगल्भ झाली. संकुचित विचारांच्या भिंती ओलांडून त्यांचा दृष्टिकोन अधिक मानवतावादी आणि सर्वसमावेशक बनला.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सलग १७ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली. व्यावसायिक यश आणि सुखासीन आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. तरीही समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. २००२ च्या गुजरात दंगलीची वेळ त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. त्या काळात वडिलांचा प्रशासकीय अनुभव आणि भोवतालची परिस्थिती याचा सायरा यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांचे सासरे आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत हाशिम अब्दुल हलीम यांचाही त्यांच्यावर प्रभाव राहिला. हलीम हे धर्मनिरपेक्ष राजकारणाचे प्रतीक मानले जायचे. त्यांच्या सहवासातून सायरा यांच्यात सामाजिक न्याय आणि लोकशाही तत्त्वांची पाळेमुळे अधिक घट्ट झाली.

समाजकल्याणाच्या कामात सायरा यांनी आरोग्य सेवेला प्राधान्य दिले. त्या 'कलकत्ता स्वास्थ्य संकल्प' या संस्थेशी सक्रियपणे जोडलेल्या आहेत. या संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अत्यंत अल्प दरात डायलिसिसची सुविधा पुरवली जाते. अनेक गरीब आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही सेवा अक्षरशः जीवनदायी ठरली आहे. आरोग्य सेवा हे कोणतेही दान नाही, तर तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, यावर सायरा यांचा ठाम विश्वास आहे.

शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. भारतातील सर्वात जुने पर्शियन संशोधन केंद्र असलेल्या 'इराण सोसायटी'च्या त्या आजीवन सदस्या आहेत. मध्य कोलकात्यात असलेले त्यांचे घर आता एक खुले सांस्कृतिक आणि साहित्यिक केंद्र बनले आहे. तिथे नियमितपणे 'दास्तानगोई', पुस्तक वाचन आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात. नवोदित आणि प्रस्थापित लेखकांच्या भेटीगाठी तिथे रंगतात. भाषा, संस्कृती आणि विचारांची मुक्त देवाणघेवाण हेच समाज उभारणीचे प्रमुख हत्यार असल्याचे त्या मानतात.

सायरा यांच्या मते समाजकल्याण आणि सामाजिक न्याय हे थेट राजकीय जाणिवेशी जोडलेले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि 'एनआरसी'ला त्यांचा तीव्र विरोध राहिला आहे. शेतकरी आंदोलनालाही त्यांनी भक्कम पाठिंबा दिला. संविधान आणि नागरी हक्कांच्या प्रश्नांवर त्या नेहमी आघाडीवर राहिल्या आहेत. यामुळेच त्या एका प्रबळ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समोर आल्या. धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण हे केवळ एक षड्यंत्र आहे, हे त्या वारंवार आवर्जून सांगतात. बेरोजगारी, महागाई, शिक्षण आणि आरोग्य यांसारखे मूळ प्रश्न लपवण्यासाठीच हा डाव खेळला जातो, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.

मारर्च २०२२ मध्ये त्यांनी बालीगंज विधानसभा पोटनिवडणूक लढवली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय-एम) उमेदवार म्हणून त्यांनी समाज आणि राजकारणाची हीच सांगड घालण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला नाही. मात्र, त्या मतदारसंघात डाव्या पक्षांच्या मतांची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढली. अनेक राजकीय जाणकारांच्या मते, हे डाव्या राजकारणाचे एक 'अनपेक्षित पुनरागमन' होते.

२०२४ मध्ये त्यांचे 'कॉम्रेड्स अँड कमबॅक्स' हे पुस्तक प्रकाशित झाले. यात सायरा यांनी डाव्या राजकारणाचे भविष्य आणि लोकशाहीच्या लढ्याविषयी सविस्तर मांडणी केली आहे. समाजकल्याण, समानता आणि पर्यायी समाजव्यवस्थेचा विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे.

स्वतःला त्या कधीच तारणहार मानत नाहीत. एका प्रदीर्घ सामाजिक लढ्याचा आपण केवळ एक छोटा हिस्सा आहोत, असे त्या विनम्रपणे सांगतात. आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि नागरी हक्कांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. याच अथक प्रयत्नांमुळे त्या समानता आणि सर्वसमावेशकतेचा एक प्रेरणादायी आवाज बनल्या आहेत. त्यांचे हे समाजकल्याणाचे विचार आता केवळ कोलकात्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. राष्ट्रीय पातळीवरही ते तितकेच समर्पक ठरत आहेत. येणाऱ्या काळात माणुसकी आणि सहिष्णुता हीच आपली सर्वात मोठी ताकद असेल, हाच त्यांच्या कार्याचा मूळ गाभा आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter