शहनाज परवीन : आंतरराष्ट्रीय तायक्वांदोमध्ये झळकणारी लडाखची पहिली महिला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
शहनाज परवीन
शहनाज परवीन

 

ओनिका माहेश्वरी

शहनाज परवीनची ओळख आता केवळ एखाद्या पदकापुरती किंवा एका विजयापुरती मर्यादित राहिलेली नाही. कारगिलच्या मातीत जन्मलेल्या शहनाजने कडाक्याच्या थंडीतही आपल्या जिद्द कायम ठेवली आहे. तायक्वांदोमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवणारी ती लडाखची पहिली मुलगी आहे. 

शहनाजची ही कहाणी सामाजिक बंधनांविरुद्धच्या संघर्षाची, घरातून बाहेर पडताना सोसाव्या लागलेल्या टोमण्यांची आणि स्वतःवर असलेल्या अढळ विश्वासाची आहे. याच विश्वासाने तिला देशातील आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवून दिले आहे.

नुकतीच १६ ते २० मार्च २०२६ दरम्यान ओडिशामधील बालासोर येथे अखिल भारतीय विद्यापीठ तायक्वांदो चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडू सहभागी झाले होते, ज्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली. मात्र, शहनाजने आपल्या उत्कृष्ट तंत्राचा आणि मानसिक ताकदीचा वापर करत सुवर्णपदकावर नाव कोरले. 
 

शहनाजच्या या विजयाने केवळ तिच्या विद्यापीठाची मान उंचावली नाही, तर कारगिलच्या मुली कोणापेक्षाही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध केले. प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी तिच्या धोरणात्मक खेळाचे आणि दबावाखाली डगमगून न जाता संयम राखण्याच्या वृत्तीचे भरभरून कौतुक केले.

शहनाजचा जन्म कारगिलमधील संकू या छोट्या गावात झाला. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शहनाजच्या घरात आधीच खेळाचे वातावरण होते. तिला एक भाऊ आणि तीन बहिणी असून तिची एक बहीण फुटबॉल खेळाडू आहे. लहानपणापासूनच शहनाजला विविध खेळांची आवड होती, पण तायक्वांदोशी तिची ओळख एका शालेय कार्यशाळेत झाली. आपल्याच वयाच्या मुलींना जोरदार किक मारताना पाहून तिच्या मनावर खोल परिणाम झाला. त्या मुलींचे धाडस पाहून तिनेही याच वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला.

या ताज्या विजयानंतर शहनाजने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने हे सुवर्णपदक म्हणजे अल्लाहकडून मिळालेली ईदी असल्याचे म्हटले आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक आणि कुटुंबाला दिले. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो, हे ती मान्य करते. 

शहनाजचा हा प्रवास सोपा नव्हता. तिने जेव्हा मार्शल आर्ट्समध्ये करिअर निवडले, तेव्हा तिला समाजातील एका घटकाकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. एका पुराणमतवादी पार्श्वभूमीतून आल्यामुळे तिला टीकेचे धनी व्हावे लागले. काही लोकांनी तर तिच्या कुटुंबाला असेही सुनावले की, तुम्ही समाजातील वातावरण बिघडवत आहात. मात्र शहनाज आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि आजूबाजूच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून तिने आपल्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले.

 
सुरुवातीच्या काळात ती बॅडमिंटनही खेळायची, पण लवकरच तिला उमजले की तिची खरी ओढ तायक्वांदोमध्येच आहे. तिने स्थानिक प्रशिक्षक मोहम्मद अली यांच्याकडून प्राथमिक प्रशिक्षण घेतले आणि नंतर जम्मूमध्ये अतुल पांगोत्रा यांच्याकडे सराव करण्यासाठी ती गेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा खेळ बराच सुधारला. जिल्हा आणि राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये तिने अनेक पदके जिंकली. २०२३ मध्ये जेव्हा तिने 'नॅशनल युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये सुवर्णपदक जिंकले, तेव्हा तिच्या करिअरला मोठे वळण मिळाले. असा पराक्रम करणारी ती लडाखमधील पहिली महिला ठरली, जो त्या भागासाठी एक ऐतिहासिक क्षण होता.

बालासोरमधील तिचा ताजा विजय तिच्या मेहनतीचाच पुरावा आहे. आज शहनाज अशा मुलींसाठी आशेचा किरण आहे, ज्या सामाजिक दबावामुळे आपली स्वप्ने दाबून ठेवतात. खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी नसून आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, हे तिने दाखवून दिले आहे. 

शहनाज सध्या रोहतकमधील महर्षी दयानंद विद्यापीठात आपले शिक्षण घेत आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये चीनमधील चेंगडू येथे झालेल्या 'एफआयएसयू (FISU) वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स'साठी तिची निवड झाली होती. या जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करणारी ती लडाखची पहिली महिला ठरली. तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आणि पदकाने हुलकावणी दिली असली तरी, जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी मुकाबला करण्याचा अमूल्य अनुभव तिला मिळाला. भारताची जर्सी घालणे हा तिच्यासाठी सर्वात अभिमानाचा क्षण होता.
 

तिने २०२४ मध्ये व्हिएतनाम येथे झालेल्या आशियाई तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरी गाठून देशाचा गौरव केला. देशांतर्गत स्पर्धांमध्येही तिने आपले वर्चस्व कायम राखले असून २०२५ मध्ये नाशिक येथील फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन लडाख प्रशासनाने तिचा आणि सहकारी खेळाडू सोनम चोसफाल यांचा गौरव केला. त्याच वर्षी ती र्‍हाइन-रुहर येथील वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी पात्र ठरली, मात्र दुखापतीमुळे तिला राउंड ऑफ ३२ मधून बाहेर पडावे लागले. तरीही हार न मानता तिने आपला प्रवास सुरूच ठेवला. ती एक लक्ष्य स्कॉलर देखील आहे. लडाख स्टेट चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकून तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली.

शहनाजची कथा आपल्याला शिकवते की प्रतिभेला मोठ्या शहरांची किंवा आधुनिक सुविधांची गरज नसते. जिद्द असेल तर कारगिलच्या अरुंद गल्ल्यांमधून येऊन जागतिक स्तरावर चमकता येते. तिचे यश आपल्या मुलींना कमी लेखणाऱ्या पालकांसाठी एक मोठा संदेश आहे. आज शहनाज एक आदर्श बनली असून येणाऱ्या काळात देशाला तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

आपले पाय जमिनीवर ठेवून आभाळाला गवसणी घालण्याची शहनाजची वृत्ती खरोखरच प्रेरणादायी आहे. तिचा प्रवास भावी पिढ्यांना ऊर्जा देत राहील आणि भारतीय तायक्वांदोच्या भविष्यात तिचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. कारगिलची ही कन्या इथेच थांबणार नाही, तर ती आणखी उत्तुंग शिखरे सर करण्यासाठी सज्ज आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter