सानिया अंजुम, बेंगळुरू
जग जेव्हा दुराव्याच्या छायेत वावरत असते, तेव्हा आशा आणि कृतीची ज्योत पेटवणारे काही 'चेंजमेकर्स' प्रकाशाचा किरण बनून येतात. तरुण स्काउट्स असोत, समाजातील नेते असोत किंवा जागतिक संघटना; सर्वांच्या नजरा अशाच दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वांकडे लागलेल्या असतात. जे संस्कृतींचे पूल बांधतात, तरुणांना सक्षम करतात आणि आव्हानांना संधीत बदलतात.
मोहम्मद अली खालिद हे अशाच ध्येयवेड्या नेतृत्वाचे नाव! भारताचे 'ब्रॉन्झ वुल्फ' पुरस्कार विजेते. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी स्काउटिंग चळवळीला आकार दिला आहे. 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या नेतृत्वातून लाखो तरुणांना जोडण्यापासून ते २०१७ चा भव्य नॅशनल जांबोरी आणि २०२२ चा इंटरनॅशनल कल्चरल जांबोरी आयोजित करण्यापर्यंत, त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःच्या खिशाला कात्री लावून त्यांनी २४ वर्षे देशसेवा केली. एका व्यक्तीची जिद्द हजारो पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकते, याचा जिवंत पुरावा म्हणजे खालिद यांची ही कहाणी...
१९८०चे दशक. बंगळुरूची ती गजबजलेली सकाळ. १० व्या नॅशनल जांबोरीच्या (स्काउट्सचा महामेळावा) तयारीची लगबग सुरू होती. तंबूंचे शहर वसले होते. साहसाच्या आणि बंधुत्वाच्या ओढीने भारतभरातून हजारो तरुण तिथे जमले होते. त्या गर्दीत एक तरुण स्वयंसेवक उत्साहाने धावपळ करत होता.
त्या तरुणाला तेव्हा कल्पनाही नसेल, पण त्या दिवशी त्याच्या मनात पडलेली स्काउटिंगची ठिणगी पुढे ४० वर्षे तेवत राहणार होती. ही ज्योत केवळ त्याचेच नाही, तर जगभरातील लाखो स्काउट्सचे आयुष्य प्रकाशमान करणार होती. तो तरुण म्हणजेच - मोहम्मद अली खालिद.
स्काउटिंगचे वचन जगणारे नेतृत्व
परंपरा आणि आधुनिकत यांच्यातील संघर्षाच्या काळात वाढलेल्या खालिद यांनी स्काउटचे वचन मनापासून जपले. 'सर्वोत्तम प्रयत्न करणे, इतरांना मदत करणे आणि देशसेवा करणे' हे त्यांनी जीवनाचे ध्येय मानले.
एका सामान्य स्वयंसेवकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. १९९९ पर्यंत ते 'भारत स्काउट्स अँड गाईड्स' (BSG) च्या कार्यकारी समितीचे सदस्य बनले. आज या संस्थेचे ६३ लाखांहून अधिक सदस्य आहेत. जागतिक स्तरावर इंडोनेशियानंतर ही दुसरी सर्वात मोठी स्काउट संस्था आहे.
खालिद यांची ही झेप कोणत्याही महत्त्वाकांक्षेपोटी नव्हती. स्काउटिंगमुळे तरुण मनांना योग्य आकार मिळतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. "एकदा स्काउट, तो कायमचा स्काउट," हा त्यांचा मंत्र आहे. याच मंत्रासाठी त्यांनी मोठा त्याग केला. तब्बल २४ वर्षे त्यांनी देशसेवेसाठी स्वतःच्या खर्चाने प्रवास केला. कधीही परताव्याची अपेक्षा ठेवली नाही.
भारताचा ठसा उमटवला
राष्ट्रीय स्तरावर खालिद यांच्या कामाचा प्रभाव जबरदस्त होता. २००३ ते २००९ या काळात वित्त समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेला आर्थिक स्थैर्य दिले. पण २०११ ते २०१७ या काळात 'आंतरराष्ट्रीय आयुक्त' म्हणून त्यांनी आपली खरी ताकद दाखवली.
त्यांनी आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील (APR) स्काउट संस्थांशी भारताचे नाते घट्ट केले. प्रतिस्पर्ध्यांना मित्र बनवले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच भारतीय स्काउटिंगला जागतिक स्तरावर सन्मान मिळाला.
जांबोरी: एकतेचा महाकुंभ
२०१७ मध्ये त्यांनी १७ व्या नॅशनल जांबोरीचे म्हणजे स्काउट्सचा महामेळाव्याचे नेतृत्व केले. २६,००० हून अधिक सहभागींसह हा त्यावेळचा सर्वात मोठा मेळावा ठरला. खालिद यांनी या मेळाव्याचे केवळ व्यवस्थापन केले नाही, तर त्यात भारतीय संस्कृतीचा आत्मा ओतला. लोकनृत्य आणि योगाच्या माध्यमातून त्यांनी जागतिक स्काउट्सना भारताची ओळख करून दिली.
त्याहूनही मोठे आव्हान होते २०२२चे 'इंटरनॅशनल कल्चरल जांबोरी'. कोरोनाचे सावट असताना त्यांनी कर्नाटकात हा मेळावा आयोजित करण्याचे धाडस केले. ६०,०००हून अधिक मुला-मुलींना एकत्र आणणारा हा कार्यक्रम आशेचा किरण ठरला. "जग अलिप्ततेमुळे विभागलेले असताना, आम्ही सामायिक कथा आणि हास्यातून माणुसकीचे पूल बांधले", असे खालिद अभिमानाने सांगतात.
आशिया-पॅसिफिकसाठी 'व्हिजन'
खालिद यांची दृष्टी भारतापुरती मर्यादित नव्हती. १९९५पासून त्यांनी आशिया-पॅसिफिक क्षेत्रासाठी काम सुरू केले. 'व्हिजन २०१३' या आराखड्याचे ते शिल्पकार ठरले. या आराखड्यानेच आशियाई देशांना जागतिक उद्दिष्टांशी जोडले. युवा सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाचा मार्ग त्यांनी दाखवला. यामुळे साधनसामग्रीची कमतरता असलेल्या देशांनाही आपले पाय रोवता आले.
जागतिक मंचावर मुत्सद्देगिरी
२००५ मध्ये ट्युनिशियातील जागतिक परिषदेत त्यांनी गुंतागुंतीचे ठराव सहजतेने मंजूर करून घेतले. त्याच वर्षी बंगळुरूमध्ये 'वर्ल्ड स्काउट सेमिनार'चे आयोजन केले. स्थानिक सरकारची मदत घेऊन त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यातूनच 'माराकेश चार्टर - बंगळुरू आवृत्ती'चा जन्म झाला.
प्रशासनातील दरी सांधणारा दुवा
२०१४ ते २०१७ या काळात जागतिक संघटनेत (WOSM) फी आणि मतदानाच्या मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाले होते.यावेळी खालिद यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली. त्यांच्या तटस्थ आणि समंजस भूमिकेमुळे संशयाचे वातावरण दूर झाले. २०२४च्या जागतिक परिषदेत सादर होणारी नवीन फी सिस्टीम, ही त्यांच्याच मुत्सद्देगिरीचे फळ आहे. एका सहकाऱ्याने तर म्हटले होते, "खालिद यांनी संवादाचे पूल बांधले नसते, तर अविश्वासामुळे आमची प्रगतीच खुंटली असती."
'SAANSO'ची स्थापना
त्यांनी १३ आशियाई देशांचा दौरा केला. दुर्गम भागातील स्काउटिंगची ताकद त्यांनी ओळखली. भूतानमधील तरुण पर्यावरणाचे रक्षण करत होते, तर मालदीवमधील मुले हवामान बदलाशी लढत होती. या अनुभवातूनच २०१०मध्ये त्यांनी 'SAANSO' (दक्षिण आशियाई स्काउट संघटना) स्थापन केली. भू-राजकीय तणाव असतानाही त्यांनी या माध्यमातून तरुणांना एकत्र आणले.
७०व्या वर्षीही तरुणाचा उत्साह
खालिद यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्याग त्यांच्या कहाणीला वेगळी उंची देतात. वयाच्या सत्तरीतही ते थांबलेले नाहीत. २०२० पासून ते 'अतिरिक्त मुख्य राष्ट्रीय आयुक्त' म्हणून अविरत सेवा देत आहेत. २०२४ पर्यंत सदस्यत्व २० टक्क्यांनी वाढवण्याचे आणि समित्यांमध्ये तरुणांना ३० टक्के वाटा देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
त्यांच्या सेवेची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. २०१० मध्ये 'सिल्व्हर वर्ल्ड अवॉर्ड', २०१२ मध्ये 'डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस अवॉर्ड' आणि १९९४ मध्ये भारताचा 'सिल्व्हर एलिफंट'. आता त्यांना स्काउटिंगमधील सर्वोच्च अशा 'ब्रॉन्झ वुल्फ' पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. पण खालिद यांच्यासाठी हे पुरस्कार गौण आहेत. त्यांच्या हाताखाली घडलेले असंख्य तरुण नेते, हेच त्यांचे खरे यश आहे.
खालिद यांची ही कहाणी एका क्रांतीची आहे. आव्हानांना संधीत बदलणारे त्यांचे नेतृत्व आहे. "स्काउटिंग म्हणजे केवळ शिबिरे नाहीत; तर संवेदनशील नेते घडवणारी शाळा आहे." याची ते जगाला आठवण करून देतात. 'ब्रॉन्झ वुल्फ' स्वीकारताना त्यांच्या नेतृत्वाची मशाल आजही लखलखत आहे. एका व्यक्तीचे समर्पण हजारो पिढ्यांचा मार्ग कसा उजळवू शकते, याचा हा जिवंत पुरावा आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -