सानिया अंजुम
एका तरुण फोटोग्राफरचे चित्र डोळ्यासमोर आणा. तो उंचावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसला आहे. खाली जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा, आकार घेत आहे. त्याचा फक्त सांगाडा उभा आहे. मागे दुबईची बदलती क्षितिजरेषा खुणावत आहे. वाळवंटातील एक स्वप्न सत्यात उतरताना तो आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे.
हा असाधारण प्रवास आहे ७९ वर्षीय मुश्ताक अहमद यांचा. एका भारतीय स्थलांतरिताचे रूपांतर दुबईच्या सुवर्णयुगाच्या इतिहासकारात झाले. त्यांनी आपल्या कॅमेरा लेन्सद्वारे त्या शहराचा आत्मा जपला.
महानतेचे स्वप्न पाहणाऱ्या वाळवंटाच्या हृदयात, मुश्ताक अहमद यांनी आपली लेन्स एखाद्या जादूच्या कांडीसारखी फिरवली. क्षणभंगुर क्षणांचे रूपांतर त्यांनी शाश्वत इतिहासात केले. दुबईचा उदय असो किंवा पवित्र स्थळे आणि राजेशाही वारसा, हे सर्व त्यांनी अमर केले. एका माणसाची जिद्द राष्ट्राचा जमिनीपासून आकाशापर्यंतचा प्रवास कसा टिपू शकते, हे त्यांनी जगाला दाखवून दिले.
बंगळुरू ते दुबई : एक अभूतपूर्व प्रवास
भारतातील बंगळुरू येथे जन्मलेले मुश्ताक अहमद संधीच्या शोधात युएईच्या सुरुवातीच्या काळात तिथे पोहोचले. नशिबाने त्यांना एका नव्या वाटेवर नेले. २०१८ मध्ये निवृत्त होईपर्यंत तब्बल ४१ वर्षे ते दुबई पोलिसांच्या फोटोग्राफी विभागाचे प्रमुख होते. आता वयाच्या ७९ व्या वर्षी (२०२५ मध्ये) हे निवृत्त फर्स्ट वॉरंट ऑफिसर आपल्या असाधारण आयुष्याकडे वळून पाहतात.
त्यांनी केवळ फोटो काढले नाहीत. वाळूच्या ढिगाऱ्यांपासून गगनचुंबी इमारतींपर्यंत उभे राहणाऱ्या शहराचे स्पंदन त्यांनी टिपले. मक्का आणि मदिनेच्या पवित्र स्थळांपासून ते दुबईच्या गजबजलेल्या परिवर्तनापर्यंत त्यांचे काम संस्कृतींना जोडणारे ठरले. ते इतिहासाचे मूक साक्षीदार बनले.
फोटोग्राफीची आवड आणि प्रगती
मुश्ताक यांचे फोटोग्राफीवरील प्रेम लवकरच जागृत झाले होते. पण त्याला खरा कॅनव्हास दुबईत मिळाला. दुबई पोलिसांमध्ये सामील होऊन ते फोटोग्राफी विभागाचे प्रमुख बनले. प्रगत तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा प्रवास केला. ती नवनिर्मिती घरी आणली.
ते आठवण सांगतात, "लेफ्टनंट जनरल धाही खलफान तमीम आणि लेफ्टनंट जनरल अब्दुल्ला खलिफा अल मारी यांच्यासोबत काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता." त्यांच्या लेन्सने प्रगतीचे सार टिपले. दैनंदिन कर्तव्यांना त्यांनी संग्रहित खजिन्यात बदलले.
पवित्र क्षणांचे चित्रण
इस्लामच्या पवित्र स्थळांची छायाचित्रे काढणे ही मुश्ताक यांची सर्वात मोठी कामगिरी होती. मक्केतील काबा आणि मदिनेचे शांत सौंदर्य टिपण्यासाठी त्यांनी क्रेनचा वापर केला. आणि दुर्मिळ आणि आत्म्याला भिडणारे क्षण त्यांनी टीपले.
हे फोटो आज जगभरातील मुस्लिम घरांच्या भिंतींवर शोभून दिसतात. ते सांगतात, "मी पहिल्यांदा कॅमेऱ्यातून काबा आणि मदिना टिपले, ती भावना शब्दांत सांगण्यासारखी नव्हती. तो आदर आणि विस्मय यांचा मिलाफ होता."
दिग्गजांच्या भेटी
मुश्ताक यांचा प्रवास युएईच्या दिग्गज नेत्यांशी जोडला गेला. त्यांनी शेख झायेद बिन सुलतान अल नह्यान यांना जवळून पाहिले. त्यांच्या साधेपणाने आणि माणुसकीने मुश्ताक भारावून गेले. "मी पहिल्यांदा त्यांना जवळून पाहिले. त्यांच्या उबदारपणाने आणि दृष्टीने मी प्रभावित झालो. ते राष्ट्रासाठी पितृतुल्य होते."
शेख रशीद आणि शेख मक्तुम यांच्यासोबतही त्यांनी असेच क्षण अनुभवले. ते सांगतात, "माणूस म्हणून, सत्तेच्या शिखरावर असूनही त्यांच्यात नम्रता होती."
राजेशाही उत्सव : शेख मोहम्मद यांचा विवाह
१९७९ मध्ये शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांच्या विवाहाचे छायाचित्रण करणे हा त्यांच्या कारकिर्दीचा कळस होता. आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या गर्दीत मुश्ताक यांनी धाडसाने शासकाला फोटोसाठी वाहनातून खाली उतरण्याची विनंती केली. "त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि विचारले, 'मी खाली उतरावे असे तुमचे म्हणणे आहे का?' मी होकार दिला. त्यांनी आनंदाने ते मान्य केले," असे मुश्ताक सांगतात.
हवाई दृश्ये: क्लॉक टॉवर ते बुर्ज खलिफा
मुश्ताक यांच्या हवाई छायाचित्रणाने दुबईचा कायापालट नोंदवला. १९७०च्या दशकात, मक्तुम पूल अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांनी क्लॉक टॉवर टिपला. १९८०च्या दशकात, शेख झायेद रोड होण्यापूर्वी त्यांनी हेलिकॉप्टरमधून दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरचे फोटो काढले.
२०१४ मधील बुर्ज खलिफाचा त्यांचा शॉट आजही त्यांचा आवडता आहे. "वाळूच्या ढिगाऱ्यांतून जागतिक आयकॉनकडे झेप घेणाऱ्या दुबईचे प्रतीक होता," असे ते म्हणतात.
सेवेचा अभिमान : ४१ वर्षे दुबई पोलिसांसोबत
फोटोग्राफी विभागाचे प्रमुख म्हणून, युएईचा इतिहास जतन करणे हाच मुश्ताक यांचा सर्वात मोठा अभिमान आहे. "वाळवंटातील ओॲसिसपासून ते कॉस्मोपॉलिटन शहरापर्यंत, मी हे सर्व पाहिले आहे," असे ते म्हणतात.
निवृत्तीनंतर दुबई पोलिसांनी त्यांचा सन्मान केला. कर्नल डॉ. अहमद मोहम्मद अल सादी यांनी त्यांना मिठी मारली. कपाळावर चुंबन घेतले. "तो एक भावनिक क्षण होता. एका निवृत्त व्यक्तीसाठी तो दुर्मिळ होता," असे मुश्ताक भारावून सांगतात.
कुटुंबाचा आधार
या संपूर्ण प्रवासात मुश्ताक यांचे कुटुंब त्यांचा खंबीर आधारस्तंभ राहिले. त्यांची पत्नी आणि सात मुलांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाला साथ दिली. "इतिहास टिपण्याच्या माझ्या आवडीला त्यांनी समजून घेतले," असे ते कृतज्ञतेने नमूद करतात.
अपेक्षेशिवाय दयाळूपणा
कॅमेऱ्याच्या पलीकडे मुश्ताक अनेकदा अशा क्षणांचे चिंतन करतात. या क्षणांनी त्यांना जीवनाचे धडे दिले. जपानच्या सहलीत एखाद्या ठिकाणापेक्षा तिथे अनुभवलेल्या साध्या दयाळूपणाच्या कृतींनी त्यांना जास्त स्पर्श केला. एका तरुण स्टेशन अटेंडंटने त्यांची व्हिलचेअर नेण्यासाठी मदत केली. क्योटोमधील रिक्षाचालकाने अतिरिक्त पैसे घेण्यास विनम्रपणे नकार दिला. या नम्र कृतींनी त्यांना आठवण करून दिली. खरी आदरातिथ्य अनेकदा लहान गोष्टींमध्ये असते.
संगीताचे आणि सिनेमाचे दिग्गज
राजघराण्यांच्या पलीकडे मुश्ताक यांचे जीवन भारतीय आणि पाकिस्तानी मनोरंजनाशीही जोडले गेले. त्यांनी गुलजार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, तलत मेहमूद, दिलीप कुमार आणि राहत फतेह अली खान यांसारख्या दिग्गजांची भेट घेतली. या भेटी केवळ फोटोपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्या भिन्न संस्कृती जोडणाऱ्या गप्पांचे पूल होत्या.
लष्करी महानायकांच्या भेटी
त्यांनी फिल्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांचीही भेट घेतली. ते भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ होते. "अशा व्यक्तिमत्त्वाला भेटणे म्हणजे इतिहासाला स्पर्श करण्यासारखे होते," असे मुश्ताक म्हणतात.
सर्वोत्तम शॉट : अजून यायचा आहे
मुश्ताक यांना त्यांच्या सर्वात आवडत्या छायाचित्राबद्दल विचारले जाते. तेव्हा ते नम्रपणे उत्तर देतात, "अजून यायचा आहे". यातून त्यांची कलेप्रती असलेली अखंड निष्ठा दिसते.
मुश्ताक अहमद हे केवळ फोटोग्राफर नाहीत. ते चेंजमेकर आहेत. त्यांनी बदलत्या दुबईची कहाणी आपल्या कॅमेरात जतन केली. त्यांच्या लेन्सने पवित्र स्थळांपासून ते गगनचुंबी इमारतींपर्यंत वास्तूंना प्रतिमाबद्ध तर केलेच, मात्र ऐतिहासिकत्वही प्रदान केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -