सानिया अंजुम, बेंगळुरू
आजच्या काळात जिथे स्वतःची प्रसिद्धी करण्याची चढाओढ लागली आहे, तिथे रहमत तारीकेरे यांची नम्रता मनाला भावते. त्यांची कहाणी जगासमोर मांडण्यासाठी मी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी संकोचाने विचारले, "मी माझ्याबद्दल काय बोलणार? मी काही चेंजमेकर नाही!" स्वतःचा प्रवास सांगणे इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते, हे त्यांना पटवून देण्यासाठी मला नेहमीपेक्षा दुप्पट मेहनत घ्यावी लागली.
पण नंतर विचार केला, या कन्नड विद्वान, कवी आणि विचारवंताचे ३० ग्रंथ आणि असहिष्णुतेविरुद्ध त्यांनी घेतलेली धाडसी भूमिका त्यांच्या नम्रतेपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. आपल्या विखुरलेल्या जगात बहुलवादाचे (Pluralism) धागे विणणारे ते क्रांतिकारक आहेत, हेच त्यातून सिद्ध होते.
संमिश्र संस्कृतीचे बाळकडू
कर्नाटकातील तारीकेरे तालुक्यातील समताला या छोट्याशा गावात २६ ऑगस्ट १९५९ रोजी रहमत यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अशा ठिकाणी गेले जिथे विविधता ही केवळ चर्चेची बाब नव्हती, तर रोजच्या जगण्यातून ती प्रतिबिंबित होत असे.
त्यांचे वडील लोहार होते. ते दिवसभर भट्टीत लोखंडाला आकार देत. आई अरबीच्या शिक्षिका होत्या. त्या मुलांना भाषेचे धडे देत. अशा कष्टकरी वस्तीत रहमत वाढले. तिथे हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदत होते.
श्रद्धा, भाषा आणि संघर्षांच्या या मिश्रणाने तारीकेरे यांची जडणघडण झाली. "मी अशा वस्तीत वाढलो जिथे सर्व धर्मांचे लोक एकत्र राहत होते," अशी आठवण ते सांगतात. हीच आठवण त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याचा पाया ठरली.
वडिलांनी त्यांना कन्नड माध्यमाच्या शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. हा क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. इथूनच त्यांच्या मनात भाषेबद्दलची ओढ निर्माण झाली. पुढे जाऊन त्यांनी कन्नड साहित्याची आणि संस्कृतीची नवी मांडणी केली. एकता लादता येत नाही, तर ती सामायिक मानवी अनुभवातून रुजवावी लागते, या विश्वास उराशी बाळगून त्यांचा प्रवास सुरू झाला.
एका शोधयात्रेची सुरुवात
१९९२ मध्ये बाबरी मस्जिद विध्वंसाची घटना घडली. तरुण अभ्यासक तारीकेरे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. तेव्हा ते कन्नड साहित्यात मग्न होते. ‘या धार्मिक आजारावर औषध काय?’ हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करू लागला. केवळ आधुनिक विचारसरणी किंवा तर्कवाद जातीय दरी मिटवू शकेल का, यावर त्यांनी चिंतन सुरू केले.
या अस्वस्थतेने त्यांच्या संशोधनाला नवी दिशा दिली. केवळ पुस्तकी अभ्यासाच्या चौकटी मोडून त्यांनी कर्नाटकातील लोकांच्या जिवंत तत्त्वज्ञानाचा शोध घेतला. सुफीवाद, नाथपंथ, शाक्तपंथ आणि लोकपरंपरा यांच्या मुळाशी ते गेले.
या केवळ पुस्तकातील कल्पना नव्हत्या, तर जिवंत प्रथा होत्या ज्यांनी शतकानुशतके समाजाला एकत्र बांधून ठेवले होते. तारीकेरे यांनी कर्नाटकातील खेडोपाडी पायपीट केली. तिथे त्यांनी अशा द्विभाषिक कवींना ऐकले, जे सीता आणि रामाच्या कथांसोबतच हसन, हुसेन आणि फातिमा यांच्या कथाही तितक्याच भक्तीने सांगत होते.
त्यांना आढळले की, कर्नाटकातील मोहरम हा इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. तो एक अद्वितीय सांस्कृतिक सोहळा आहे. इथे लोक धर्माच्या भिंती ओलांडून परंपरा, संगीत आणि नृत्यात सहभागी होतात.
याच शोधक वृत्तीतून त्यांची ३० पुस्तके आकाराला आली. यात 'कर्नाटकदा सुफीग्लू' (कर्नाटकातील सुफी), 'नाथिझम ऑफ कर्नाटक', 'शाक्तिझम ऑफ कर्नाटक' आणि 'मोहरम ऑफ कर्नाटक' यांचा समावेश आहे. त्यांच्या चार पुस्तकांना राज्य साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. तर २०१० मध्ये 'कत्तियांचिना दारी' (Kattiyanchina Daari) या पुस्तकाला प्रतिष्ठित केंद्र साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.
कन्नड साहित्याला दिली नवी दृष्टी
तारीकेरे यांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच थक्क करणारा आहे. शिमोगा येथील सह्याद्री कॉलेजमधून बी.ए. केल्यानंतर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून कन्नड साहित्यात एम.ए. केले. तिथे त्यांनी प्रथम क्रमांक आणि तब्बल सात सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर पीएच.डी. आणि हंपी येथील कन्नड विद्यापीठात प्राध्यापक व डीन म्हणून त्यांनी काम पाहिले. पण ते कधीच हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे प्राध्यापक झाले नाहीत.
त्यांनी अभ्यासाची पारंपरिक चौकट मोडली. कर्नाटकातील संमिश्र परंपरांचा शोध घेण्यासाठी त्यांनी सांस्कृतिक अभ्यास आणि आंतरधर्मीय संवादाला महत्त्व दिले. त्यांचा वर्ग म्हणजे नवीन विचारांची प्रयोगशाळाच होती. तिथे त्यांनी संशोधकांच्या एका पिढीला घडवले. लोककवी, सुफी संत आणि नाथपंथी साधूंचे उपेक्षित आवाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
साहित्यिक समीक्षेची सांगड सांस्कृतिक विश्लेषणाशी घालून त्यांनी सिद्ध केले की कन्नड साहित्य केवळ प्रादेशिक बाब नाही, तर ती बहुलवादी विचारांची एक समृद्ध वीण आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -