समीर शेख
देशाच्या फाळणीपूर्वी जामा मस्जिदच्या पायऱ्यांवरून मौलाना आझाद यांनी भारतीय मुस्लिमांना देशातील त्यांच्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून दिली होती. स्वतःचा सांस्कृतिक वारसा विस्मृतीत गेला की समाजाचा ऱ्हास अटळ असतो. तो आधी सांस्कृतिक आणि नंतर सामाजिक आणि राजकीय गुलामीत ढकलला जातो हे सार्वकालिक सत्य कदाचित मौलाना जाणत असावेत. म्हणूनच त्या भाषणात ते अतिशय पोटतिडकीने भारतीय मुस्लिमांना भानावर आणत होते. निद्रिस्त अवस्थेतील समाजात जागृती घडवून त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी प्रत्येक काळात नवे नेतृत्व उदयाला येते आणि समाजाला दिशा दाखवते.
भारताच्या इतिहास आणि वर्तमानातील बऱ्याचशा सामाजिक आणि सांस्कृतिक चर्चा उत्तर भारत केंद्री असतात. त्यामुळे दक्षिण भारत, विशेषतः दख्खनसारखा मुस्लीम वारशाने समृद्ध असणारा प्रदेश आणि इथला सामाजिक - सांस्कृतिक प्रवाह यांवर फारच कमी बोलले, लिहिले जाते. परिणामी इथला मुस्लीम समाज उर्वरित भारतीय मुस्लिमांपेक्षा सांस्कृतिक वारशाबाबत अधिक गफलतीत अडकलेला दिसतो. त्यामुळे तो केवळ सांस्कृतिकच नव्हे तर प्रादेशिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही प्रचंड संभ्रमावस्थेत दिसतो. आज महाराष्ट्रीय मुस्लिमांचा विचार करता ही बाब फारच प्रकर्षाने जाणवते.
महाराष्ट्रीय मुस्लिमांसमोरील या पेचाला भिडणारा अलीकडच्या काळातील उमदा मुस्लीम तरुण म्हणजे सरफराज अहमद. सोलापूरसारख्या रूढ अर्थाने ग्रामीण म्हणवल्या जाणाऱ्या भागातून येणाऱ्या सरफराजने महाराष्ट्रातील मुस्लिमांमध्ये सांस्कृतिक भान जागे करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी गेल्या ८-१० वर्षांत त्याने केलेले कार्य आश्वासक आणि प्रेरणादायी आहे.
सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात ABVPमधून आणि नंतर डाव्या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय चळवळीत आलेल्या सरफराजने पुढे आपला मोर्चा इतिहासाकडे वळवला. याविषयी ‘आवाज द व्हॉंइस’शी बोलताना तो सांगतो, “भारतीय मुसलमान स्वतःविषयी सांस्कृतीकदृष्ट्या किती सजग आहेत? स्वतःचे स्वयंभू, सार्वभौम सांस्कृतिक राजकारण विकसित करण्यासाठीची त्याची आजची राजकीय समज किती प्रगल्भ आहे? तशा पध्दतीचे सांस्कृतिक व राजकीय शिक्षण त्याला मिळते का? किंवा ते मिळावे म्हणून त्याने स्वतः तरी तशी धडपड कधी केली आहे का? स्वातंत्र्यानंतर अशा प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण मुसलमानांचे सांस्कृतिक अवकाश शोधू लागतो तेव्हा हाती काय लागते? रितेपणा, संभ्रम, अज्ञान आणि चुकीच्या माहितीतून उद्भवलेली मुल्यनिष्ठा, वर्तमानातल्या गोंधळलेल्या भुमिका, अश्रीत होण्याची मानसिकता…”
सरफराज पुढे म्हणतो, “मुसलमानांचे नीटसे न झालेले सांस्कृतिक शिक्षण हे या समस्येचे मूळ आहे. त्यामुळे मुसलमानांना सांस्कृतिकदृष्ट्या शिक्षित करण्यासाच्या उद्देशाने आम्ही काही मित्रांनी इतिहासाचा धांडोळा घेण्यास सुरुवात केली. त्यातून २००५मध्ये ॲड. सय्यद शाह गाजीउद्दीन यांच्या संकल्पनेतून ‘इदारा बराए मुतालीआ तहकीक व तारीख ए दखन’ या दखनी मुस्लिम संस्कृतीच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या अभ्यासकेंद्राची आम्ही स्थापना केली.”
सरफराजने दख्खनी संस्कृतीतील मुस्लीमांचे योगदान याविषयाचा अभ्यास करण्यसाठी स्वतःला वाहून घेतले. पुढे इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्याने याच विषयावर लेखनाला सुरुवात केली. याविषयी तो सांगतो, “इंग्रजांनी उत्तरेतल्या मोठ्या मुस्लिम राजवटी संपवल्यानंतर तर उत्तरेचे अनेक विद्वान, मोठे सरंजामदार हे दखनेतील आसिफजाहीत नोकऱ्या धरुन मोठ्या पदावर पोहोचले. त्यामुळे दखन, दखनी भाषा, सामान्य दखनी मुसलमान हे मागे पडत गेले. दखनी मुसलमानांचे हे सांस्कृतिक व राजकीय मागासलेपण दिवसेंदिवस वाढत गेले. आजही दखनी मुसलमानांचे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय नेतृत्वाचे अवकाश उत्तर भारतीयांनी व्यापले आहे.”
हा सांस्कृतिक बदलांचा पट मांडताना सरफराज अतिशय महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतो. तो म्हणतो, “उत्तर भारतात निर्माण झालेल्या धर्मवादी संघर्षाच्या समस्या कारण नसताना दखनी मुसलमानांचे वर्तमान बनले आहे. त्यामुळे दखनी मुसलमानांना स्वयंभू बनवण्यासाठी भुतकालीन किंवा आताच्या उत्तर भारतीय धार्मिक सरंजामदारांच्या वर्चस्वातून मोकळे केले पाहिजे. त्यासाठी मुसलमानांचे दखनी सांस्कृतिक राजकारण विकसित करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. म्हणून मागच्या वीस वर्षापासून या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत.”
सरफराज प्रकाशझोतात आला तो ‘सल्तनत ए खुदादात’ या टिपू सुलतानवरील मराठीतील पहिल्या अभ्यासपूर्ण ग्रंथाचा लेखक म्हणून. पुढे या विषयावर त्याने महाराष्ट्रभर फिरून शेकडो सभा गाजवल्या. सैरभैर झालेल्या दखनी मुस्लीम तरुणांसमोर त्याने टिपू सुलतानचा आदर्श प्रशासक म्हणून नवा ऐतिहासिक नायक उभा केला. तत्पूर्वी त्याकडे केवळ धार्मिक अंगाने बघितले जात होते. महाराष्ट्रातील अभ्यासकांनीही सरफराज यांना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. मराठी सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वातील गेल्या पन्नास वर्षांतील ही मोठी क्रांतिकारी घटना म्हणता येईल.
यानंतर सरफराजने मागे वळून पाहिले नाही. गेल्या पाच-सात वर्षांत भारतीय आणि विशेषतः दखनी मुस्लिमांचे सांस्कृतिक समाजभान जागृत करणारी आणि बहुसंख्याक समाजाचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक स्वच्छ करणारी अनेक पुस्तके सरफराजच्या लेखणीतून आकाराला आली. ‘सल्तनत ए खुदादाद’ सोबतच त्याची ‘भारतीय इतिहास लेखन आणि विपर्यास’, ‘टिपू सुलतान - पत्रसार संग्रह’, ‘राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान’ आणि ‘आसिफजाही’ ही पुस्तके मराठीत प्रसिद्ध झाली आणि लोकप्रिय ठरली आहेत.
आजवर प्रकाशित लेखन आणि पुस्तकांमधून काय साध्य करू पाहताय असे विचारले असता सरफराज म्हणतो, “मला माझ्या समाजात सांस्कृतिक विवेक जागवायचा आहे. त्यातून ते राजकीय पातळीवरचे शहाणपण सहज मिळवतील मग सबलीकरणाच्या दिशेने वाटचाल करायला लागतील. समज, सबलीकरण, सार्वभौमत्व अशा त्रिसुत्रीवर मी सध्या काम करतोय. माझ्या पुस्तकातून काहीसे मी हेच साधण्याचा प्रयत्न केला आहे.”
सरफराज अहमदची खरी धडपड आहे ती मुस्लिमांमध्ये ज्ञाननिर्मितीला चालना मिळावी आणि त्यांचे स्वतःचे सांस्कृतिक नरेटीव्ह तयार व्हावे यासाठीची. याचे महत्त्व स्पष्ट करताना सरफराज सांगतात, “सांस्कृतिक गुलामी अथवा वर्चस्ववादाविषयी ग्राम्शी आणि इब्ने खल्दून यांनी दिलेले इशारे महत्त्वाचे आहेत. पुरेशा सांस्कृतिक शिक्षणाच्या अभावातून समाजाला राजकीय व सामाजिक गुलामगिरीला बळी पडावे लागते, असे हे विचारवंत बजावून सांगतात.”
भारतासारख्या बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक देशात सुफी विचारांचे महत्त्व अधोरेखित करताना सरफराज म्हणतो, “इब्न खल्दूनच्या सांस्कृतिक सार्वभौमत्वाच्या तत्वानेच सुफींनी समन्वयवादी पण मुस्लिम समाजाला सार्वभौमत्व प्राप्त करुन देणारे सांस्कृतिक राजकारण केले आहे. त्याच्याशी मुस्लिमांचे नाते अलीकडे खूप कमकुवत झाले आहे. सुफी संस्कृतीकरणाशी असेलेले दखनीच नाही तर भारतीय मुस्लिमांचे नाते जितके उन्नत होईल तितके ते भारतीय म्हणून आणि मुसलमान म्हणूनही उन्नत होत जातील.”
भारतीय मुस्लिमांच्या भूतकाळाविषयी कमालीचा जागरूक असलेला सरफराज त्यांच्या वर्तमानाविषयी काहीसा चिंतीत असला तरी भविष्याविषयी मात्र प्रचंड आशावादी आहे. त्यात स्वप्नाळूपणाचा लवलेश नसून वैचारिक स्पष्टता आणि कृतिशीलता आहे. भविष्यातील उपक्रमांविषयी त्याने ‘आवाज द व्हॉंइस’ला उत्साहाने माहिती दिली. तो म्हणाला, “सोलापूर शहरानजीक आम्ही एक शैक्षणिक प्रकल्प सुरु केला आहे. यावर्षी लँग्वेज स्कुल सुरु करत आहोत. ज्यामध्ये इंग्रजी माध्यम शाळेसह विद्यार्थ्यांना पाच भाषांचे शिक्षण दिले जाईल. त्याशिवाय संगीत, कला, नेतृत्व याचे प्रशिक्षण मिळेल. या शाळेच्या परिसरात आम्ही एशिअन सेंटर फॉर कुरआन स्टडीज, लँग्वेज स्टडीज, गाजीउद्दीन अकॅडमी फॉर डेक्कन स्टडीज या अभ्यासकेंद्रांची टप्प्याटप्प्याने सुरुवात करत आहोत. सध्या प्रकाशन संस्था आणि प्रशिक्षण केंद्र व डेक्कन स्टडीजला सुरुवात केली आहे. पुढे याच भागात ‘एशिअन मायनॉरिटीज युनिव्हर्सिटी’ ही डिम युनिव्हर्सिटी उभी करण्याचे आमचे स्वप्न आहे.”

सरफाजचा हेतू उदात्त, स्वप्ने मोठी असली तरी त्या मार्गातील अडथळेही मोठे आहेत. बरेचदा स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आणि घरावर तुळशीपत्र ठेवून त्याला हे काम करावे लागते. उपक्रमांसाठी निधी उभारणे हे मोठे आव्हान असते. त्यामुळे आर्थिक चणचण पाचवीलाच पुजलेली असते. सरफराज महाराष्ट्रभर फिरून बरेचदा लोकवर्गणीतून उपक्रमांसाठी पैसे जमवतो. या धावपळीत शरीराकडे दुर्लक्ष होते. मोठी दमछाक होते. मात्र चाळीशीकडे झुकलेला सरफराज दिवसेंदिवस अधिक जोमाने काम करत आहे.
नेमकी कोणती गोष्ट सतत कार्यरत राहण्याला प्रेरणा देते असे शेवटी विचारले असता सरफराज म्हणतो, “मी स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी काम करतो. जो पर्यंत अस्वस्थता आहे, आनंदाची कमतरता जाणवेल तो पर्यंत काम करत राहीन. बगदादचे विवेकगृह अर्थात दार उल हिकमत ही माझी प्रेरणा आहे. याविषयीचे माझे पुस्तक याच महिन्यात प्रकाशित होत आहे.”
आपल्या प्रेरणांविषयी सांगताना तो म्हणतो, “इब्ने खल्दून, इकबाल, मौलाना वहिदुद्दीन खान आणि अलिकडे जावेद अहमद गामीदी ही माणसं दुरदृष्टीची आणि त्यांच्याकडून काही शिकता येईल अशी वाटतात. शिवाय कार्ल मार्क्सचे श्रमिकांच्या कल्याणाचे तत्वज्ञान ही माझी मुल्यनिष्ठा आहे. ती माझं इस्लामी अर्थशास्त्राशी व तत्वज्ञानाशी माझं नातं उन्नत करणारी बाब आहे.”
सरफराज अहमद सारखे तरुण इतिहासकार एकीकडे मुस्लिमांमध्ये सांस्कृतिक भान जागृत करत असले तरी दुसरीकडे आपल्या लेखनातून ते बहुसंख्यक हिंदू समाजासमोर इस्लामची विवेकी आणि सकारात्मक बाजूही मांडत आहेत. त्यामुळे मुस्लीम सशक्तीकरणाबरोबरच हिंदू-मुस्लीम सौहार्दाचा अनोखा मेळ साधला जातोय. त्यामुळे सरफराजचे कार्य वर्तमानाला आकार देणारे तर आहेच, पण भविष्यालाही दिशा देणारे आहे.