मुलींच्या शिक्षणाद्वारे धार्मिक सौहार्द जपणारी 'बज़्म'

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
एका स्पर्धेत पुरस्कार स्विकारताना 'बज़्म'च्या विद्यार्थिनी.
एका स्पर्धेत पुरस्कार स्विकारताना 'बज़्म'च्या विद्यार्थिनी.

 

मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाच्या प्रसारासाठी जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सर सय्यद अहमद खान यांनी अलिगढ येथे 'मोहम्मदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज'ची स्थापना केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक संस्था देशभर उभ्या राहिल्या आहेत, तर अनेकजण व्यक्तिगत स्तरावर मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी झटत आहेत. 'आवाज मराठी'वरून अशाच काही व्यक्तींचा आणि संस्थांचा परिचय करून देण्यात येत आहे.


मुस्लिम समाजातील मुली शिक्षणाच्या प्रवाहात याव्यात यासाठी २३ वर्षांपूर्वी खेड येथे (तालुका : खेड, जिल्हा : रत्नागिरी) एका उर्दू शाळेची स्थापना झाली. एका मुस्लिम शिक्षकाने सुरू केलेल्या या शाळेचे नाव ‘बज़्म-ए-इमदादिया’ (अर्थ : मदतीवर चालणारी संस्था) असे ठेवण्यात आले. विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमांतून सलोखा जपण्याचा प्रयत्न करणारी शाळा म्हणून आज या शाळेकडे पाहिले जाते. मुस्लिमच नव्हे तर, हिंदू धर्मातील मुलीही आज या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या संस्थेचा परिचय करून देणारा हा लेख.

एका कोकणी मुस्लिम कुटुंबात १९४४ मध्ये अब्दुल रहमान दाऊद ख़तीब यांचा जन्म झाला. सहा भावंडांमधील सगळ्यात थोरले असलेल्या रहमान यांचे तिसरी ते सातवीपर्यंतचे शिक्षण खेडच्या (जिल्हा : रत्नागिरी) उर्दू जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्या काळी खेड तालुक्यात सातवीच्या पुढे शिक्षण देणाऱ्या उर्दू शाळा नव्हत्या. त्यामुळे याचा परिणाम शिक्षणावर न होऊ देता रहमान यांच्या वडिलांनी त्यांना त्या वेळच्या एकमेव मराठी शाळेत, म्हणजेच ‘लक्ष्मणशेठ पाटणे हायस्कूल’मध्ये दाखल केले. सानेगुरुजी ज्या शाळेतून शिकले त्या 'आल्फ्रेड गॅडनी हायस्कूल'मधून नंतर रहमान यांनी दहावी-बारावी पूर्ण केली. सन १९६३ मध्ये ते एसएससी झाले.
 

 
पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले. तेथील छत्रपती शिवाजी विद्यापीठातून पीडी, टीडी (टीचिंग डिप्लोमा), डी. एडचे शिक्षण पूर्ण केले व खेड तालुक्यातील करजी येथील ‘आदर्श हायस्कूल’ या शाळेत सहायक शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. मात्र, नोकरीपुरतेच मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी करायला हवे, हा विचार रहमान यांना स्वस्थ बसू देईना. पंचवीस वर्षे त्या शाळेत नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दहा वर्षे आधीच, म्हणजे वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अशी स्वेच्छानिवृत्ती घेणारे त्या वेळी जिल्ह्यातील ते पहिलेच शिक्षक होते. “फक्त मुलींसाठीच शाळा सुरू करावी असे तुम्हाला का वाटले?” असे विचारल्यावर रहमान सांगतात, “मुलांच्या शिक्षणापेक्षा एक मुलगी शिकली की संपूर्ण कुटुंब शिक्षित होते आणि कुटुंब शिक्षित झाले की समाज अधिक प्रगत होत जातो.”

मुलींच्या शिक्षणाची सामाजिक गरज ओळखून वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी संस्था सुरू करणारे रहमान पुढे सांगतात, “त्या काळी शाळा सुरू करण्यासाठी जागाही नव्हती, त्यामुळे वर्गखोल्यांचा प्रश्न तर दूरच होता. म्हणून मी स्वतः वास्तव्यास असलेल्या खेडमधील ‘महाड नाका’ येथील ‘राजपूरकर कॉम्प्लेक्स’च्या इमारतीत पाचवीचे व आठवीचे दोन वर्ग सुरू केले. तेरा विद्यार्थिनी इतक्या अल्पसंख्येवर ही शाळा १६ जून २००० रोजी पहिल्यांदा भरली. त्या वेळी शाळेत नसीम इस्माईल मुकादम आणि आयेशा देसाई हे दोनच शिक्षक होते.”      
 

 
पुढे सर्वच स्तरांतून सहकार्य मिळवण्याचा रहमान यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या प्रयत्नांत तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यपातळीवरील अनेक अधिकाऱ्यांचे सहकार्य त्यांना लाभले. अधिकाऱ्यांकडून व नागरिकांकडून मिळालेल्या आर्थिक सहकार्यातून त्यांना शाळेसाठी जागा मिळाली. तेथे त्यांनी संस्थेची स्वतंत्र इमारत उभी केली. पुढे तेथे पाचवी ते दहावीचे वर्ग (अनुदानित) सुरू झाले.

पुढे २००३ पासून पहिलीचाही वर्ग सुरू झाला. शासनाच्या धोरणानुसार, पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण हे सेमीइंग्रजीमध्ये, म्हणजे इंग्रजी माध्यमातून, योग्य पर्याय म्हणून सुरू करण्यात आले. इंग्रजी भाषेसह गणित व शास्त्र हे महत्त्वाचे विषयसुद्धा इंग्रजीमधून शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेसारखेच शिक्षण ‘बज़्म-ए-इमदादिया’मध्येही उपलब्ध होऊ शकले. यामुळे इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या प्रामुख्याने हिंदू समाजाच्या मुली या शाळेकडे आकर्षित झाल्या. याच शाळेतून शिक्षण पूर्ण करून तीन विद्यार्थिनी आज तिथेच सेवाही करत आहेत.
 

 
आता केजी प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असा संस्थेचा विस्तार झाला आहे. संस्थेच्या प्राथमिक शाळेचे नाव ‘मदरसा इस्लाहुल अतफ़ाल’ ठेवण्यात आले आहे. मदरसा म्हणजे पाठशाळा, इस्लाह म्हणजे सुधारणा आणि अतफाल म्हणजे बालक. म्हणजेच ‘बालकसुधारणा केंद्र’ असा शाळेच्या नावाचा अर्थ होतो, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे नाव ‘मदरसा इस्लाहुल बनात’ असे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ ‘मुलींच्या शैक्षणिक सुधारणेची शाळा’ असा होतो. संस्थेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींची जकातनिधीच्या माध्यमातून फी भरली जाते, तसेच त्यांना शालेय पुस्तके व मोफत गणवेशही दिला जातो. [*'जकात' ही इस्लाममधील एक अर्थविषयक संज्ञा आहे. मुस्लिम समाजातील प्रत्येक सधन व्यक्तीला दरवर्षी तिच्या उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम गरजूंना दान करणे बंधनकारक आहे, त्यालाच 'जकात' असे म्हणतात.]

ऐंशी वर्षांचे रहमान सांगतात, “वैयक्तिक प्रगतीत राष्ट्राची प्रगती असते. मुस्लिम आणि अन्य जातीय असा भेद न करता सर्वच जाती-धर्मांतील मुलींना राष्ट्रीय हितासाठी उत्कृष्ट शिक्षण मिळावे, तसेच सर्वसामान्यांना अल्प खर्चात त्यांच्या मातृभाषेतून सर्वसमावेशक शिक्षण मिळून त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा हे माझे स्वप्न होते. त्यामुळेच संस्थेच्या सुरुवातीपासूनच - मातृभाषा, राज्यभाषा आणि इंग्लिश भाषा - अशा तीन भाषांमधून दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी मी प्रयत्न केले.”  
 

 
संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, संस्थेच्या एकूण कर्मचारीवर्गापैकी ऐंशी टक्के महिलाच आहेत. ज्या पदासाठी महिला उपलब्ध नसतात तिथेच फक्त पुरुष या संस्थेत घेतलेले आढळतील. विद्यार्थ्यांप्रमाणेच हे शिक्षकही विविध जाती-धर्मांतील आहेत, तसेच मागील दहा वर्षांपासून 'बज़्म-ए-इमदादिया' संचालित 'एमआयबी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज'चा दहावीचा आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागतो. मार्च २०२३ मध्ये झालेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत संस्थेची सारा नाडकर ही विद्यार्थिनी ९१ टक्के गुण मिळवून प्रथम आली होती, तर हुडा भक्शे (८७ टक्के) व शबिस्ता खान अनुक्रमे द्वितीय व तृतीय आल्या होत्या.

भाषेला कोणताही धर्म नसतो, उर्दू ही भाषाही कोणत्याही एका विशिष्ट धर्माची नाही, हे या शाळेतील एका विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे. 'बज़्म-ए-इमदादिया'मध्ये शिकणाऱ्या रोशनी भोसले या विद्यार्थिनीने आपले शिक्षण उर्दू माध्यमातून पूर्ण केले व  शिक्षण केवळ पूर्णच केले असे नाही तर, ती दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाली. तिने उर्दू माध्यमातून परीक्षा देऊन ६२ टक्के गुण मिळवले आहेत.
 
उर्दू भाषेविषयी रहमान म्हणतात, “पालकांना व विद्यार्थ्यांना बहुभाषिक शिक्षणाची मुळातच आवड असते. उर्दू ही भाषा कुठल्याही एका जाती-धर्माची नाही, याची संपूर्ण कल्पना पालकांना व विद्यार्थिनींना आहे. संगीत या क्षेत्रात उर्दू भाषेची महत्त्वाची भूमिका असून अनेक हिंदू कवी व लेखक हे उर्दू भाषेतून कविता व लेखन करतात. उर्दू भाषा ही खरोखरच मधुर आहे याची जाणीव असल्याने, तसेच शाळेचे निकाल, उपक्रम, शालेय शिस्त, व्यवस्थापन व नियोजन आदी बाबींमुळे पालक समाधान व्यक्त करतात.”
 

 
विद्यार्थिनींना दिले जाते आधुनिक शिक्षण
संस्थेत आधुनिक शिक्षणावर भर दिला जातो. त्याअनुषंगाने आधुनिक संगणककक्ष बनवण्यात आले आहेत. त्यांमध्ये जवळजवळ २५ संगणक आहेत. चार प्रोजेक्टर, सहा स्मार्ट टीव्ही, आधुनिक ध्वनिव्यवस्था अशा बऱ्याचशा संगणकीकृत वस्तू इथे वापरल्या जातात. या संस्थेतील माजी विद्यार्थिनी आज परदेशात नोकरी करत आहेत. काही डॉक्टर, काही प्राध्यापिका, तर काही फार्मसी करत आहेत.    

हिंदू विद्यार्थिनीही होतात सहभागी
परिसरातील विविध जाती-धर्मांतील मुली संस्थेत शिक्षण घेत आहेत. यात हिंदू विद्यार्थिनींचाही समावेश आहे. सामूहिक प्रार्थना (दुवा), सांस्कृतिक कार्यक्रम, गायनस्पर्धा, समूहगीतस्पर्धा अशा विविध स्पर्धा व उपक्रम शाळेत आयोजिले जातात. या स्पर्धांमध्ये सर्व जाती-धर्मांच्या मुली हिरीरीने भाग घेतात, वेळप्रसंगी त्या विविध प्रकारच्या वेशभूषाही परिधान करून या स्पर्धांमध्ये सहभागी होतात. वक्तृत्व, वादविवाद आणि काव्यवाचन या स्पर्धांमध्ये मराठी, इंग्लिश आणि उर्दू या तिन्ही भाषांतून मुली भाग घेतात, तसेच शाळेमध्ये मुस्लिम सणांबरोबरच हिंदू सणांचे महत्त्वही विद्यार्थिनींना सांगितले जाते.

“भविष्यात आणखी काय करू इच्छिता?” असे विचारल्यावर रहमान सांगतात, “वेळोवेळी दोन्ही समाजांचे संबंध आणखी घट्ट कसे होतील यासाठी माझा प्रयत्न असेल. माझ्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होणार नाही, त्यांच्यात धार्मिक दरी निर्माण होणार नाही याची मी यापुढेही काळजी घेईन. भविष्यातही पालकमेळावे, विद्यार्थी-मेळावे यांचे आयोजन करून सामाजिक आणि धार्मिक संबंध आणखीन घट्ट करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन.”

 
राष्ट्रीय आयटी ऑलिम्पियाड परीक्षेत बाजी
इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयटी ऑलिम्पियाड (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा) ही परीक्षा घेतली जाते. ही भारतातील पहिली राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन चॅम्पियनशिप स्पर्धा आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सहा लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यात ज्युनिअर कॅटेगिरीत ‘बज़्म-ए-इमदादिया’च्या मारिया रियाज माखजनकार या विद्यार्थिनीने देशात पाचवा क्रमांक मिळवला होता, तर सीनिअर कॅटेगिरीत मरियम मुरुडकर हिने देशात नववा क्रमांक मिळवला होता.

राष्ट्रीय संगणक ऑलिम्पियाड परीक्षेतही यश
या स्पर्धेत दरवर्षी जवळपास पंधरा हजार विद्यार्थी भाग घेत असतात. यात ‘बज़्म-ए-इमदादिया’ संचालित एमआयबी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी मारिया रियाज माखजनकर हिने भाग घेऊन चौदा हजार सातशे विद्यार्थ्यांमध्ये देशात पाचवा क्रमांक मिळवला होता. तिला प्रशालेतील शिक्षक प्रीतम उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केले होते.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी ‘बज़्म’च्या फलकची निवड  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू केलेला 'परीक्षा पे चर्चा' हा वार्षिक उपक्रम या वर्षी ता. २७ जानेवारी २०२३ रोजी पार पडला. नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बोर्डाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान दरवर्षी संवाद साधतात. परीक्षेचा ताण आणि इतर मुद्द्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही पंतप्रधान देतात. या कार्यक्रमासाठी ‘बज़्म-ए-इमदादिया’च्या फलक फैसल नाडकर या विद्यार्थिनीची निवड झाली होती.

रहमान यांना मिळालेले पुरस्कार
• इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड मॅनेजमेंट (दिल्ली) यांच्यातर्फे दिला जाणारा 'गोल्डन प्राइड ऑफ इंडियन एक्सलन्स ॲवॉर्ड’
• महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम'चा (पुणे) 'लोकसेवा पुरस्कार'
• आयडियल फाउंडेशन, मुंबईचा 'सपूत पुरस्कार’
• 'कोकण सेवा मंच'चा 'स्टार ऑफ कोकण पुरस्कार’

- छाया काविरे ([email protected])
 

 

याही बातम्या वाचा 

 

होजाई : पूर्व भारतातील कोटा

 

आधुनिक शिक्षण देणारी मुंबईतील दीडशे वर्षे जुनी 'अंजुमन-ए-इस्लाम'

 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter