आधुनिक शिक्षण देणारी मुंबईतील दीडशे वर्षे जुनी 'अंजुमन-ए-इस्लाम'

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
'अंजुमन-ए-इस्लाम'च्या विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.
'अंजुमन-ए-इस्लाम'च्या विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी.

 

मुस्लीम समाजात आधुनिक शिक्षणाच्या प्रसारासाठी जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सर सय्यद अहमद खान यांनी अलिगढ येथे मोहम्मदन ॲंग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक संस्था देशभर उभ्या राहिल्या आहेत. तर अनेकजण व्यक्तिगत स्तरावर मुस्लीम समाजामध्ये आधुनिक शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी झटत आहेत. 'आवाज मराठी'वरून अशाच काही व्यक्ती आणि संस्थांचा  परिचय करून देण्यात येत आहे. 
 

 
मुस्लीम समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी तब्बल दीडशे वर्षांपूर्वी मुंबईमध्ये उर्दू शाळा सुरू करण्यात आली. ‘अंजुमन-ए-इस्लाम’ या नावाने सुरू झालेली ही शाळा आता देशातली महत्त्वाची संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. या संस्थेचा परिचय करून देणारा व प्रत्यक्ष भेटीवर आधारित हा लेख.

तब्बल दीडशे वर्षांपूर्वी मुंबईतील काही आधुनिकतावादी मुस्लीम विचारवंतांनी एकत्र येऊन ‘अंजुमन-ए-इस्लाम’ या शाळेची स्थापना केली. अलीगढ मुस्लीम विद्यापीठ (एएमयू) स्थापन होण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे फेब्रुवारी १८७४ मध्ये 'अंजुमन'ची स्थापना झाली. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून 'अंजुमन'च्या स्थापनेचा निर्णय समाजातील काही धुरिणांनी घेतला. मुंबई उच्च न्यायालयातील पहिले भारतीय बॅरिस्टर बद्रुद्दीन तैयबजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष कमरुद्दीन तैयबजी, त्यांचे मोठे बंधू आणि पहिले भारतीय वकील नाखुदा मोहम्मद अली रोगे, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ता गुलाम मोहम्मद मुन्शी यांच्या पुढाकारानं तत्कालीन मुंबई प्रांतातील उमरखाडीजवळील बाबुला टाकी इथं एका छोट्याशा जागेत 'अंजुमन-ए-इस्लाम'ची शाळा सुरू करण्यात आली. पुढे १८९३ मध्ये 'अंजुमन-ए-इस्लाम' 'व्हिक्टोरिया टर्मिनल्स'समोरील (छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनल्स) इमारतीत ही शाळा हलवण्यात आली. तेव्हापासून आजतागायत शाळा तिथंच भरते.

'अंजुमन'मध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तेव्हा विविध सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शिक्षणासाठी लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ही नेहमीची सुविधा तर होतीच; पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी दुपारचं जेवण उपलब्ध करून देणारी 'अंजुमन' देशातली पहिली संस्था ठरली. या आहारात उकडलेलं अंडं, ब्रेड आणि केळी यांचा समावेश असायचा.

'अंजुमन' सुरुवातीला केवळ मुलांसाठीच होती. मात्र, शिक्षणातील मुलींच प्रमाणही वाढायला हवं, या हेतूने मुलींसाठीही एक शाळा सुरू करण्यात आली. १९३६ मध्ये बेलासिस रोडवर 'सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल' या नावाने मुलींसाठीची ही शाळा सुरू झाली. 

तीन शिक्षक आणि १२० विद्यार्थी एवढ्या अल्प बळावर सुरू झालेल्या 'अंजुमन-ए-इस्लाम' या शाळेचा विस्तार आता ९७ शाळा-महाविद्यालयांमध्ये झाला आहे. 'अंजुमन' या एका रोपट्याचे महाकाय वटवृक्षात आज रुपांतर झाले आहे. या संस्थेत जवळपास एक लाख १० हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालवाडीपासून ते पीएचडीपर्यंत पर्यंतचं शिक्षण इथं दिलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इथले प्राथमिक शिक्षण घेणारे सत्तर टक्के विद्यार्थी हे पहिल्या पिढीतील शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात `अंजुमन-ए-इस्लाम`चा मोठा सहभाग होता. `अंजुमन`चे मोईनुद्दीन हॅरिस आणि मुस्तफा फकीह यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यासाठी कारावास भोगला. `अंजुमन`च्या आवारातच स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या अनेक धोरणात्मक बैठका व्हायच्या. राष्ट्र निर्मितीमध्ये 'अंजुमन'च्या योगदानाचा मोठा इतिहास राहिला आहे. 

'अंजुमन'चं बीज जिथं रोवलं गेलं त्याच ठिकाणी आज संस्थेचे मुख्य प्रशासकीय कार्यालय दिमाखाने उभे आहे. संस्थेच्या तीन एकर परिसरात पाच महाविद्यालय - दोन केटरिंग महाविद्यालय, व्यवसाय-व्यवस्थापन महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय आणि एक कायदा महाविद्यालय - स्थापन करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, महिलांसाठी एक पॉलिटेक्निक, एक कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश आणि उर्दू अशा दोन्ही माध्यमांच्या दोन शाळा आहेत. या आवारातच एक मोठं ग्रंथालय आणि एक संशोधन केंद्रदेखील आहे.

'अंजुमन'च्या उभारणीसाठी आणि तिला अधिक उंचीवर नेण्यासाठी सर करीमभॉय इब्राहीम, हाजी युसूफ हाजी इस्माईल सोबानी, न्यायमूर्ती ए. एम. काझी, न्यायमूर्ती फैज बी. तय्यबजी, सरदार सर सुलेमान कुल्सुम मीठा, हुसेन बी. तय्यबजी, उस्मान सोबानी, मोहम्मद हाजी अहमद, ए. ई. मस्कती, हादी सी. तय्यबजी, सैफ एफ. बी. तय्यबजी, अकबर ए. पीरभॉय, ए. के. हाफीज, ए. आर. अंतुले, मोईनुद्दीन हॅरिस, डॉ. एम. इसहाक जामखानवाला, सामी खतीब यांनी विशेष प्रयत्न केले. सध्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. झहीर काझी काम पाहत आहेत.  

`अंजुमन`ची दोन प्रमुख उद्दिष्ट आहेत, पहिलं - ‘कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देणं’ आणि दुसरं - ‘पैशाअभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये’.

`अंजुमन`मधील जवळजवळ पन्नास टक्क्याहून अधिक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल या घटकातून येतात. या विद्यार्थ्यांना कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावा यासाठी 'अंजुमन'ने `विशेष जकातनिधी*`ची तरतूद केली आहे. त्याद्वारे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये ५० ते १०० टक्के सवलत दिली जाते. ‘मनापासून दिलेलं शिक्षण समाजात क्रांती घडवू शकतं’, हे मौलाना अबुल कलाम आझाद याचं सुवचन संस्थेनं यासंदर्भात डोळ्यांपुढं ठेवलेलं आहे. 

विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ३००० कर्मचारी इथं कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, औषध, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉस्पिटॅलिटी, केटरिंग आणि हॉटेल-मॅनेजमेंट, कायदा, व्यवसाय प्रशासन, गृहविज्ञान, शिक्षक प्रशिक्षण या विविध अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. `अंजुमन`मध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शिक्षकांमध्येही महिलांचे प्रमाण अधिक आहेत. विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे `अंजुमन`चा ‘महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक आणि सामाजिक संस्था’ म्हणून सन्मानही करण्यात आला आहे.

`अंजुमन`चे माजी विद्यार्थी आज व्यवसाय, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, प्रसारमाध्यमं, वैद्यकीय विज्ञान, राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक देशांमध्ये कार्यरत आहेत. फॉर्च्युन कंपनी व इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष एम. ए. पठाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले, विख्यात अभिनेते दिलीपकुमार (युसूफ खान), `मर्चंट ऑफ मर्चंट आयव्हरी प्राॅडक्शन`चे इस्माईल मर्चंट, फातिमा झकेरिया, `इलस्ट्रेटेड वीकली`च्या माजी उपसंपादक, तसंच `मुंबई मिरर` आणि `संडे टाइम्स`च्या माजी संपादक फरीदा नाईक, विख्यात क्रिकेटपटू सलीम दुर्रानी, गुलाम पारकर, वसीम जाफर, खासदार मजीद मेमन यांसारख्या महत्वाच्या व्यक्ती 'अंजुमन'च्या माजी विद्यार्थी राहिल्या आहेत.

जनसामन्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून 'अंजुमन'ने अनेक महत्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. त्याविषयी माहिती देताना 'अंजुमन'चे विद्यमान अध्यक्ष डॉ. जहीर काझी म्हणाले, "आम्ही भायखळा येथील साबू सिद्दिक कॉलेज कॅम्पसमध्ये अत्याधुनिक इमारत उभारत आहोत. तिथं इन्क्युबेशन सेंटरसह पदव्युत्तर आणि पीएच.डी अभ्यासक्रम शिकवले जातील. याशिवाय, कल्याण-भिवंडी या पट्ट्यात किंवा पाचगणीमध्ये एकात्मिक आरोग्य शिक्षण कॅम्पस असेल, ज्यामध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम, दंत महाविद्यालय, नर्सिंग, फिजिओथेरपी आणि होमिओपॅथिक महाविद्यालय सुरू करण्यात येईल. सोलापूरमधील नवीन कॅम्पसमध्ये फार्मसी, लॉ कॉलेज, मुलींसाठी पदवी महाविद्यालय आणि हायस्कूल सुरू करण्याचा मानस आहे. गोव्यात पणजी इथं केटरिंग, फार्मसी आणि हायस्कूल-महाविद्यालय सुरू करण्यासाठी भूमिसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात आहे."

"'अंजुमन-ए-इस्लाम'नं इंग्लंड इथली केंब्रिजमधील एमआयटी युनिव्हर्सिटीशी, तसंच तिथलं इंजिनिअरिंग, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए), फार्मसी आणि प्राथमिक शिक्षण यांसारख्या पाच विद्याशाखांशी सामंजस्य-करार केला आहे. याशिवाय, 'अंजुमन-ए-इस्लाम'च्या 'काळसेकर स्कूल ऑफ फार्मसी'च्या (पनवेल) सहकार्यासाठी अमेरिकेतील बाल्टिमोर, (वॉशिंग्टन डीसी) इथल्या 'मेरीलँड स्कूल ऑफ फार्मसी'शी संपर्क साधण्यात आला आहे, तसंच फिलाडेल्फिया इथल्या 'टेम्पल युनिव्हर्सिटी'नं सहयोगासाठी 'अंजुमन-ए-इस्लाम'च्या 'बॅरिस्टर ए. आर. अंतुले कॉलेज ऑफ लॉ'शी संपर्क साधला आहे," अशी माहितीही डॉ. काझी यांनी दिली.

असा आहे 'अंजुमन-ए-इस्लाम'चा विस्तार 
`अंजुमन`मधील शाळा, महाविद्यालयं आणि इतर केंद्राची संख्या ९७ इतकी आहे. यात पूर्वप्राथमिक शाळा (१५), प्राथमिक शाळा (१५), माध्यमिक शाळा (२०), कनिष्ठ महाविद्यालयं (१०), पॉलिटेक्निक (४), पदवी महाविद्यालयं (१५), इतर संस्था (१०), प्रस्तावित संस्था (२), वसतिगृह (२), सभागृह (३), सहारा युनिट्स (२) आणि अनाथाश्रम (२) अशी विभागणी आहे.

'अंजुमन-ए-इस्लाम'तर्फे सुरू असलेलं सामाजिक कार्य व उपक्रम :
काही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ मुलांची काळजी घेतली जाते, तसंच त्यांना शिक्षित करणं व वयात आल्यावर त्यांचं लग्न लावून देणं ही कामं केली जातात.
देणग्या गोळा करून गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची, तसंच अनुदानित शिक्षणाची सोय. यासाठी माहीम आणि मुंब्रा इथं दोन शाखा कार्यरत आहेत.
निराधार महिलांना आधार देण्यासाठी 'सहारा' उपक्रम राबवला जातो.
मुंबईतील वर्सोवा व पुण्यातील बंडगार्डन इथं मुलींसाठी अनाथाश्रमं आहेत.
विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी आणि समुपदेशनासाठी स्वतंत्र विभाग आहेत.
धर्मादाय ट्रस्ट म्हणूनही 'अंजुमन' कार्यरत आहे.

या उपक्रमांसाठी लागणारा निधी 'जकात'* आणि संस्थांतर्गत देणगीमधून उभा केला जातो. [*'जकात' ही इस्लाममधील एक अर्थविषयक संज्ञा आहे. मुस्लीम समाजातील प्रत्येक सधन व्यक्तींला दरवर्षी त्याच्या उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम गरजूंना दान करणे बंधनकारक आहे, त्यालाच 'जकात' असे म्हणतात.]

- छाया काविरे ([email protected])


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter