अपंगत्वावर मात करत स्वप्नांच्या मागे धावणारे डॉ. फैयाज शेख

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 4 Months ago
सन्मान स्वीकारताना डॉ. फैयाज शेख.
सन्मान स्वीकारताना डॉ. फैयाज शेख.

 

आयुष्याच्या 'पहिल्याच पावला'वर त्यांना बिकट आव्हानाला सामोरे जावे लागले. ते एक वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला. पोलिओचा पायावर परिणाम होऊन अपंगत्व आले. एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान झाला. तेव्हापासून ते आजतागायत त्यांना कुबड्यांच्या साह्याने चालावे लागत आहे. दोन्ही पायांनी चालता येत नसले तरी त्यांची स्वप्नांच्या मागची दौड मात्र वेगात सुरू आहे. जागतिक शास्त्रज्ञांच्या क्रमवारीत त्यांचे नाव आज आदराने घेतले जाते.

मानसिक परिपक्वतेद्वारे त्यांनी या शारीरिक अपंगत्वावर कणखरपणे मात केली. ही प्रेरक कहाणी आहे बेचाळीसवर्षीय डॉ. फैयाज खुदबोद्दीन शेख यांची...

कुंभारपिंपळगाव (तालुका : घनसावंगी, जिल्हा : जालना) या छोट्याशा गावात फैयाज यांचा १९८१ मध्ये जन्म झाला. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या फैयाज यांना नवनवीन शोध घेण्यात लहानपणीपासूनच रस होता. पाच भावंडांपैकी फैयाज हे तिसऱ्या क्रमाकांचे अपत्य.

वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्यांना उभेही राहता येत नव्हते. त्यांच्या आईला त्यांना कडेवर उचलून न्यावे लागायचे. पुढे हळूहळू त्यांना कुबड्यांच्या साह्याने चालता येऊ लागले आणि वयाच्या आठव्या वर्षी ते पहिल्यांदा शाळेत गेले.
 
फैयाज यांनी आपल्या मूळ गावातील, म्हणजे कुंभार-पिंपळगाव येथील, जिल्हा परिषदेच्या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले. ते दहावी जेमतेम उत्तीर्ण झाले. शालेय जीवनात त्यांना फारसा रस नव्हता. मात्र, शाळेतील शिक्षक बहाळकर सर हे त्यांना नेहमी प्रेरित करत. पुढे फैयाज यांच्या भावांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला (आता छत्रपती संभाजीनगर) पाठवले. तेथील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा'तून त्यांनी पुढील शिक्षण घेतले. 
 
 
फैयाज यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. घरात पैशाची चणचण असायची. त्यामुळे बाहेरगावी सुरू असलेल्या आपल्या शिक्षणाचा भावांवर अधिक भार नको, असा विचार करून त्यांनी परत जालन्याला यायचे ठरवले. तेथील 'राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालया'त फैयाज यांनी बीएस्सीला प्रवेश घेतला. तेथे ते रूम घेऊन राहू लागले.  या रूममध्ये त्यांच्याबरोबर काही मित्रही शेअरिंग बेसिसवर राहत. पुढे फैयाज यांना मेससाठीही पैशाची कमतरता भासू लागली. तेव्हा एक स्टोव्ह विकत घेऊन ते रूमवरच स्वयंपाक करून जेवू लागले. 'इंदिरा गांधी महाविद्यालया'तून फैयाज फर्स्ट क्लासमध्ये बीएस्सी उत्तीर्ण झाले.      
 
पुढे बायोकेमिस्ट्रीमध्ये करिअर करायचे त्यांनी ठरवले आणि त्यासाठी पुन्हा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा'त एमएससी प्रवेश घेतला. तेथे बायोकेमिस्ट्री विभागाचे विभागप्रमुख डॉ. मानवेंद्र काचोळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. संशोधन कसे करायचे, याचा फय्याज यांचा सखोल अभ्यास झाला तो काचोरे सरांमुळे. पुढे त्यांच्याच मार्गदर्शनात फैयाज यांनी पीएच.डीला प्रवेश घेतला. त्यांनी एमएस्सी आणि पीएच.डीचे शिक्षण पूर्ण केले. पीएच.डी. सुरू असतानाच त्यांनी नेट आणि सेट या परीक्षांमध्येही बाजी मारली. आई, भाऊ, शाळेतील शिक्षक बहाळकर सर, महाविद्यालयातील काचोळे सर हे फैयाज यांचे प्रेरणास्रोत होते.
 
यानंतर फैयाज हे औरंगाबादमधील 'एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी' येथे सन २०१५ ला सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मात्र, पुढे पाच वर्षांनंतर (सन २०२०) कोरोनाच्या महामारीमुळे देशातील लाखो लोकांप्रमाणेच फैयाज यांच्या नोकरीवरही परिणाम झाला. सन २०२० मध्ये त्यांची नोकरी सुटली. त्यांनतर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाती'ल बायोकेमिस्ट्री विभागात त्यांनी नोकरी केली. सध्या लोणी येथील (तालुका : राहाता, जिल्हा : अहमदनगर [आता अहिल्यानगर]) येथील 'प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कॉलेज ऑफ बायोसायन्स अँड टेक्नॉलॉजी' येथे फैयाज नोकरी करत आहेत. मागील नऊ वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्री शिकवत आहेत. विद्यार्थ्यांचा विज्ञानाबद्दलच्या उत्साहाबद्दल फैयाज आनंद व्यक्त करतात.
  
 
कुटुंबाविषयी बोलताना ते सांगतात, “या संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाचा मला मोठा आधार होता. एका छोट्याशा गावात आम्ही भावंडे वाढल्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता. अनेक संकटांवर मात करत माझे शिक्षण सुरू होते. तशातच माझे पदवीचे शिक्षण सुरू असताना दुर्दैवाने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. 
 
आमच्या कुटुंबासाठी हा फार कठीण काळ होता. या काळात माझे भाऊ आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या माझे आधारस्तंभ बनले. त्यांनी माझ्या शिक्षणादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली. मला त्यांनी नेहमी प्रोत्साहित केले. त्यामुळे माझे शिक्षण मला कठीण परिस्थितीतही पूर्ण करता आले. या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांची मदत खूप मोलाची होती. माझ्या या संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाचा, विशेषत: माझ्या भावांचा, मी मनापासून ऋणी आहे. जिथे जिथे मला त्यांची गरज होती तिथे तिथे ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले आणि आजही राहतात."
 
 
फैयाज यांना दोन अपत्ये आहेत. त्यांच्याविषयी ते सांगतात, “माझा नऊ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी हे दोघेही माझ्यासाठी केवळ आनंदाचाच स्रोत आहेत असं नव्हे, तर माझ्या जीवनाची ते प्रेरणाही आहेत.”
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध सादर
अध्यापनाव्यतिरिक्त आपला प्रवास व्यापक संशोधन-योगदानामुळे समृद्ध झाला, असे फैयाज म्हणतात. त्यांनी आतापर्यंत ३५ शोधनिबंध लिहिले असून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत. फैयाज सांगतात, “अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन मला माझे संशोधनकार्य सादर करण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने बऱ्याच देशांमध्ये मला जाता आले. या प्रवासामुळे माझा दृष्टिकोन अधिक विस्तृत, अधिक व्यापक होण्यास मदत झाली आणि मला जागतिक वैज्ञानिक समुदायात योगदान देण्याची संधी मिळाली.”
 
पुढे पीएच.डीच्या सादरीकरणासाठी फैयाज यांना तुर्किए येथील सिहान विद्यापीठाने पीएचडी.साठीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी आमंत्रित केले.         
 
अडचणींवर अशी केली मात
आयुष्यात आलेल्या अडचणींविषयी फैयाज सांगतात, “माझ्या प्रवासात काही बिकट वाटा, अवघड वळणे होती. बायोकेमिस्ट्री लॅबमध्ये शिकत असताना आणि काम करत असताना माझ्या शारीरिक मर्यादांचा सामना करणे हे मुख्य आव्हान माझ्यापुढे होते. प्रयोगांसाठी बऱ्याचदा उभे राहावे लागायचे. एका पायाने उभे राहणे मला थोडे कठीण जायचे. मी इतरांप्रमाणे पटकन् उभा राहू शकत नव्हतो. मात्र, सकारात्मक विचारांमुळे मी त्या परिस्थितीवर मात केली."
  

 
फैयाज यांनी औरंगाबादमधील 'एमजीएम इन्स्टिट्यूट'मध्ये पाच वर्षे नोकरी केली. तिथल्या अनुभवाविषयी फैयाज सांगतात, "मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवत असे तो वर्ग दुसऱ्या मजल्यावर होता. तिथे लिफ्टची सोय नव्हती. त्यामुळे रोज जिना चढून जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. हातात कुबड्या घेऊन, कुणाचीही मदत न घेता मी प्रयोगशाळेत प्रयोग करायचो. 'हे तुझ्याकडून होणार नाही,' असे लोक मला म्हणत. मात्र, माझे ध्येय मला काहीही करून पूर्ण करायचे होते."
 
शारीरिक अपंगत्व असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवणे हेदेखील फैयाज यांच्यासाठी एक आव्हानच होते. मात्र, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी 'सहाय्यक प्राध्यापका'ची नोकरी मिळवली. पुढे आंतरराष्ट्रीय जर्नल्ससाठी संपादक आणि समीक्षक म्हणून काम करण्याचीही त्यांना संधी मिळाली.

फैयाज सांगतात, " 'आता बस् झाले...मी आता थकलोय!' असे वाटण्याजोगेही टप्पे शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात काही वेळा आले; कारण, शैक्षणिक क्षेत्रातील काम संतुलित ठेवणे, कॉन्फरन्सना उपस्थित राहणे आणि शारीरिक कमतरतेपोटी येणारी आव्हाने हाताळताना कामाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे या बाबी काही वेळा खरोखरच थकवणाऱ्या होत्या. मात्र, बायोकेमिस्ट्रीचे अध्यापन आणि संशोधनाची आवड या दोन गोष्टींनी मला थांबू दिले नाही. माझा एक पाय पोलिओग्रस्त असूनही मी माझ्या ध्येयांचा पाठलाग करत गेलो. या प्रवासात मला ज्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्यांनीही मला माझ्या अपंगत्वाच्या आव्हानावर मात करण्यास मदत केली.”
 
 
पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्रीचे सिद्धान्त आणि व्यावहारिक ज्ञान शिकवण्याचे, विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांना पाठबळ देण्याचे काम आज फैयाज करतात. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संशोधनप्रकल्पांसाठी पर्यवेक्षकाची भूमिका निभावणे, हादेखील त्यांच्या कामाचा भाग आहे. अध्यापनाबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित करून संस्थात्मक संशोधनात फैयाज यांचे सक्रिय योगदान असते.
 
‘स्कोप’, ‘वेब ऑफ सायन्स’ आणि ‘पबमेड’ या जर्नल्समध्ये त्यांचे संशोधनकार्य प्रकाशित झाले आहे. सन २०२३ च्या जागतिक वैज्ञानिक क्रमवारीत (ए. डी. सायंटिफिक इंडेक्स) जीवशास्त्राच्या क्षेत्रातील द्वितीय क्रमांकाचा संशोधक म्हणून फैयाज यांना आज ओळखले जाते. फैय्याज सांगतात, “माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी केलेल्या संशोधन-योगदानाचा हा एक पुरावा आहे.”
 
अपवादात्मक पात्रता आणि अनुभव असूनही फैयाज यांना एखाद्या सरकारी संस्थेत अद्याप नोकरी मिळालेली नाही. ते म्हणतात, “मी सहाय्यक प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञ म्हणून कायमस्वरूपी नोकरी शोधत आहे. दुर्दैवाने मला अद्याप तशी संधी उपलब्ध झालेली नाही. मात्र, माझी कौशल्ये सरकारी संस्थांमध्ये दाखवण्याची संधी मला कधी ना कधी मिळेल याबद्दल मी आशावादी आहे."  

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार, फेलोशिप्स...
  • 'इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स, बंगळुरू'तर्फे दिला जाणारा ‘उत्कृष्ट संशोधन पुरस्कार’ आणि ‘यंग संशोधक पुरस्कार’.
  • २०१० मध्ये यूजीसी आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडून दिली जाणारी ‘मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप’.
  • २००८ मध्ये ‘गोल्डन ज्युबिली युनिव्हर्सिटी रिसर्च फेलोशिप’.
  • आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध होणाऱ्या संशोधनपर शोधनिबंधांसाठीच्या संपादकीय मंडळाचे सदस्य म्हणून निवड. 
  • आशियाई विज्ञान संपादक परिषदेचे सदस्य म्हणून निवड.
  • सिहान युनिव्हर्सिटी-एरबिलकडून ‘ट्रॅव्हल ग्रँट’.
  • पोस्टर प्रेझेंटेशनसाठी ‘टोकन ऑफ ॲप्रिसिएशन’ म्हणून शील्ड.

- छाया काविरे