राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) घेतलेल्या यूजीसी-नेट (UGC-NET) जून २०२५ परीक्षेचा निकाल आज, सोमवार (२१ जुलै) सायंकाळी जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातील एक लाखांहून अधिक उमेदवार पात्र ठरले आहेत.
एनटीएने आपल्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर निकाल उपलब्ध करून दिला आहे. उमेदवार वेबसाइटवर लॉग इन करून आपले स्कोरकार्ड पाहू आणि डाउनलोड करू शकतात.
या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी ५,२६९ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर, सहायक प्राध्यापक आणि पीएच. डी. प्रवेशासाठी ५४,८८३ उमेदवार पात्र ठरले आहेत. केवळ पीएच. डी. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या परीक्षार्थींची संख्या १ लाख २८ हजार १७९ आहे.
यूजीसी नेट परीक्षा देशभरातील विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनियर प्रोफेसर फेलोशिप (JRF) आणि असिस्टंट प्रोफेसर तसेच पीएच. डी. प्रवेशासाठी पात्रता मिळवण्यासाठी वर्षातून दोनदा घेतली जाते. हा निकाल अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) च्या आधारावर तयार करण्यात आला आहे. निकालाचे कोणतेही पुनर्मूल्यांकन किंवा पुन्हा तपासणी केली जाणार नाही, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.
पीएच. डी. मध्ये प्रवेशासाठी, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांनी नेटमध्ये मिळवलेले गुण निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून, म्हणजे २१ जुलै २०२५ पासून, एका वर्षाच्या कालावधीसाठी वैध असतील.