नवी दिल्ली
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली. देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्रजोगास संबोधित करताना त्यांनी तरुणांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली.
कोचिंग क्लासेसमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोचिंगवर हजारो कोटी रुपये खर्च करावे लागतात. यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो. आता या निर्णयामुळे पालक आपला हा खर्च वाचवू शकतील आणि आपल्या मुलांच्या अधिक जवळ राहून त्यांची काळजी घेऊ शकतील.
देशातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि गुणवान शिक्षक यांच्या मदतीने तरुणांसाठी मोफत कोचिंगचे संपूर्ण नेटवर्क उभारले जाईल, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. देशातील तरुणांना दर्जेदार शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सर्व संसाधने एकत्र आणत असल्याचे त्यांनी नमूद केले.