सोसायट्यांमध्ये विज्ञानाचा मळा फुलवणारे प्रा. मुजतबा लोखंडवाला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
सायन्स क्लबमध्ये मुलांना शिकवताना प्रा. मुजतबा लोखंडवाला
सायन्स क्लबमध्ये मुलांना शिकवताना प्रा. मुजतबा लोखंडवाला

 

साधारणतः पुण्यातल्या किंवा कुठल्याही शहरातल्या एखाद्या सोसायटीत संध्याकाळी डोकावलं तर काय चित्र दिसतं? ऑफिसमधून थकून भागून परतणाऱ्या गाड्यांची पार्किंगमध्ये चाललेली धांदल, कट्ट्यावर रंगलेल्या ज्येष्ठांच्या गप्पा आणि मोकळ्या जागेत आरडाओरडा करत खेळणारी मुलं.

हल्ली तर या खेळणाऱ्या मुलांच्या संख्येतही घट झाली आहे, कारण बरीचशी चिमुकली फौज घरातच मोबाईलच्या किंवा टीव्हीच्या स्क्रीनमध्ये डोळे खुपसून बसलेली असते. हे असं अगदी साचेबद्ध आणि रोजचं चित्र असताना, एखाद्या सोसायटीत मात्र संध्याकाळच्या वेळी काहीतरी विलक्षण घडत असतं. तिथे मुलं वेगळंच काही करत असतात. त्यांच्या हातात कधी प्लॅस्टिकच्या बाटल्या, कधी दोरे, कधी फुगे तर कधी चुंबकाचे तुकडे असतात. तिथे खेळ चाललेला असतो, विज्ञानाची एक नवी दुनिया उलगडत असते.

या अभिनव आणि प्रेरणादायी वैज्ञानिक उपक्रमाचे शिल्पकार आहेत प्रा. मुजतबा लोखंडवाला. आजूबाजूला चाललेल्या चाकोरीबद्ध शिक्षणाच्या पलिकडे जाऊन, मुलांच्या मनातलं नैसर्गिक कुतूहल जागं करण्याचं महत्त्वाचं काम लोखंडवाला सर सोसायट्यांच्या अंगणात करत आहेत.

कट्ट्यावरची प्रयोगशाळा

आजच्या शिक्षणव्यवस्थेत विज्ञानासारखा रंजक विषयही अनेकदा फक्त मार्कांसाठी आणि पाठांतरासाठी शिकला जातो. 'न्यूटनचा नियम काय?' हे तोंडपाठ सांगणारी मुलं, प्रत्यक्ष व्यवहारात तो नियम कसा लागू होतो, हे सांगताना मात्र अडखळतात. नेमकी हीच गोम ओळखून लोखंडवाला सरांनी सोसायटीतल्या मुलांसाठी 'अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग' सुरू केलं. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासाठी ते 'अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग'चे अधिकृत ट्रेनर म्हणून काम पाहतात.

या प्रयोगांच्या महत्त्वावर बोलताना सर म्हणतात, "विज्ञानाचा मूळ उद्देश हा परीक्षेत मार्क मिळवणं नसून, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे कुतूहलाने आणि तार्किक दृष्टीने बघणं हा आहे. मुलांच्या हातात महागडी उपकरणं देण्यापेक्षा, घरातील साध्या टाकाऊ वस्तूंमधून एखादा नियम सिद्ध होतो, तेव्हा तो त्यांच्या कायमचा स्मरणात राहतो. प्रयोगशाळा ही बंद खोलीत नाही, तर ती सोसायट्यांच्या अंगणात आणि मुलांच्या हातात असायला हवी."

सोसायटीमधले लोक सरांना संपर्क करून त्यांचं वर्कशॉप ठरवतात. मुलं त्यांच्याभोवती गोळा होतात. सरांच्या हातात कुठलंही जाडजूड पुस्तक नसतं. त्यांच्याकडे असतात रोजच्या वापरातल्या साध्या-सोप्या वस्तू. एका छोट्याशा स्ट्रॉ आणि रिकाम्या बाटलीच्या साहाय्याने ते मुलांना हवेचा दाब कसा काम करतो हे शिकवतात. दोन साध्या आरशांमधून प्रकाशाचं परावर्तन कसं होतं, याचे खेळ रंगतात. खेळता-खेळता मुलं गुरुत्वाकर्षण, गती, आणि ऊर्जेचे नियम शिकू लागतात. इथे कुणालाही 'चूक की बरोबर' अशी भीती नसते. मुलांना प्रश्न विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं.

"जेव्हा मूल 'असंच का?' विचारतं, तेव्हाच खऱ्या अर्थाने वैज्ञानिक प्रक्रियेला सुरुवात होते," असं सर आवर्जून सांगतात. एकदा हे वर्कशॉप घेतलं की मग त्या त्या सोसायटीमध्ये सायन्स क्लब तयार केला जातो. तो पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्यापैकी इच्छुक मोठ्या माणसांना लोखंडवाला सर ट्रेनिंग देतात. महिन्यातून एक सायन्स अॅक्टीव्हीटी त्या क्लबने पुढाकार घेऊन मुलांसोबत करावी हे अपेक्षित आहे.

जेव्हा गच्चीवर आभाळ उतरतं...

हा उपक्रम जमिनीवरच्या विज्ञानासोबतच थेट आकाशापर्यंत पोहोचतो. लोखंडवाला सरांचा खगोलशास्त्र हा जिव्हाळ्याचा विषय. भारताची सर्वात जुनी आणि ख्यातनाम खगोलशास्त्र संस्था असलेल्या 'ज्योतिर्विद्या परिसंस्थे'चे ते माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा सर्वात फायदा या चिमुकल्यांना मिळतो.

जसजसा अंधार दाटू लागतो आणि आकाशात चांदण्या लुकलुकू लागतात, तसतसा या उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू होतो. अनेकदा सोसायटीच्या गच्चीवर खगोलशास्त्राचा वर्ग भरतो. टेलिस्कोपमधून ही मुलं पहिल्यांदा चंद्रावरचे खड्डे किंवा गुरू ग्रहाचे चंद्र पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आश्चर्याची आणि कुतूहलाची चमक असते, ती कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा मोठी असते. सप्तर्षी कुठे आहेत, ध्रुवतारा कसा ओळखायचा, कृत्तिका नक्षत्र कसं दिसतं, याच्या कथा सर इतक्या रंजकपणे सांगतात की, एरवी रात्री आकाशाकडे साधं डोकं वर करून न बघणारी मुलं आता ताऱ्यांच्या जागा अचूक ओळखू लागली आहेत.

आभाळाशी जोडल्या गेलेल्या या नात्याबद्दल सर म्हणतात, "आभाळाकडे बघायचं म्हणजे नक्षत्रांची नावं पाठ करत सुटायचं एवढंच नाही.  तर या अथांग विश्वात आपलं स्थान काय आहे, हे समजून घ्यायचं. टेलिस्कोपमधून एखादं मूल आकाशातले चमत्कार पाहतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याला झालेली जाणीव कितीतरी मोठी असते."

अनुभवाचा समृद्ध वारसा

हा उपक्रम इतका यशस्वी का होतोय, याच्या मुळाशी गेलं तर लोखंडवाला सरांचं अफाट व्यक्तिमत्त्व समोर येतं. त्यांनी बी.ई. मेकॅनिकलमध्ये शिक्षण घेतलं आहे. पुढे १८ वर्षे त्यांनी इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवलं आहे. सध्या ते अनेक मोठ्या कंपन्यांच्या सीईओंचे 'मेंटॉर' म्हणून काम करतात. पण एवढं सगळं असतानाही, सोसायटीतल्या एका पाचवीतल्या मुलाने विचारलेल्या बाळबोध प्रश्नाला तेवढ्याच गांभीर्याने आणि अगत्याने ते उत्तर देत असतात.

आजच्या बदलत्या जीवनशैलीवर भाष्य करताना ते म्हणतात, "आजची पिढी स्क्रीनमध्ये हरवत चालली आहे असं आपण म्हणतो, पण आपण त्यांना तितकाच रंजक आणि सहभागी करून घेणारा पर्याय दिला आहे का? विज्ञानाचे हे खेळ मुलांना मोबाईलपासून दूर नेऊन प्रत्यक्ष निसर्गाशी आणि विज्ञानाशी जोडण्याचं काम करतात."

या उपक्रमाचा मुलांवर तर सकारात्मक परिणाम होतोच पण संपूर्ण सोसायटीच्या वातावरणावर एक सकारात्मक परिणाम दिसायला लागतो. सुरुवातीला फक्त आपली मुलं काय करत आहेत, हे पाहण्यासाठी येणारे पालक आता स्वतः या प्रयोगांमध्ये रस घेऊ लागले आहेत. सोसायटीतल्या इतर कार्यक्रमांना जशी गर्दी होते, तशीच आता या 'सायन्स कट्ट्या'लाही होऊ लागली आहे. मुलं आता सुट्टीत कुठल्या मॉलमध्ये जायचं यापेक्षा, सरांसोबत कुठला नवीन प्रयोग करायचा, याची चर्चा करताना दिसतात.

एक आश्वासक चित्र

आज आपण पाहतो की शहरीकरणामुळे माणसांमधला संवाद हरवत चालला आहे. शेजारी कोण राहतं हेही अनेकांना माहीत नसतं. अशा वेळी, प्रा. मुजतबा लोखंडवाला यांच्यासारख्या एका उच्चविद्याविभूषित आणि प्रयोगशील व्यक्तीने पुढाकार घेऊन सुरू केलेला हा उपक्रम समाजासाठी एक 'रोल मॉडेल' बनतो. आजूबाजूला अंधश्रद्धा आणि बाबा-बुवांचं स्तोम माजलेलं असताना मुलांना वैज्ञानिक दृष्टीकोण देणं हे फार फार गरजेचं आहे. त्या अर्थानेही या कामाची दखल घ्यावी लागेल.

शाळांमधून मिळणाऱ्या औपचारिक शिक्षणाला अशा अनौपचारिक, मुक्त आणि प्रयोगशील वातावरणाची जोड मिळते, तेव्हाच खऱ्या अर्थाने संशोधक आणि विचारवंत घडतात. या सोसायटीतल्या 'विज्ञानाच्या मळ्या'त आज जी कुतूहलाची बीजे रोवली जात आहेत, ती उद्या नक्कीच मोठ्या वृक्षात रूपांतरित होतील, हे नक्की.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter