आलिशान क्रूझवर व्हायरस वेगाने का पसरतात?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 44 m ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अलीकडेच एमव्ही हॉन्डिअस या आलिशान क्रूझवर हंताव्हायरसचा झालेला प्रादुर्भाव आणि त्यात काही प्रवाशांना गमवावा लागलेला जीव, ही घटना जागतिक पर्यटन क्षेत्रासाठी धोक्याची घंटा वाजवणारी ठरली आहे. सुट्ट्यांच्या काळात समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी लाखो पर्यटक क्रूझकडे वळतात. मात्र गेल्या काही वर्षांतील घटनाक्रम पाहता, या तरंगत्या महालांचे रूपांतर विषाणूंच्या प्रयोगशाळेत होत असल्याचे चित्र दिसत आहे. २०२० मधील डायमंड प्रिन्सेसवरील कोविडचा कहर असो वा वारंवार उद्भवणारे नोरोव्हायरसचे संकट, क्रूझ आणि संसर्गजन्य आजार यांचे नाते आता चिंतेचा विषय बनले आहे.

बंदिस्त रचनेमुळे विषाणूंचा प्रसार
क्रूझवरील संसर्ग इतक्या वेगाने पसरण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे या जहाजांची क्लास्ट्रोफोबिक म्हणजेच बंदिस्त रचना. एका क्रूझवर हजारो प्रवासी आणि शेकडो कर्मचारी एकाच वेळी वास्तव्य करतात. जरी जहाज अथांग समुद्रात असले, तरी प्रवाशांसाठी उपलब्ध असलेली जागा अत्यंत मर्यादित आणि बंदिस्त असते. एसीद्वारे खेळती ठेवली जाणारी हवा अनेकदा संसर्गाला एका केबिनमधून दुसऱ्या केबिनमध्ये वाहून नेण्याचे काम करते. नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि ताज्या हवेचा अभाव हे विषाणूंसाठी पोषक वातावरण निर्माण करते.

बफे संस्कृतीमुळे आरोग्य धोके
क्रूझवरील मनोरंजनाइतकेच महत्त्व तिथल्या खानपानाला असते. बहुतांश क्रूझवर बफे पद्धतीचे जेवण दिले जाते. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही पद्धत नोरोव्हायरससारख्या पोटाच्या आजारांसाठी (Vomiting Bug) अत्यंत घातक ठरते. शेकडो प्रवासी एकाच चमच्याचा वापर करून पदार्थ वाढून घेतात. अशा ठिकाणी एका व्यक्तीचा संसर्ग काही मिनिटांत शेकडो लोकांपर्यंत पोहोचतो. बफेमधील अन्नाचे तापमान आणि स्वच्छतेचे निकष जराही ढळले, तर त्याचे परिणाम सामूहिक अन्नातून विषबाधा होण्यात होतात.

 
हंताव्हायरसचा धोका
हंताव्हायरससारखे आजार प्रामुख्याने उंदीर किंवा घुशींच्या वावरामुळे पसरतात. जहाजाच्या खालच्या मजल्यांवर जिथे रसद साठवली जाते, तिथे अशा प्राण्यांचा शिरकाव होणे ही एक गंभीर बाब आहे. क्रूझसारख्या आलिशान ठिकाणी स्वच्छतेचा वरवरचा झगमगाट असला, तरी साठवणुकीच्या भागात होणारी दुर्लक्षता प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते, हे हँटाव्हायरसच्या घटनेने सिद्ध केले आहे.

मर्यादित वैद्यकीय सुविधा 
क्रूझ पर्यटनाचा आस्वाद घेणारा मोठा वर्ग हा ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा असतो. या प्रवाशांना आधीच काही व्याधी असतात, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. क्रूझवर उपलब्ध असलेले रुग्णालय हे केवळ प्राथमिक उपचारांसाठी सक्षम असते. जेव्हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतो, तेव्हा या मर्यादित सुविधेवर प्रचंड ताण येतो. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या रुग्णाला तातडीने मल्टिस्पेशालिटी उपचार मिळण्यात येणारे अडथळे मृत्यूचा धोका वाढवतात.

पर्यटन कंपन्यांनी केवळ नफ्याचा विचार न करता, जहाजांची रचना, एअर फिल्ट्रेशन सिस्टीम आणि स्वच्छता नियमावलीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. प्रवाशांनीही केवळ झगमगाटावर न भाळता, आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रवासातील धोके समजून घेणे आवश्यक आहे. आजार पसरण्यासाठी फक्त एखादा व्हायरस जबाबदार असतो असं नाही. आपण ज्या प्रकारच्या जागेत राहतो, तिथली रचना आणि तिथली हवा ही सुद्धा आजारांना खतपाणी घालत असते. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter