साकिब सलीम
"बंदुकीने तुम्ही दहशतवाद्यांना मारू शकता; शिक्षणाने तुम्ही दहशतवाद संपवू शकता." नोबेल विजेती मलाला युसुफझाई हिचे हे वाक्य खूप गाजले. कमी शिक्षण आणि गरिबी हेच हिंसक अतिरेकीपणा किंवा दहशतवादामागील मुख्य कारण आहे, असा एक सर्वसाधारण समज आहे.
मात्र, अलिकडेच दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने या समजाला धक्का दिला आहे. डझनभर लोकांचा बळी घेणाऱ्या या स्फोटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली तपास यंत्रणांनी अनेक डॉक्टरांना अटक केली आहे.
डॉक्टरांचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग पाहून अनेकांना धक्का बसला आहे. दहशतवाद हा केवळ कमी शिकलेल्या किंवा मदरसा शिक्षण घेतलेल्या लोकांचा मार्ग आहे, असेच बहुतेकांना वाटते. पण हा विश्वास ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही आणि आकडेवारीही त्याला दुजोरा देत नाही.
'नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च'साठी ॲलन क्रुगर आणि जितका मलेकोव्हा यांनी संशोधन केले. त्यांचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. दहशतवादी संघटना कमी शिकलेल्या लोकांपेक्षा उच्चशिक्षित व्यक्तींना जास्त पसंती देतात. अगदी आत्मघाती बॉम्ब हल्ल्यांसाठीही त्यांनाच निवडले जाते.
याशिवाय, आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवाया करण्यासाठी गरीब निरक्षर लोकांपेक्षा सुशिक्षित, मध्यम किंवा उच्चवर्गीय व्यक्ती अधिक योग्य ठरतात. यशस्वी होण्यासाठी दहशतवाद्यांना परदेशी वातावरणात मिसळून राहायचे असते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांना धोका निर्माण करणारे दहशतवादी हे प्रामुख्याने सधन आणि उच्चशिक्षित वर्गातून आलेले असतात.
दिएगो गॅम्बेटा आणि स्टीफन हर्टोग यांनी त्यांच्या 'इंजिनिअर्स ऑफ जिहाद' या पुस्तकात एक महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे. मध्य-पूर्वेतील राजवटींना हे लक्षात येईल की, उच्च शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याने सामाजिक शांतता नांदतेच असे नाही.
उलट, आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका उच्चशिक्षितांना बसतो. ते अधिक अस्वस्थ होतात. काहीतरी करण्यासाठी त्यांच्याकडे चांगली साधने उपलब्ध असतात. १९७० च्या दशकातील हिंसक इस्लामवादी कट्टरपंथीयांच्या पहिल्या पिढीत उच्चशिक्षित व्यक्तींची भरमार होती. तळागाळातील कार्यकर्ते कदाचित गरीब असतील, पण धोकादायक कट्टरपंथीय चळवळीचा उगम उच्चभ्रू पदवीधरांमुळेच झाला आहे.
याच्या अगदी उलट, जगभरातील सरकारे "दहशतवाद संपवण्यासाठी मदत आणि शैक्षणिक सहाय्य वाढवण्याची" मागणी करत आहेत. मात्र, पुरावे असे दर्शवतात की, अधिक शिकलेले लोक कट्टरतावादाकडे जास्त झुकतात. किंवा किमानपक्षी, त्यांनी कट्टरतेचा मार्ग निवडल्यास ते अधिक घातक ठरू शकतात.
डॉक्टरांना दहशतवादी हल्ल्यांसाठी अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २००७ मध्ये लंडन आणि ग्लासगोमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी आलेल्या बातम्यांनुसार, अटक केलेल्या आठपैकी सात जण डॉक्टर होते. आठवा एक वैद्यकीय तंत्रज्ञ होता. हे सर्वजण 'नॅशनल हेल्थ सर्व्हिस' मध्ये काम करत होते. त्यातील दोन मुख्य दहशतवाद्यांपैकी बिलाल अब्दुल्ला हा डॉक्टर होता, तर कफिल अहमद हा भारतीय इंजिनिअर होता.
ग्लासगो बॉम्बस्फोटांनंतर रॉबर्ट सिबली यांनी यावर लिहिले होते. बिन लादेनचा दुसरा कमांडंट अयमान अल-जवाहिरी, 'पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन'चा संस्थापक जॉर्ज हबाश आणि पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहादचा संस्थापक फथी शिकाकी — हे सर्व डॉक्टर होते.
अर्थात, 'मारेकरी डॉक्टर'ही केवळ इस्लामची मक्तेदारी नाही. नाझी जर्मनीलाही नरसंहाराचे कार्यक्रम राबवण्यासाठी डॉक्टर सहज मिळाले होते. सोव्हिएत युनियनमध्येही "पुनर्वसन" केंद्रांमध्ये डॉक्टरांची कमतरता नव्हती. अलीकडेच, टोकियोमध्ये रेल्वे डब्यांत सरीन गॅस पेरल्याप्रकरणी एका डॉक्टरलाच दोषी ठरवण्यात आले होते.
खुद्द लादेनकडेही इंजिनिअरिंगची पदवी होती. तो ऑक्सफर्डमध्येही गेला होता. वॉल्टर लॅकर 'नो एन्ड टू वॉर' मध्ये लिहितात: "स्वतःच्या देशाबाहेर काम करणाऱ्या आजच्या दहशतवाद्याला शिक्षित असावे लागते. त्याच्याकडे तांत्रिक क्षमता हवी. परक्या समाजात लोकांचे लक्ष वेधून न घेता त्याला वावरता आले पाहिजे."
"११ सप्टेंबरच्या (9/11) हल्ल्यात सामील झालेले लोक अरब अफगाण नव्हते. ते वेगळ्या गटाचे सदस्य होते. ते युरोपमधील अरब डायस्पोराचे भाग होते किंवा युरोप-अमेरिकेत शिकलेले होते. युरोप आणि अमेरिकेतील मोहिवांसाठी पाकिस्तानी किंवा अफगाण शिबिरांपेक्षा वेगळ्या पार्श्वभूमीची आणि प्रशिक्षणाची गरज होती. तिथे उच्च शिक्षण, भाषांचे ज्ञान आणि परक्या समाजात कसे वागायचे याचा अनुभव आवश्यक होता."
दहशतवादी संघटना मुख्य प्रवाहातील लोकसंख्येशी समरस होऊ शकणाऱ्या सुशिक्षित लोकांची भरती करण्याचा प्रयत्न करतात, असे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे. आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे डॉक्टर आणि इंजिनिअर उजव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाकडे जास्त आकर्षित होतात.
गॅम्बेटा आणि हर्टोग एका शोधनिबंधात मांडतात की, अनेक इस्लामवादी विचारवंतांचे शिक्षण विज्ञान किंवा तांत्रिक क्षेत्रात का झाले आहे, हे स्पष्ट करण्यासाठी ऑलिव्हियर रॉय यांनी एक मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते, या लेखकांच्या साध्या समजुतीत विज्ञान हे 'संपूर्णतेची सुसंगती आणि एका (ईश्वराची) तर्कशक्ती' दर्शवते.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धातील अल-कायदाची घटना सांगते की, सदस्यांकडे महाविद्यालयीन पदवी असणे आदर्श आहे. जिहादींच्या एका प्रशिक्षण पुस्तिकेत भरतीसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट गुणांचा उल्लेख आहे: 'शिस्त आणि आज्ञाधारकपणा, संयम, बुद्धिमत्ता, सावधगिरी आणि विवेक' आणि निरीक्षण व विश्लेषण करण्याची क्षमता.
नाझी जर्मनीमध्ये छळ छावण्यांमध्ये डॉक्टरांनी सक्रियपणे नरसंहार केला. हा काही योगायोग नाही. किंग्ज कॉलेज लंडनच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रीचे प्राध्यापक डॉ. वेस्ली यांनी लिहिले आहे: "अनेक डॉक्टर परोपकाराच्या भावनेने प्रेरित होऊन निर्वासित छावण्या, युद्धक्षेत्र आणि आपत्तीग्रस्त भागात काम करतात. समोरच्या रुग्णाला मदत करणे हाच त्यांचा एकमेव उद्देश असतो."
"पण, अशाच प्रकारच्या आदर्शवादाने प्रेरित होऊन काही जण केवळ रुग्णाला बरे करू पाहत नाहीत. त्यांना आजार, जखमा आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेला अन्यायही दूर करायचा असतो. जेव्हा जगाला अधिक चांगले बनवण्याची इच्छा, आपल्या कृतींचा इतर लोकांवर होणाऱ्या परिणामांच्या विचारापासून तुटते, तेव्हा सीमारेषा ओलांडली जाते. जेव्हा कायदेशीर राजकीय कृतीची जागा 'साध्यासाठी साधनं काहीही चालतील' (end justifies the means) हा विश्वास घेतो आणि जेव्हा अन्याय दूर करणे आणि सूड घेणे यात गल्लत होते, तेव्हा हे घडते."
"चांगला सर्जन किंवा सार्वजनिक आरोग्य चिकित्सक बनवणारे काही गुणच विकृत होऊ शकतात. आजारी, मानसिक रुग्ण आणि वांशिकदृष्ट्या अशुद्ध लोकांविरुद्धच्या नाझी नरसंहाराच्या प्रत्येक टप्प्याचे समर्थन करण्यासाठी वैद्यकीय रूपकांचा वापर केला गेला."
"अल-जवाहिरीला कदाचित असे वाटत असेल की, त्याच्या कृती इस्लामच्या व्यापक जगाच्या दीर्घकालीन हिताच्या आहेत आणि हेच कारण सामूहिक हत्याकांडाचे समर्थन करते. जेव्हा डॉ. कार्ल ब्रँड यांना हत्या आणि विकृत वैद्यकीय प्रयोगांमधील भूमिकेसाठी न्यूरेमबर्ग येथे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा त्यांनी कोणताही पश्चात्ताप दाखवला नाही. जर्मनीला ज्यांचे 'जीवन जगण्यायोग्य नाही' त्यांच्यापासून वाचवण्यासाठी आपल्या कृती योग्यच होत्या, असे ते मानत राहिले."
आज संपूर्ण जग आणि विशेषतः भारत, दहशतवादाकडे वळणाऱ्या दिशाभूल झालेल्या सुशिक्षित लोकांच्या धोक्याचा सामना करत आहे. हे लोक निष्पाप जीवांना मारत आहेत. या दहशतवाद्यांची निर्मिती रोखण्यासाठी सरकारांना आपल्या धोरणांचा फेरविचार करण्याची गरज आहे.
अनेकदा असा युक्तिवाद केला जातो आणि मानला जातो की, कमी शिकलेले किंवा पारंपरिक शिक्षण घेतलेले (वाचा मदरसा) लोक दहशतवादी विचारसरणीला लवकर बळी पडतात. पण पुरावे वेगळेच सांगतात. लष्कर-ए-तोयबा असो, ज्याचे संस्थापक सदस्य विद्यापीठात शिकवत होते, अल-कायदा असो किंवा इतर कोणतीही अतिरेकी संघटना; यामध्ये भरती झालेले लोक बहुतेक उच्च पाश्चात्य शिक्षण घेतलेले आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर कुटुंबांतील आहेत.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताला एका नव्या धोरणाची गरज आहे. आपल्याला इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये राष्ट्रवादी शिक्षणावर भर दिला पाहिजे. हे शिक्षण विद्यार्थ्यांना संमिश्र समाजात एकत्र कसे जगायचे, हे शिकवेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -