छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर ढोरकीन जिल्हा परिषद उर्दू प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भरवलेला वर्ग.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील ढोरकीन (ता. पैठण) येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेत तीन वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. १२) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या दालनासमोरच शाळा भरविली. नंतर शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी लागलीच शाळेवर अन्य एका शिक्षकाची नेमणूक केली.
जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आधीच बिकट आहे. त्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या हा गंभीर विषय आहे. काही शाळांवर विद्यार्थीसंख्या बऱ्यापैकी असताना त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक मिळत नसल्याचे दुर्दैव आहे. असाच प्रकार ढोरकीन येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेत आहे. या शाळेत आठवी ते दहावी असे तीन वर्ग आहेत. विद्यार्थीसंख्या १७६ आहे. त्यामध्ये यंदा दहावीला प्रविष्ट झालेले विद्यार्थी एकूण ८० आहेत.
मात्र, मागील चार वर्षांपासून शाळेत आठवी ते दहावीच्या मुलांना शिकविण्यासाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. एकाच शिक्षकावर तीन वर्गांचा भार असल्यामुळे सर्वांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दहावीची बोर्ड परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षा केवळ १५ दिवसांवर आली असताना अजून अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट जिल्हा परिषदेत येत सीईओंच्या दालनातच शाळा भरवत शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली. या आंदोलनाची शिक्षण विभागाने तातडीने दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक उपलब्ध करून दिला.
शिक्षकाची मागणी करत पालक मुजीब कुरेशी म्हणाले, "ढोरकीन येथील उर्दू माध्यमिक प्रशालेत आठवी ते दहावीचे एकूण १७६ विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये बहुतांश मुली आहेत. मागील चार वर्षांपासून माध्यमिक शाळेवर केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे. या शाळेवर शिक्षक उपलब्ध करून द्यावेत."
तर, शाळेतील दुरावस्थेबाबत बशरा शेख ही विद्यार्थिनी म्हणाली, "आमच्या शाळेत केवळ एकच शिक्षक आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला आहेत. त्यामुळे आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. आम्हाला शिक्षक उपलब्ध करून देण्याचे फक्त आश्वासन दिले जाते. शिक्षक मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही इथेच शाळा भरवली आहे."
प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण म्हणाल्या, "तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी माध्यमिक विभागाला आवश्यक मान्यता दिली होती. मात्र, शाळेला संचमान्यतेमध्ये पदच नाही. तरीदेखील सीईओंच्या आदेशानुसार त्या शाळेला तातडीने शिक्षक उपलब्ध करून दिला आहे."