सिल्क्यरा बोगदा दुर्घटनेवर चित्रपट! आमिर खान आणि कबीर खान घेऊन येत आहेत 'सिल्क्यारा ४१'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
आमिर खान आणि कबीर खान यांची 'सिल्क्यारा ४१' चित्रपटाची घोषणा
आमिर खान आणि कबीर खान यांची 'सिल्क्यारा ४१' चित्रपटाची घोषणा

 

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी शुक्रवारी आपल्या आगामी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 'सिल्क्यारा ४१' (Silkyara 41) असे या चित्रपटाचे नाव असून, तो २०२३ मध्ये उत्तराखंडमधील सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या बचाव मोहिमेवर आधारित आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक कबीर खान करणार असून, आमिर खान प्रॉडक्शन, ऑस्ट्रेलियाची माइंड ब्लोइंग फिल्म्स आणि कबीर खान फिल्म्स या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट निर्मित केला जाणार आहे.

थरारक बचाव मोहिमेचे पडद्यावर चित्रण
हा चित्रपट ऑस्ट्रेलियन पटकथा लेखक अँड्र्यू अनास्तासिओस यांनी लिहिला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यरा-बारकोट बोगद्याचा काही भाग कोसळल्यामुळे ४१ कामगार आत अडकले होते. १७ दिवस चाललेल्या अत्यंत कठीण आणि जटिल बचाव मोहिमेनंतर, भारतीय यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने या सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. या संपूर्ण मोहिमेत ऑस्ट्रेलियन बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. हा चित्रपट कामगारांचा संघर्ष आणि बचाव कार्यातील तांत्रिक कौशल्याचे दर्शन घडवणार आहे.

आमिर खान आणि कबीर खान यांची प्रतिक्रिया
आमिर खान यांनी या प्रकल्पाबद्दल बोलताना सांगितले की, "सिल्क्यारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मला खूप भावली. ही कथा धैर्य, जिद्द आणि माणुसकीची आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या एका नवीन अध्यायाच्या निमित्ताने आम्ही ही घोषणा करत आहोत, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे."

दिग्दर्शक कबीर खान यांनी याला अलीकडच्या काळातील सर्वात विलक्षण मानवी कथांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. "यात अडकलेले जीव, त्यांची वाट पाहणारी कुटुंबे आणि ही बचाव मोहीम शक्य करण्यासाठी एकत्र आलेले असामान्य लोक, या मानवी पैलूंनी मला या प्रकल्पाकडे आकर्षित केले," असे त्यांनी सांगितले. आमिर खान प्रॉडक्शनचा 'बंटवारा १९४७' हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.